28.1 C
Panjim
Sunday, September 26, 2021

स्त्रीचा मासिक धर्म आणि तिचे आरोग्य

  •  डॉ. मनाली म. पवार
    (गणेशपुरी-म्हापसा)

धर्मशास्त्रानुसार या काळात अशुचित्व मानलेले आहे, परंतु जे स्त्रीच्या संरक्षणासाठी असावे, कारण योनिमार्ग या काळात मोकळा असतो, रजस्राव होत असतो आणि सर्व शरीरातील सारभूत रक्त वाहणार्‍या केशवाहिन्या या गर्भाशयाशी संलग्न असतात. त्यामुळे या काळात सांसर्गिक रोग चटकन लागण्याची शक्यता असते. २८ दिवसांची मेन्स्ट्रुअल सायकल असल्याने २८ मे हा ‘जागतिक महिनावारी स्वच्छता दिवस’ (वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे) म्हणून पाळला जातो.

खेळणे, धावणे, पोहणे इ. क्रिया वर्ज्य कराव्यात, टीव्हीवर कितीही जाहिराती दाखवल्या तरी त्या काळात अशा प्रकारच्या हालचाली केल्या तर वाताचा प्रकोप होऊन विविध व्याधी उत्पन्न होतात. अगदीच एखाद्या खेळाडू महिलेचे कार्यच जर खेळणे हेच असेल, व तिला विशेष त्रास होत नसल्यास काळजी घेऊन खळण्यास, धावण्यास, पोहण्यास हरकत नाही.

स्त्रीच्या आरोग्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा तो मासिक पाळीचा. आपल्या देशात अजूनही मासिक पाळीबद्दल पारदर्शक चर्चा होत नाही. मुळात मासिक पाळीला तेवढे महत्त्वही दिले जात नाही. नाही म्हणायला प्रगती झाली ती कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरण्याएवढीच. यात नफा करून घेतात त्या विविध कंपन्या व जाहिरातवाले.

जगात काही देशांमध्ये स्त्री-आरोग्याचा विचार करून मासिक पाळीच्या दिवशी सुट्टी घेण्याची मुभा असते. मासिक पाळीची सुट्टी किंवा ‘मेन्स्ट्रुअल लीव्ह’ किंवा ‘पिरीएड लीव्ह’ म्हणून स्त्रियांना सुट्टी देण्यात येते. स्त्रियांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी देणारा जपान हा पहिला देश आहे. ज्या महिलांना वेदनादायी पाळी येते त्यांना ‘फिजिऑलॉजिकल लीव्ह’ देण्यात येते. चीन, तैवान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया या काही देशातही महिलांना दोन दिवस ज्यादा सुट्टी देण्याचा कायदा आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भारतातही ‘पिरीएड लीव्ह’ हा प्रकार सुरू झाला आहे. मुंबईतली कल्चर मशीन आणि गोझूपा ही डिजिटल मार्केटिंग करणारी कंपनी अशा प्रकारची सुट्टी महिलांना देते. स्त्रीच्या आरोग्याच्या दृष्टीने असा विचार शासकीय-बिनशासकीय स्तरावर व्हायला हवा!

