22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

स्तन कर्करोग जनजागृती

 • डॉ. मनाली पवार

भारतात स्तनाचा कर्करोग सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रियांमधील कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२ टक्के आहे. भारतात कर्करोग झाल्यानंतर पाच वर्षांनंतर जिवंत राहण्याचे प्रमाण फक्त ६० टक्के आहे. कारणे आहेत- अज्ञान, आरोग्याविषयी अनास्था आणि उशिरा निदान होणे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे.

१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीचा महिना म्हणून राबवण्यात येतो. भारतात स्तनाचा कर्करोग सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रियांमधील कर्करोगांपैकी स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २५ ते ३२ टक्के आहे. भारतात कर्करोग झाल्यानंतर पाच वर्षांनंतर जिवंत राहण्याचे प्रमाण फक्त ६० टक्के आहे. कारणे आहेत- अज्ञान, आरोग्याविषयी अनास्था आणि उशिरा निदान होणे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. यासाठीच दरवर्षी पूर्ण ऑक्टोबर महिना ‘स्तन कर्करोग जनजागृती महिना’ म्हणून घोषित केला आहे.
कुठल्याही प्रकारच्या कर्करोगाचे निदान लवकर होण्यासाठी जागरूकतेची गरज आहे. जागरूकता नसल्याने कर्करोगाचे निदान नेहमी उशिरा होते व चिकित्सेचा फायदा होत नाही. बर्‍याच वेळा स्त्रिया स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करताना आढळतात. त्यामुळे किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. खरे तर ही लक्षणेच ‘धोक्याची सूचना’ देणारी असतात, जी लक्ष न दिल्याने संबंधित डॉक्टर कर्करोगाच्या निदानापर्यंत पोहचू शकत नाही.

स्तनाचा कर्करोग किंवा ब्रेस्ट कँसर म्हणजेच स्तनामध्ये उद्भवणारी गाठ. एकाच ठिकाणी वाढत जाणारी व हाताला कठीण लागणारी गाठ म्हणजे कर्करोगाची गाठ असू शकते. महिलांमध्ये साधारणपणे वयाच्या तिथीपासून कर्करोगाची गाठ वाढण्याचा धोका अधिक असतो. या गाठी दुखत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यात सहज बराच काळ निघून जातो. प्राथमिक अवस्थेत गाठीवर शस्त्रक्रिया केल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे सुरुवातीलाच निदान करणे खूप महत्त्वाचे आहे.

‘सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन’ किंवा ‘स्वतःच्या स्तनांची तपासणी’ –
स्वतःच स्वतःच्या स्तनांची तपासणी करणं म्हणजे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन होय. कर्करोगतज्ज्ञांच्या मते घरच्या घरी सोप्या पद्धतींनी पुरुष व स्त्रियांनी स्तनांचे परीक्षण करावे. स्तनांमध्ये अचानक बदल झालाय का? स्तनांमध्ये काही वेगळेपण आहे का? याकडे लक्ष द्यावे. चाळिशीपुढे तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. पण २० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांमध्येही हे प्रमाण वाढतंय. या मुली किंवा महिलांमध्ये स्वतःच्या स्तनांची तपासणी कशी करायची याबाबत जागरूकता नाही. स्वतःच स्तनांची तपासणी केल्याने स्तनांच्या कर्करोगाचं निदान होण्यास मदत मिळते.
स्वतःच्या स्तनांची तपासणी कशी कराल?-
याचे दोन प्रकार आहेत. १. आरशासमोर उभं राहून आणि २. झोपून.

