- डॉ. मनाली महेश पवार
जागतिक स्तन्यपान सप्ताह हा दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश माता आणि बालकांसाठी स्तन्यपानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि स्तन्यपानाला प्रोत्साहन देणे आहे. आजची अष्टभुजाधारी स्त्री नेहमी व्यस्त राहत असल्याने, स्तन्यपानाचे महत्त्व सांगणारा हा लेख…
जागतिक स्तन्यपान सप्ताह हा दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. या सप्ताहाचा उद्देश माता आणि बालकांसाठी स्तन्यपानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि स्तन्यपानाला प्रोत्साहन देणे आहे. आजची अष्टभुजाधारी स्त्री बऱ्यापैकी तांत्रिक झाली आहे. करिअर ओरिएंटेड, नोकरदार, स्वतःच्या पायावर उभी असण्याची जिद्द अशा काहीशा कारणांनी लग्नाचे वय थोडेसे लांबले आहे, पाळी यायचे वय कमी झाले आहे. या सगळ्या चक्रात वंध्यत्वाचे प्रमाण वाढत आहे. पाळीच्या तक्रारी लाक्षणिकरीत्या वाढल्या आहेत. योग्य वयात मुले न झाल्याने औषधोपचारांचा मारा शरीरावर होत आहे व याचाच परिणाम म्हणजे बाळंतपणानंतर स्तन्यनिर्मिती व्यवस्थित न होणे व झाल्यास बाळाला दूध पाजायला आईकडे पुरेसा वेळ नसणे. पूर्वी आया दोन-दोन वर्षे बाळाला व्यवस्थित दूध पाजायच्या. परिणामी, आई व बाळामध्ये एक अतूट भावनिक बंध तयार व्हायचे.
स्तन्यपानाचे महत्त्व
आजही ‘आई’ तीच आहे, म्हणून तिला तिचं बाळ निरोगी, हुशार, गुटगुटीत, हसरं असावं असं वाटतं. तिच्यामध्ये व बाळामध्ये ती भावनिक वात्सल्याची वीण जोडली जावी हे आजही तिला गरजेचे वाटते. बाळंतपणानंतर ती अनेक टप्प्यांतून जात असते. हार्मोन्सच्या असंतुलनामुळे कधी नैराश्य, कधी चीडचीड होत असते. अशा वेळी संपूर्ण कुटुंबाने तिच्या पाठीशी उभे राहाणे आणि स्तन्यपानाला प्रोत्साहित आवश्यक असते.
स्तन्यपानाचे महत्त्व
- आईचे दूध हे बाळासाठी पौष्टिक सर्वोत्तम अन्न आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर प्री-बायोटिक व प्रो-बायोटिक ने युक्त. रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा व कोवळ्या पचनसंस्थेवर उपयुक्त ‘रेडी टू यूज’ असा तो परिपूर्ण आहार आहे.
- वयानुसार, गरजेनुसार बाळाला कार्ब्स, प्रथिनं, फॅट्स, जीवनसत्त्वे आणि पाणी यांचा ‘कोम्बो पॅक’ आहे.
- ‘मागणी तसा पुरवठा’ या न्यायानुसार बाळाच्या मागणीनुसार नेहमी ताज्या स्वरूपात आणि योग्य तेवढाच पुरवठा होतो.
- आईचे दूध म्हणजे अनेक रोगजंतूपासून बचाव करणारी एक ‘लस’च असते. रोगजंतूविरोधी ॲण्टिबॉडिजही आईच्या शरीरात तयार होतात व ती प्रतिजैविके दुधातून बाळाच्या पोटात जातात व बाळाला संरक्षक-कवच मिळते.
- बाळंतपणानंतर लगेच येणारं चीक दूध हे बाळाच्या सर्व गरजा भागवतं, म्हणजे हे दूध ‘सुवर्णप्राशन’तुल्य म्हणायला हरकत नाही. हे दूध उत्तम रसायन आहे. जीवनसत्त्वे व रोग प्रतिकारशक्ती देणाऱ्या घटकांनी ओतप्रोत भरलेले असते.
- बाळंतपणानंतर किमान सहा महिने बाळाला फक्त आणि फक्त आईचंच दूध पाजण्यास बाळंतिणीला प्रोत्साहित करावे.
- दोन वर्षांपर्यंत स्तन्यपान केलेल्या बालकांमध्ये बुद्धिमत्ताविकास विशेष पाहायला मिळतो.