दर महिन्यात चार दिवस मासिक पाळीच्या काळात काही स्त्रियांना त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान पोट दुखणं, कंबर दुखणं, क्रँप्स येणं किंवा पोटरीत गोळे येणं, पाय दुखणं, थकवा असे अनेक त्रास होतात. सगळ्याच स्त्रियांना असे त्रास होत नाहीत. पण मासिक पाळीदरम्यान थकवा येण्याचा त्रास बहुतांश स्त्रियांना होतो. या दिवसात त्यांची कार्यक्षमता कमी होते, पण काही महिला ओढून ताणून काम करत राहतात, ज्यामुळे शरीर थकते व मानसिक ताणही येतो. बर्‍याच स्त्रियांना मासिक पाळीच्या आधी किंवा मासिक पाळीदरम्यान ‘मूड स्विंग’सारख्या मानसिक तणावाच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार आपल्या शास्त्रकारांनी पूर्वीच केला, म्हणून तर रजःस्वला परिचर्या सांगितलेली आहे. धर्मशास्त्रानुसार या काळात अशुचित्व मानलेले आहे, ते स्त्रीच्या संरक्षण हेतूने. ती अंधश्रद्धा नव्हे किंवा जुनाट बुरसटलेले विचार नव्हेत. त्या काळी कोणतीही गोष्ट पटवायला धर्माचा आधार घेतला म्हणजे ती गोष्ट सर्वसामान्याला चटकन समजायची. त्यामुळे पापभीरू, देव मानणारे लोक असल्याने धर्माच्या आधारे सांगितल्यास नियमांचे पालन करत. सर्वसामान्यांमध्ये अज्ञान जास्त असल्याने कारणमिमांसा समजत नसे पण देवादिकांकडील शुचिता-अशुचिता नक्की समजत असे. पाळीच्या दरम्यान बायकांना विश्रांती द्यावी असे नुसते सांगितले असते तर कदाचित पुरुष वर्ग म्हणा किंवा स्त्रीवर्गानेही पालन केले नसते. आजच्याच स्त्रिया काम करतात असे नव्हे तर त्याकाळीसुद्धा स्त्रिया शारीरिक व बौद्धिक काम करायच्या. आता फक्त स्वरूप बदलले आहे.

पाश्‍चात्त्य देश आपल्या भारतीय संस्कृतीचा खोल अभ्यास करत आहे. भारतामध्ये जे हुशार विद्वान जन्माला येतात त्याचे बीज कुठेतरी शास्त्रकारांनी रचलेल्या संस्कृतीतच आहे असे म्हणायला हरकत नाही. उत्तम अपत्य जन्मासाठी जन्मधात्री म्हणजे पर्यायाने आर्तव धातु उत्तम हवा म्हणजेच सूक्ष्मात विचार केल्यास रजःस्वला स्त्रीची परिचर्या योग्य नको का? हाच विचार पुढे नेऊन काही देशांनी महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान रजा देण्याचा कायदा केला. तसेच २८ दिवसांची मेन्स्ट्रुअल सायकल असल्याने २८ मे हा जागतिक महिनावारी स्वच्छता दिवस (मेन्स्ट्रुअल हायजीन डे) म्हणून पाळला जातो.
रजःस्वला स्त्रीची लक्षणे –
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे साधारण एक महिना भरत आला की प्राकृत रीतीने स्त्रीच्या स्तनांमध्ये जडत्व, कटी-उरू-वंक्षण यांमध्ये जडत्व निर्माण होते. रजःस्राव पूर्णपणे सुरू होईपर्यंत पाय, पोट, कंबर, छाती यांमध्ये वेदना जाणवतात. या वेदना वाताच्या परिवहनामुळे निर्माण झालेल्या असतात. साधारणपणे पहिल्या दिवसाचा स्राव गेल्यानंतर वेदनांचा आपोआप उपशम होतो. वेदना कमी न झाल्यास, स्रावाचे आधिक्य असल्यास, अधोभागी किंवा कटीमध्ये वेदना अधिक असल्यास हे प्राकृतिक नव्हे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे औषधयोजना करावी.