 • स्तनांचा आकार, रंग बदलला आहे का पाहणे.
 • स्तनांना सूज आहे, स्तन लाल झालेले आहेत, व्रण आहे का ते पाहणे.
 • स्तनाग्रांची (निपल्स) जागा बदलली आहे का ते पाहणे.
 • स्तनाग्रे आतील बाजूस वळलेले आहेत का ते पाहणे.
 • स्तनाग्रातून पाणी, रक्त किंवा पिवळ्या रंगाचा पदार्थ येतो आहे का ते पाहणे.
 • हाताच्या तीन बोटांनी स्तनांच्या वर-खाली, डाव्या-उजव्या बाजूला आणि त्यानंतर गोलाकार पद्धतीने पूर्ण स्तनांवर हात फिरवून पाहणे.
 • तीन बोटांच्या मदतीने काखेत हळूहळू दाब द्यावा.
  स्तनांची तपासणी केव्हा करावी? –
 • मासिक पाळीनंतर चार- पाच दिवसांनी करावी.
 • स्तन मऊ असताना करावी.
 • मासिक पाळी बंद झालेल्यांनी महिन्यातून एकदा स्तनांची तपासणी करणं आवश्यक आहे.
  लक्षात घ्या… स्तनांच्या तपासणीसाठी फक्त तीन ते पाच मिनिटेच लागतात. प्रत्येक मुलीने मासिक पाळीनंतर सहाव्या- सातव्या दिवशी स्तनांची तपासणी केली व चाळिशीनंतर किंवा पाळी बंद झालेल्या महिलांनी महिन्यातून एकदा जरी स्तनांची तपासणी केली तर एखादी गाठ आढळल्यास लगेच समजते व निदान लवकर, प्राथमिक अवस्थेत व्हायला मदत होते. अशी गाठ साधी जरी असली तरी त्याची तपासणी करणे आवश्यक असते.

स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती? –

 • स्तनाग्रातून पाणी किंवा रक्त येणे
 • स्तन किंवा काखेत कायम दुखणे
 • स्तनाग्रांचा आकार व जागा बदलणे
 • स्तनांवरील त्वचेत बदल होणे
 • स्तनांच्या आकारात बदल होणे
 • स्तनांमध्ये गाठ जाणवणे
 • स्तनाग्रांच्या आजूबाजूला लाल होणे किंवा पुरळ येणे
  कोणत्याही प्रकारच्या कर्करोगामध्ये सतत थकवा जाणवणे, अचानक वजन भराभर कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. हीच लक्षणे स्तनाच्या कर्करोगामध्येही आढळतात.
 • त्याशिवाय एक स्तन दुसर्‍यापेक्षा आकाराने लहान होणे
 • स्तनांमध्ये सतत दुखणे ही लक्षणे उद्भवणार्‍या आजाराची सूचक असू शकतात. लवकर निदान झाल्यास स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो.
  स्तनाच्या कर्करोगाची कारणे –
  कोणत्याच कर्करोगाची विशिष्ट अशी कारणे सांगता येत नाही.
 • आनुवंशिक कारणांमुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
 • वयाच्या १२व्या वर्षापूर्वीच मासिक पाळी सुरू झाली असल्यास.
 • वयाच्या ५५ व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास.
 • व्यसनाधीनतेमुळे
 • लठ्ठपणा असलेल्या महिला, अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहाराचे सेवन करणार्‍या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
 • सौंदर्याच्या लक्षणांत स्तनांच्या आकाराला फाजील महत्त्व दिले जाते आणि त्यामुळे तेथील मेदोभाग वाढवण्यासाठी प्रयोग केले जातात. निरनिराळे लेप, तेल व पोटात घेण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. त्याचा परिणाम फलकोषांबरोबर अंतस्त्रावी ग्रंथींवरही होत असतो. त्यामुळे निर्माण होणारा मेदोभाग हा कित्येक वेळेला रक्तसंवहनाला अडथळा निर्माण करतो व स्तनरोगाला सुरुवात होते. हा धोका लक्षात घेऊन आकाराला फाजील महत्त्व न देता प्राकृत स्तन सुडौल व घाटदार कसे राहतील यासाठी योग्य तो आहार, विशिष्ट योगासने यांचा उपयोग केल्यास विकार न होता स्तन संपन्न सुदृढ राहील.
  चाळिशीनंतर प्रत्येक महिलेने कोणत्या तपासण्या कराव्या?-
 • मॅमोग्राफी ः या तपासणीमध्ये क्ष-किरणांनी स्तनांच्या आतील रचना सुस्पष्ट करून दाखविण्याचे काम केले जाते.
 • सोनोमॅमोग्राफी ः स्तनांची सोनोग्राफी करणे. ही सध्या जास्त प्रचलित आहे. स्त्रियांनी चाळिशीनंतर ही तपासणी नक्की करून घ्यावी.
 • बायॉप्सी ः गाठ आढळल्यास गाठीचा एखादा छोटा भाग काढून घेऊन त्याचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करणे.
  अशा प्रकारे प्रत्येक स्त्री व पुरुषाने स्वतःच स्वतःच्या स्तनांची तपासणी प्रत्येक महिन्याला करावी व स्तनाच्या कर्करोगाचा धोका टाळावा.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION