स्त्री असण्याचा अर्थ

0
1385
  •  डॉ. अनुजा जोशी

पुरुषाच्या आत लपलेल्या प्रेम, माया, वात्सल्य, समंजसपणा, हळवेपणा, जिद्द, चिकाटी, सहनशक्ती या ‘स्त्री असण्याच्या’ अर्थाने त्याच्या दंभ, अहंकार वर्चस्वी वृत्तीवर मात करायला हवी. आणि हळव्या स्त्रीत्वाला तिच्यातल्या कणखर पौरुषाने साथ द्यायला हवी… आयुष्याचं आभाळ अशा द्विगुणी ‘सार्थका’ने भरून जायला हवं…

पुन्हा ८ मार्च
पुन्हा जागतिक महिलादिन!
पुन्हा एकवार स्त्रीच्या अस्तित्वाचा, जाणिवांचा उद्घोष!
तिचं स्वातंत्र्य, मुक्ती आणि शक्तीचा जयघोष.
तिचे हक्क, न्याय, अन्याय, अत्याचारांचा बोलबाला.
तिची कर्तव्ये, कर्तृत्वे व आकांक्षांचा गलबला….
समस्त स्त्री-जातीचा वाढदिवस असावा अशा उत्साहाने ८ मार्च सर्वत्र साजरा होतो. पुरुषप्रधान संस्कृतीशी जमेल तेवढं जुळवून घेत व जमेल तेवढा संघर्ष करत स्त्रीने आजवर केलेली वाटचाल आपल्या डोळ्यांसमोरच आहे. प्राचीनकाळातली चार भिंतीत कोंडलेली स्त्री आज स्वतःच्या मुक्त आभाळाखाली वावरते आहे हे आजवरच्या स्त्री-मुक्ती चळवळीचं फलितही आपण ‘याचि डोळा याचि देही’ अनुभवतो आहोत. पण असं असलं तरी प्रश्‍न काही संपत नाहीत. आणि अर्थातच उत्तरांच्या शक्यताही वाढत गेलेल्या दिसताहेत. जुनेच प्रश्‍न नवनवी रूपं घेऊन समोर ठाकलेले दिसताहेत. स्त्री आपल्या परीने प्रत्येक नव्या प्रश्‍नाला नवं उत्तर शोधत आहे. अशी कोणती किंवा कोण्या प्रकारची ताकद ‘स्त्रीत्वा’मध्ये आहे, जी संघर्ष घुसळून सकाराचं नवनीत काढू शकते, दुःखांची घुसळण करून सुखाचे सार काढू शकते, वेदनांचं मंथन करून संवेदनांचं सत्व काढू शकते.
स्त्रियांचं आयुष्य, त्यांचे प्रश्‍न, त्यांचे हक्क, कर्तव्ये, स्वातंत्र्य, मुक्ती, त्यासाठी संघर्ष नि चळवळी या सर्वांच्या मुळाशी एक विलक्षण प्रश्‍नकुतूहल आहे, ते म्हणजे ‘स्त्रीचं असणं म्हणजे नेमकं काय?’ गुंत्याचं एक विशिष्ट नेमकं टोक असतं, व ते ओढलं की सगळा गुंता सुटतो. तसंच आपण ‘स्त्री’ आहोत म्हणजे नेमकं काय काय आहोत? या प्रश्‍नाची उकल स्त्रीला स्वतःची स्वतःला जेवढी मुळातून होत जाईल, तेवढा तिच्याभोवती असणारा प्रश्‍नांचा गुंता आपसूक सुटत जाईल, असं मला अनेकदा अनेक स्त्रियांच्या समस्यांचा विचार करताना जाणवत राहिलं आहे.
आजच्या महिलादिनाच्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानता, स्त्री-पुरुष संबंध, अशा प्रकारे स्त्री व पुरुषाचा वेगवेगळा विचार न करता, आपण इथं ‘स्त्रीत्व’ व ‘पुरुषत्व’ अशा वृत्तींचा विचार करायचा आहे. एकाच व्यक्तीमध्ये एकाचवेळी स्त्रीत्वही असतं व पुुरुषत्वही असतं. पुरुष व्यक्तीमध्ये त्यांच्या पुरुषत्वाबरोबर स्त्रीत्व असतं व स्त्री व्यक्तीमध्ये तिच्या स्त्रीत्वाबरोबर पुरुषत्वही असतं. निसर्गाने स्त्री-पुरुषाला वेगवेगळी शरीरं दिली, पण गुणकर्मांमध्ये त्याने असमतोल केला नाही. निसर्गाच्या हातातला तराजू नेहमीच संतुलित राहिला आहे. तो कुणावर कधी अन्याय करत नाही. देताना हात आखडता घेत नाही, तशी उगीचच अवाजवी उधळमाधळही करत नाही. एक बाजू सरस असेल तर दुसरी थोडी दुबळी असतेच असते. तांबड्या पिवळ्या गडद आकर्षक रंगाच्या फुलांना गंध असत नाही व मोहक वासाच्या बारीक-बारीक फुलांना आकर्षक रंग असत नाही. (चाफा, सुरंगीसारखे अपवाद वगळता.) रंगाची उधळण केली तर रंग माफक व गंधाची उधळण केली तर रंग माफक असा एकूण संतुलित मामला असतो. त्याचप्रमाणे स्त्रीचं शरीर व मन दुबळं-कमकुवत, नाजूक असलं तरी तिच्या धारणा, क्षमता, जिद्द मात्र प्रचंड कणखर असते. आणि पुरुषाच्या कणखर देह-मनामध्ये चिकाटीची, भावभावनांच्या ओलाव्याची कमी असते. सृजनाच्या- नवनिर्मितीच्या साक्षात हळव्या भूमीची उणीव असते! असा संतुलित हिशेब ढोबळमानाने आपण लिहू शकतो.
हळवेपणा, सौम्यपणा, नाजूकपणा, प्रेम, माया, परिश्रम, चिकाटी, ऋजुता, लीनता, लवचीकता, ममत्व, स्नेह, कौशल्य अशा ‘नरमाई’ला ‘स्त्रीत्व’ म्हणायचं. आणि कठोरपणा, कर्तृत्व, साहस, धैर्य, शूरता, वीरता, धडाडी, अहंकार, अभिमान, वर्चस्व अशा ‘कडकपणाला’ पुरुषत्व म्हणायचं.
जेव्हा एखादी स्त्री घरसंसार सांभाळत नोकरी, कामधंदा अर्थार्जनही करते, तेव्हा ती स्वतःमधलं ‘स्त्रीत्व’ सांभाळत स्वतःमधलं ‘पुरुषत्व’ किंवा ‘पुरुषार्थ’ही चांगल्या प्रकारे सिद्ध करते. एक व्यक्ती म्हणून तिच्यामध्ये असणारं स्त्रीत्व व पुरुषत्व दोन्ही जबाबदार्‍या ती यशस्वीपणे निभावते. आपल्याकडे स्त्रीने असा पुुरुषार्थ निभावण्याला आता हळूहळू समाजमान्यता मिळाली आहे. किंबहुना या धावत्या यंत्रयुगात स्त्रीनेही पुरुषाबरोबर अर्थार्जन करावं, जबाबदार्‍या पार पाडाव्या ही परिस्थितीची गरजच ठरली आहे. स्त्रीच्या अंगी असणारी विविध कला-कौशल्ये, गुण-प्रयत्न-परिश्रम यांच्या जोरावर घरात आणि घराबाहेर दोन्ही ठिकाणी ती समर्थपणे वावरते आहे. आणि नेमकी हीच गोष्ट पुरुषाच्या बाबतीत घडताना दिसत नाही. पुरुषामध्ये असणारं ‘स्त्रीत्व’ चांगल्याप्रकारे विकसित झालेलं दिसून येत नाही. घरातली कामं करणं, भाजी चिरणं, जेवण करणं, रांगोळी घालणं, कलाकुसर करणं, सजावट करणं, सणवार साजरे करणं, परंपरा पाळणं, पाहुणचार करणं अशासारख्या गोष्टी स्त्रियांनीच करायच्या असतात व ती ‘बायकी’ कामं म्हणून हिणवली जातात. कमी प्रतीची ठरवली जातात.
पुरुष हा पुरुष म्हणून जन्माला येत नसून त्याला ‘पुरुष’ म्हणून आधी घराकडून, नंतर समाजाकडून व नंतर व्यवस्थेकडूनच घडवलं जातं! मुलगा झाल्यावर ‘पेढा’ आणि मुलगी झाली तर ‘जिलेबी’ इथंपासून भेद सुरू होतो, असं गमतीने म्हटलं जातं. हे गमतीने असलं तरी त्यात बरंच तथ्य आहे. पुढे मुलाच्या हातात ‘बॉल’ आणि मुलीच्या हातात ‘बाहुली’ दिली जाते. त्यापुढे जाऊन ‘मुलगी आहेस तू… नीट बस’ आणि ‘पुरुषासारखा पुरुष तू… रडतोस काय?’ असं म्हणून लहानपणापासूनच मुलाचा अहंकार जागवला जातो. मुलीची कोंडी केली जाते. ‘तो बघ कोण ‘बागुलबुवा’ आला’ असं म्हणून ज्याच्याविषयी दहशत, भीती वाटावी असा कुणीतरी ‘तो’ मुलामुलींच्या नजरेसमोर उभा केला जातो. आणि घाबरून रडू लागणार्‍याला मुळूमुळू रडणारी ‘भित्री भागुबाई’ म्हटलं जातं. जिद्द, इर्षा, महत्त्वाकांक्षेचं प्रदर्शन ‘चल, दाखवच आता जिंकून… तू काय बांगड्या भरल्यायत की काय?’ अशा प्रकारे केलं जातं. म्हणजे अर्थातच बांगड्या भरणारी मुलगी किंवा स्त्री ही बुळचटच असते, असं मुला-मुलींच्या अबोध मनावर बिंबवलं जातं. ‘तू मुलगी आहेस, तुला जेवण करता यायला हवं’ असं मुलींना ठासून सांगितलं जातं. ‘त्यांनी घरकामात आतापासूनच लक्ष घालायला हवं, मुलींवर चांगले संस्कार व्हायला हवेत’ अशा उपदेशांचे डोस मुलींना पाजले जातात. एक माणूस म्हणून स्वतःचं अन्न मुलालाही स्वतःला शिजवता यायला पाहिजे, त्यालाही घरकाम जमायला पाहिजे, त्याच्यावरही चांगले संस्कार झाले पाहिजे. या गोष्टी सोयिस्करपणे नजरेआड केल्या जातात. स्त्रियांचे गुण, स्त्रियांची कामं, स्त्रियांची रहनसहन आणि स्त्रियांचं जगणंच पुरुषापेक्षा कसं हलकं आहे, निकृष्ट दर्जाचं आहे, दुय्यम आहे हे विविध प्रकारे इतकं खोलवर मुलामुलींच्या मनावर ठसवलं जातं, रुजवलं जातं, वाढवलं जातं, याच समजुतींमध्ये मुलं खोल रुतत जातात. धारणांची खोडं मजबूत होत जातात. मुलगी ‘बाई’ बनत जाते… मुलगा ‘पुरुष’ होत जातो!
स्त्री-पुरुष समानता ही फक्त कपडेलत्ते, बोलण्या-फिरण्यातली नसून अशी वैचारिक पातळीवरची अपेक्षित आहे. स्त्रीच्या हक्कांचा, न्यायाचा बराच बोलबाला व फलश्रुतीही झाल्यानंतर स्त्रीवादी चळवळींनी आता अशा प्रकारचं मुळातलं काम करायच्या दिशेने वैचारिक भेदभावाचं उच्चाटन करण्याच्या दिशेने पावलं टाकलेली दिसताहेत, ही खूप समाधानाची गोष्ट आहे.