मासिक पाळीदरम्यान दिसणारी लक्षणे –
– ओटीपोटी दुखणे, कंबर दुखणे
– पायात गोळे येणे
– डोके दुखणे
– उलटी येणे
– चक्कर येणे
– अंगावर स्राव जास्त जाणे
– अंगावर रक्तस्राव कमी होणे
– पाळीदरम्यान शरीरावर चट्टे उठणे, खाज येणे
– अंगाचा दाह होणे, योनीप्रदेशी दाह होणे
– अंग जड होणे
– सारखी झोप येणे
– चिडचिड वाढणे, राग येणे.
– पाळी कधी लवकर येणे, कधी उशिरा येणे.
– पाळीमधील अनियमितता इत्यादी.
कोणीही कितीही सांगितले की ही लक्षणे नैसर्गिक आहेत, तरीही ही लक्षणे नैसर्गिक नाहीत. आईला हा त्रास होतो म्हणजे मुलीलाही हा त्रास सहन करावा लागेल किंवा असाच त्रास मुलीलाही होईल, असे म्हणणे साफ चुकीचे आहे. योग्य औषधोपचार केले व आयुर्वेदशास्त्राप्रमाणे सांगितलेल्या रजोदर्शनादरम्यान परिचर्या केल्यास मासिक पाळीदरम्यान दिसणार्‍या बर्‍याच लक्षणांवर आपण मात करू शकतो.
रजोदर्शनादरम्यान देवळात जाऊ नये किंवा कोणतीही शुभ कार्ये करू नये हा एकच संदर्भ लक्षात घेऊन आजची पिढी- का नाही, मी करणारच, मी जाणारच म्हणून हेकेखोरी करते आहे पण त्यामागचे प्रत्यक्ष शास्त्र मात्र समजून घेण्याचे शहाणपण दाखवत नाही.
रजःस्वला स्त्री परिचर्या –
धर्मशास्त्रानुसार या काळात अशुचित्व मानलेले आहे, परंतु जे स्त्रीच्या संरक्षणासाठी असावे, कारण योनिमार्ग या काळात मोकळा असतो, रजस्राव होत असतो आणि सर्व शरीरातील सारभूत रक्त वाहणार्‍या केशवाहिन्या या गर्भाशयाशी संलग्न असतात. त्यामुळे या काळात सांसर्गिक रोग चटकन लागण्याची शक्यता असते. म्हणून अशा स्त्रियात मिसळणे किंवा एकमेकांचे कपडे वापरणे या काळात अजिबात करू नये.
रजोदर्शनानंतर, तीन रात्रीपर्यंत रजःस्राव होत असल्यामुळे या काळात जड अन्न व पोट भरून खाणे टाळावे. कारण यामुळे वायूच्या गतीला बाधा पोचते. म्हणून क्षैरेय म्हणजे दुधापासून तयार केलेले पदार्थ व यवापासून तयार झालेले पदार्थ जे कोष्ठशोधन व कर्षण करतात तेच खावेत असे सांगितले जाते.

रजोदर्शनादरम्यान रजस्वरूप संचित रक्त शरीराबाहेर जात असते त्यामुळे थकवा जाणवतो म्हणून या काळात मधुर-अम्ल रसात्मक फळे किंवा फलरस घ्यावा. पचायला हलके अन्न खावे, दूध प्यावे जेणेकरून शरीराचे व मनाचे तर्पण होईल.
या काळात वातवृद्धी होत असते म्हणून योग्य विश्रांती सांगितलेली आहे. कारण काम करण्याने, हालचाल करण्याने, प्रवास करण्याने वाताची अजूनच वृद्धी होते व वेदना, स्रावाधिक्यासारखी लक्षणे उत्पन्न होतात.

– या काळात मृदू रेचक औषधे घेतल्यानेही फायदा होतो. कारण अपान वायुची दुष्टी झालेली असते. म्हणून मलावष्टंभासारखी लक्षणे या काळात उत्पन्न होतात. मलावष्टंभ उत्पन्न झाल्यास ओटीपोटी दुखणे, स्राव कमी होणे यासारखी लक्षणे उत्पन्न होतात.
तीन दिवसांपर्यंत नटणे, अलंकार धारण करणे यांचा निषेध सांगितला आहे. कारण या दिवसांत ब्रह्मचर्य पाळणे अपेक्षित आहे. म्हणून पतीचे लक्ष स्त्रीकडे जाऊ नये यासाठी हे सांगितले आहे. त्या काळात संबंध आल्यास दोष बहिःप्रवृत्त असल्याने अपत्यनिर्मिती चांगली होत नाही व पतीला महाभयंकर विकार होण्याची शक्यता असते.
– योनिमार्गातून स्राव जात असल्यामुळे रजस्राव चालू असताना खेळणे, उड्या मारणे, नाच मारणे, जास्त सायकलिंग करणे या गोष्टी करू नयेत.
– शास्त्रकारांनी या काळात स्नानाचा निषेध केला आहे. परंतु तीन दिवसांपर्यंत जास्त अंग चोळून स्नान करू नये. कारण गर्भाशयाकडे जाणारा रक्तप्रवाह हा तिर्यकगामी होण्याची शक्यता असते आणि स्राव व्यवस्थित जात नाही. परंतु या ठिकाणी कटी, उरू व योनिभागी गरम पाण्याचा परिषेक करणे व त्या ठिकाणी शुचिता राखणे आवश्यक आहे. म्हणून भरपूर गरम पाणी घेऊन कटी व उरू भाग शेकून काढावा.
– या काळात शिरःस्नानाचा निषेध आहे. चौथ्या दिवशी मात्र शिरःस्नान करावे. हे सगळे नियम गर्भाशयाच्या सुस्थितीसाठी व आरोग्यासाठी सांगितलेले आहेत.
दर्भसंस्तरशायिनी अशा वर्णनातही ब्रह्मचर्यपालन व्हावे हाच मुख्य उद्देश आहे. तीक्ष्ण, उष्ण, अम्ल व लवण पदार्थ जास्त खाऊ नयेत.
चौथ्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून, शुद्ध वस्त्र परिधान करून, अलंकार धारण करून पतीसन्मुख व्हावे. हे सर्व नियम योनिशुचिता राखण्यासाठी व चांगल्या अपत्यनिर्मितीसाठी सांगितलेले आहेत.
असा सूक्ष्मतम विचार आयुर्वेदशास्त्राने जो मांडला होता तो केवळ स्त्रीच्या आरोग्यासाठीच!!