आजवरच्या स्त्रीवादी चळवळीने स्त्रीमधलं ‘पुरुषत्व’ जागवून तिला समर्थपणे उभं केलं. आज पुुरुषामधलं ‘स्त्रीत्व’ जागवून त्याला समंजस सहकार्याचा हात पुढे करत उभं करणं, ही परिस्थितीची गरज ठरली आहे. आणि यासाठी आवश्यक बनलं आहे ते ‘स्त्रीत्व’ समजून घेणं. ‘स्त्री असण्याचा अर्थ’ जाणून घेणं!
स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून
फक्त तिनंच का पेलावं स्त्रीत्व?
कळायला हवा
पुरुषी होत चाललेल्या समाजाला
स्त्री असण्याचा अर्थ!
निभवायला हवं प्रत्येकानंच
आपापल्या परीने स्त्रीत्व.

स्त्रीचा देह असणं
म्हणजे स्त्री असणं नाही
स्त्री असणं म्हणजे
सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं,
जगवणं
अखंड तेवती ठेवणं जिजीविषा
टिकून राहाणं तुफानी वादळातही

स्त्री असणं म्हणजे
जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश
रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता
सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं
स्त्री असणं म्हणजे
सहवेदना… प्रेम… तितिक्षा!

पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण
जशी स्त्री निभावतेय सहज पुरुषपण!!
आसावरी काकडे यांनी स्त्री असण्याचा हर एक अर्थ या कवितेमध्ये उलगडून सांगितला आहे.
फक्त स्त्रीचा देह म्हणजे स्त्रीत्व नव्हे. स्त्रीच्या तनामनाच्या सर्व क्षमता व शक्यता म्हणजे स्त्रीत्व. आधुनिक विज्ञानाच्या भाषेतही स्त्रीत्व समजून घेता येऊ शकतं. ‘दद’ अशी असणारी गुणसूत्रांची रचना व इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स् अशा शास्त्रीय भाषेतही स्त्रीत्व समजून घेता येतं. पुरुषामध्ये असणारी ‘दध’ अशी गुणसूत्र रचना व टेस्टेस्टेरॉन हार्मोन्समुळे निर्माण झालेलं ‘पुरुषत्व’सुद्धा याबरोबरच समजून घ्यावं लागतं. जेव्हा मुलगा होत नाही म्हणून सासरच्या माणसांकडून सुनेचा छळ मांडला जातो अशा परिस्थितीत या गुणसूत्रांच्या खेळामुळे होणारा गुंता त्यांना पटवून द्यावा लागतो. पुरुषामध्ये दध अशी गुणसूत्ररचना असते, तर स्त्रीमध्ये दद अशी गुणसूत्रांची जोडी असते. यातल्या प्रत्येकी एकेकाचा दुसर्‍यातल्या एकेकाशी संंयोग होऊन त्यानुसार गर्भाचं लिंग ठरतं. स्त्रीकडे दोन्ही द असल्यामुळे कोणत्याही वेळी किंवा प्रत्येकवेळी ु चाच संयोग घडून येतो. स्त्रीच्या या द ला पुरुषातील द मिळतो, तेव्हा दद गुणसूत्र रचना असणारी मुलगी जन्माला येते. व जेव्हा स्त्रीच्या दला पुरुषातील ध मिळतो, तेव्हा दध गुणसूत्ररचना असणारा मुलगा जन्माला येतो. म्हणजे मुलगा होणे, न होणे हे स्त्रीवर अवलबूंन नसून पुरुषावरच अवलंबूून असतं. पण मुलगा होत नाही म्हणून सुनेला छळणार्‍या सासूला मात्र तिचा मुलगाच याला ‘जबाबदार आहे, हे पटवणं खूप कठीण गोष्ट असते, हेही तेवढंच खरं!
अर्थात या गोष्टी निसर्गनियामनुसार घडत असतात. त्यात कुणाच्या इच्छे-अनिच्छेचा प्रश्‍नच असत नाही. इथे स्त्रीत्व नव पुरुषत्वाचा वैज्ञानिक अर्थ स्पष्ट केला आहे एवढंच!
स्त्रीभृणहत्या व त्यामुळे घटलेलं मुलींचं प्रमाण या भीषण समस्येची चर्चा, उपाय सर्वश्रूत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा तो एक मोठा दुुरुपयोग आहे. प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्त्रीभृणहत्येच्याही आधी गुणसूत्रांच्या पातळीवरच स्त्रीला मारलं जाण्याचं छड्‌यंत्र छुपेपणाने खेळलं जातं, ही खूप धक्कादायक भीषण गोष्ट आहे. पुरुषाच्या वीर्यामधील द गुणसूत्र असलेले शुक्राणू वेगळे करून ‘ध’ गुणसूत्राचे शुक्राणू तेवढे स्त्रीमध्ये प्रविष्ट करून ‘दध’ गुणसूत्ररचना असलेला ‘मुलगा’ जन्माला घातला जातो. हे छुपं दारुण वास्तव आहे.
स्त्री भ्रूणहत्येच्याही स्त्रीगुणसूत्रहत्या करणार्‍या या भयावह काळात आपण पुरुषामधलं ‘स्त्रीत्व’ जपण्याच्या गोष्टी करत आहोत! जे बीज अजून अकुंरातही नाही त्या बिजाला लागणारी कीड आणि वृक्ष झाल्यानंतर त्याच्या फळाला लागणारी कीड या दोन्ही पातळ्यांवर स्त्रीच्या अस्तित्वाचा संघर्ष चालूच आहे. ही स्त्रीच्या इतक्या मुक्तीनंतरची वस्तुस्थिती आहे.
स्त्रीकडे पूर्वापार एक भोग्यवस्तू, एक करमणूक, कर्तव्ये करणारं यंत्र, अशा दृष्टीने बघितलं गेलं. अर्धांगी, वामांगी ठरवून ठरवून दुय्यम स्थान दिलं गेलं. इथून संघर्षाला सुरुवात झाली. स्त्री ही एक ‘माणूस’ आहे हे ओरडून सांगण्याची वेळ आली. म्हणून स्त्रीचं हे ‘माणूसपण’ शास्त्रीयदृष्ट्याही पटवून देण्याची गरज भासत आहे. शरीर, मन व बुद्धी अशा त्रिकोणात आयुष्याचा विचार केला तर हे सोपं पडतं. शरीराच्या बाबतीत स्त्री-पुरुष दोघांंमध्ये वेगळेपण आहे. मनही स्त्रीचं हळवं व पुरुषाचं कणखर असं भिन्न आहे. पण बुद्धी किंवा मेंदू मात्र दोघांचाही सारखाच- म्हणजे ‘माणसाचाच’ असल्यामुळे ‘बाईलबुद्धी’ वगैरे काही अस्तित्वातच नसतं. तो फक्त पुरुषी वर्चस्वाने स्त्रीला हिणवण्याचा भाग असतो. वरून स्त्रीचं माणूस असणं नीट समजून घेतलं तर स्त्री असण्याचे विरर्थ लावले जाणार नाहीत.
स्त्री ही साक्षात सर्जनाची भूमी आहे. ती जननीच आहे. रुजवणं, जगवणं ही स्त्री असल्याचा एक मूलभूत अर्थ आहे. तुफानी वादळात, संकटात, प्रतिकूलतेत टिकून राहाणं, तग धरणं, जगण्याची शर्थ करणं ही जीवनेच्छा म्हणजे तिची जिजीविषा! एका वैद्यकीय निरीक्षणावरूनही ही गोष्ट सिद्ध झाली आहे. साधारणपणे ४-५ महिन्यांच्या नैसर्गिक गर्भपातामध्ये ऍबॉर्ट झालेला गर्भ हा बर्‍याचवेळा ‘पुरुषगर्भ’ असतो. स्त्रीगर्भाचे ऍबॉर्शन सहजासहजी होत नाही किंवा पुरुषगर्भापेक्षा कमी प्रमाणात होते. गर्भात असतानापासूनच ती शर्थीने सव्हाईव्ह होत असते. तिची चिकाटी, सहनशक्ती, टक्कर देण्याची वृत्ती- तितिक्षा ही अशी तिच्या रक्तातच असते. ‘ु’ गुणसूत्र मुळातच ‘ध’ गुणसूत्रापेक्षा लांब असतं व ‘क्रोमोझोमल मटेरियलसुद्धा त्यामुळे अर्थातच त्यात जास्त असतं. असं मुळातल्या रचनेतही सरसपण असणारी स्त्री पुरुषापेक्षा दुय्यम मानली गेली हा केवळ दैवदुर्विलासच आहे.