सद्यकालीन ऋतुमतीचर्या –
आजच्या काळात अगदी तंतोतंत अशी ऋतुमती रजःस्वलाचर्य जरी अवलंब करता येत नसली तरी काही गोष्टी आपण नक्की टाळू शकतो.
– मासिक पाळीच्या काळात अधिक श्रम करू नये.
– अधिक वजन उचलू नये.
– योनिशुचिता राखणे आवश्यक आहे. त्यासाठी कपड्याऐवजी सॅनिटरी पॅड वापरावे. दिवसातून किमान तीन ते चार वेळा पॅड बदलावे.
– मनःक्षोभक गोष्टी व कर्मे टाळावीत.
– खेळणे, धावणे, पोहणे इ. क्रिया वर्ज्य कराव्यात, टीव्हीवर कितीही जाहिराती दाखवल्या तरी त्या काळात अशा प्रकारच्या हालचाली केल्या तर वाताचा प्रकोप होऊन विविध व्याधी उत्पन्न होतात. अगदीच एखाद्या खेळाडू महिलेचे कार्यच जर खेळणे हेच असेल, व तिला विशेष त्रास होत नसल्यास काळजी घेऊन खळण्यास, धावण्यास, पोहण्यास हरकत नाही पण केवळ ईर्षेपोटी आम्ही काही जुनाट विचारांचे नाही किंवा मागासलेले नाही, आपण विज्ञान युगातील आहोत म्हणून साहस करू नये.
– स्नान करताना कंबर, योनिभागी गरम पाण्याचा परिषेक करावा व अंग जास्त चोळू नये. त्यामुळे रजःस्रवाचे प्रमाण कमी होते.
– या काळात गुरू आहार, चटपटीत आहार, चायनीज, फास्ट फूड, जंक फूड खाऊ नये. दूध, यव असा आहार घ्यावा. आहार पचायला हलका असावा. पोटात गॅस होऊ देऊ नये. कोठा साफ राहू द्यावा. गरम पाणी व ओवा खावा, जेणेकरून वाताची वृद्धी होणार नाही.
– आहारात स्त्रीने तूप, दूध, उडीद, मुगाचे-तुरीचे वरण, सर्व प्रकारची कडधान्ये, सर्व पालेभाज्या, डाळिंब, मोसंबी यांसारखी रसाळ फळे आणि डाळिंब, अंजीर, पेरू अशी बहुबीज फळे खावीत. रक्तवर्धक तसाच शुक्रवर्धक असा आहार घ्यावा.
* अहळीव – आर्तवनिर्मितीसाठी अहळीव फार उपयोगी पडतो. मलावष्टंभ दूर करून, वातानुलोमन करून बीजभागापर्यंत जाऊन पोचते. आर्तव धातूच्या वृद्धिसाठी वापरत असताना प्रायः भिजत टाकून खीर करून किंवा लाडू करून त्याचा उपयोग करावा.