अस्तित्वाचे अक्षांश-रेखांश जतन करणे, विश्‍वाच्या अफाट पसार्‍यातलं आपलं बिंदूएवढं स्थान बळकट करत राहाणं, प्रयत्नांची पराकाष्ठा करणं हेही वरील कवितेत म्हटल्याप्रमाणे तिच्या ‘स्त्री’ असल्याचेच विभ्रम आहेत. तिच्या अगदी बाल्यावस्थेपासूनच तिची ही धडपड सुरू होते. बाळाचं पालथं पडणं, रांगणं, बसणं, उभं राहणं, चालू लागणं, धावणं हे सगळे प्रगतीचे टप्पे मुलापेक्षा मुलगी लवकर पार करू लागते. ‘मुलाला कसली घाई नसते’ असं गमतीने जाणत्या बायका म्हणताना दिसतातच ना? पुढेही अडीअडचणीत घर सांभाळणारी मुलगी, कौटुंबिक आपत्तीत भावंडांचा सांभाळ करणारी मातेसमान बहीण, प्रतिकूलतेत संसार करणारी विधवा आई, प्रसंगी नातवंडांना धीराने वाढवणारी आजी अशा अनेक रूपांत स्त्रीच पडझडत्या आयुष्यांना सावरून राहिल्याचं जिथ तिथं दिसून येतं.
अशा विविधांगी भूमिका निभावणारी स्त्री ‘रजोप्रवृत्ती’ किंवा ‘ऋतुकाल’ नावाच्या विविधरंगी ऋतूंमधून वाटचाल करत असते. ‘रजःस्राव’ हे निसर्गात माणसाच्या मादीमधेच दिसणारं एकमेव आश्‍चर्य आहे. हा ऋतू सुप्तावस्थेत असणारं तिचं बाल्य, ऋतूच्या आगमनानंतरचं रसरशीत तारुण्य व त्याभोवती फिरणारं मानवी भावजीवन- कामजीवन- वैवाहिक जीवन- कुटुंबव्यवस्था- समाज व्यवस्था अशा अनेक साखळ्या आणि ऋतूूंच्या निवृत्तीनंतरचा काळ, वार्धक्य… अशा अनेक स्थित्यंतरामधूनही ‘स्त्री’ नावाच्या उर्जेचा प्रवास निरंतर …. राहिला आहे.
वादळात फडफडणारी ज्योत होऊन जगत व जगवत असताना या वादळाला रोखण्याचं अजब कसब आणि वरील कवितेत म्हटल्याप्रमाणे महायुद्धांच्या शक्यता रोखून धरणारं दया- क्षमा- शांती व प्रेमाचं मूर्तस्वरूप हा या स्त्रीत्वाचाच एक अलौकिक विभ्रम आहे. सर्व जीवनमूल्ये शाबूत ठेवणारा तो आधार आहे.
महिलादिनाच्या निमित्ताने असं वैचारिक मंथनही व्हायला हवं. स्त्रीत्व व पुरुषत्व यांचा मेळ साधला जायला हवा. पुरुषाच्या आत लपलेल्या प्रेम, माया, वात्सल्य, समंजसपणा, हळवेपणा, जिद्द, चिकाटी, सहनशक्ती या ‘स्त्री असण्याच्या अर्थाने त्याच्या दंभ, अहंकार वर्चस्वी वृत्तीवर मात करायला हवी. आणि हळव्या स्त्रीत्वाला तिच्यातल्या कणखर पौरुषाने साध द्यायला हवी… आयुष्याचं आभाळ अशा द्विगुणी ‘सार्थका’ने भरून जायला हवं…!