* खारीक – फलकोषांवर कार्य करणारे दुसरे औषध म्हणजे खारीक. खारीक शुक्रापर्यंत जाऊन पोचणारी व अस्थिमज्जेला बल देऊन आर्तवाला वाढवणारी आहे. कटिराच्या अस्थी सुदृढ होतात व फलकोषांचे कार्य व्यवस्थित चालण्यास मदत होते.
* खोबरे – हे ओले किंवा वाळलेले असो हे बीजवाहिन्यांतील अवकाशातील वायूचे नियमन करून आर्तव वाहिन्यातील पोकळी कायम राखण्याचे काम खोबरे करते. अशा प्रकारे खारीक-खोबरे खाऊनही आर्तवधातुची वाढ होते.

हे साधे साधे योग आहार्य द्रव्य असूनही औषध म्हणून उपयोगी पडतात. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड, चारोळ्या, सुके अंजीर यांचा उपयोग आर्तवधातू वाढवण्यात होते. भुईकोहळा, आवळकठीस गोखरू, अश्‍वगंधा, शतावरी, शतपुष्पा या औषधांचा प्रकृतीनुसार वापर केल्यास उत्तम उपयोग होतो.
‘मेन्स्ट्रुअल हायजीन डे’ला फक्त मासिक धर्माच्या काळातील स्वच्छतेचाच विचार न होता रजःस्वला स्त्री-परिचर्येचा जागतिक विचार व्हावा!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

महिलांचे अर्थार्जन

नीना नाईक दोन वर्षांत यश-अपयश, बेरीज-वजाबाकी यात प्रेम, द्वेष, आत्मीयता हे उघड झाले. कुठलाही व्यवसाय करताना… कोरोनाने हे...

‘डिटॉक्स डाएट’ म्हणजे काय?

वर्षा भिडे(आहारतज्ज्ञ) डिटॉक्स आहाराची गरज असेल तरच आणि व्यावसायिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा अवलंब करा, अन्यथा ते प्रकृतीसाठी त्रासदायक...

‘कॉलेजविश्व’

शुभंकर जोगजीव्हीएम्स जीजीपीआर कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स, फर्मागुडी मागची काही वर्षे आपण बघतोय ही कोरोना महामारी चालू आहे ज्यामुळे आपल्याला...

गोव्यातही खेला होबे!

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने सध्या लोकप्रिय घोषणांच्या आतषबाजीत गोव्याचे राजकीय वातावरण ढवळून काढलेले असताना तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूलच्या युतीसाठी शरद पवार प्रयत्नशील

>> राज्यातील नेत्यांनी मुंबईत घेतली भेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार चालवल्याच्या पार्श्‍वभूमीवर...

ALSO IN THIS SECTION

विरुद्धाशन म्हणजे काय?

डॉ. मनाली म. पवार या कोरोना महामारीच्या काळात आहाराला किती महत्त्व आहे हे सगळ्यांनाच पटलेले आहे. आहार कसा...

शास्त्रशुद्ध साधना महत्त्वाची

योगसाधना - ५२०अंतरंग योग - १०५ डॉ. सीताकांत घाणेकर मन व्यापक करण्याचे अनेक उपाय आहेत....

टॉन्सिल्सवर येणारे व्रण

डॉ. आरती दिनकर(होमिओ. तज्ज्ञ व समुपदेशक) टॉन्सिल्स म्हणजेच उपजिव्हापिंडाचे व्रण. हे दोन प्रकारचे असतात- साधे व चरणारे व्रण....

सॅनिटायझेशन – मास्क – सोशल डिस्टंसिंग (एस्‌एम्‌एस्)

डॉ. मनाली पवार हे जे कोरोना योद्धा दिवसरात्र कार्यरत आहेत, ते तुमच्या सर्वांच्या हितासाठीच. त्यामुळे घरात- बाहेर कुठेच...

भारतीय संस्कृतीची महती

योगसाधना - ५१६अंतरंग योग - १०१ डॉ. सीताकांत घाणेकर भारतीय संस्कृतीतील अशा गोष्टी अत्यंत विलोभनीय...