- बालकांप्रमाणे स्तन्यपान देणे हे मातांसाठीही फायदेशीर आहे.
- स्तन्यपान केल्यास प्रसूतीनंतर गर्भाशय लवकर पूर्ववत होण्यास मदत होते.
- काही विशिष्ट कर्करोगांचा धोका कमी होतो.
- वजन कमी करण्यास मदत होते.
- माता व बालकामध्ये भावनिक नातेसंबंध मजबूत बनतात.
स्तन्यनिर्मिती कशी होते?
गर्भधारणा झाल्यावर दर महिन्याला येणारी पाळी बंद होते, हेच गर्भिणी अवस्थेचे पहिले लक्षण आहे. अधोमार्गाने जाणारे थांबले तरी संचित होणाऱ्या रजाचे तीन भाग होतात. एक भाग उर्ध्वगामी होतो आणि स्त्रीच्या स्तनातील रसावह स्रोतसे विवृत्त करू लागतो. त्यामुळे स्तनभागी काठिण्य, पुष्ठता निर्माण होते. मंडलाकार जागी जास्त काळेपणा वाढतो व चुचूक ही जास्त कृष्णवर्णी होतात. साधारण दोन महिने पूर्ण झाल्यापासून तिसरा महिना पूर्ण होईपर्यंत स्तनामध्ये अशाप्रकारे बदल जाणवतात. प्रसूतीनंतर स्तनातील रसावह स्रोतसे अधिक कार्यक्षम होऊन, कफदोषाच्या आलयाने श्वेतत्व आणून बाळंतपणानंतर स्तन्यनिर्मिती करतात. म्हणूनच गर्भिणी अवस्थेपासूनच गर्भिणीचा आहार-विहार उत्तम पाहिजे.
योग्य स्तन्यनिर्मितीसाठी आहार
- योग्य स्तन्यनिर्मितीसाठी गर्भिणी अवस्थेपासूनच आपल्या आहारात बदल करावा. आहार हा हृद्य म्हणजे गर्भिणीला आवडेल असा मधुर, अम्ल व द्रव असा असावा.
- दूध, तूप, खीर, पायस, फळे (पपई व अननस सोडून सर्व फळे), फळांचा रस, सर्वप्रकारच्या भाज्या, उसळी, कडधान्यांचे यूष, जीवनीय अशा प्रकारचा आहार, ताज्या पालेभाज्या खाव्यात.
- दुधाचा वापर अधिक करावा.
- दूध, तूप, लोणी किंवा लाडू, खीर, मिष्ठान्न यांचा उपयोग करावा.
- वरण-भात, तूप, लिंबू, भाजी, पोळी, आमटी, ताक, लोणी, सुकामेवा (अंजीर, मनुका, जर्दाळू, बदाम, बेदाणे), चारोळ्या, शिंगाडे, साळीच्या लाह्या, खडीसाखर हे पदार्थ खावेत.
- औषधामध्ये अश्वगंधा, शतावरी, गोखरू, भुईकोहळा, ज्येष्ठमध आणि जीवनीय गणातील द्रव्ये यांचा नित्य वापर करावा.
- मांसाहारी लोकांनी दुधाऐवजी मधुर आणि लवण असा मांसरसही घेण्यास हरकत नाही.
स्तन्यवाढीसाठी बाळंतिणीचा आहार
- कच्चा डिंक, तुपात घोळलेले केशर एक चमचा साजूक तुपाबरोबर तीन दिवस द्यावे. त्याने रक्तवाढ होते.
- त्यानंतर सुंठ + तूप + साखर सकाळी घ्यावी.
- कच्च्या डिंकाचा लाडू पहिल्या दहा दिवसांत खावा.
- कच्च्या डिंकानंतर खिरी द्याव्यात. या खिरींमुळे बालकाला सकस दुधाचा पुरवठा होतो.
1) खारीक-बदाम खीर.
2) खसखस-बदाम खीर.
3) अहळीवाची खीर.
4) कापसाच्या सरक्यांची खीर.
5) कणिक तुपात भाजून, दूध घालून केलेली खीर.
अशाप्रकारे खिरी दिल्याने स्त्रीच्या पोटात दूध तर जातेच, शिवाय वायूचा अपशय होतो, बल प्राप्त होते व बालकाला उत्तम दुधाचा पुरवठा होतो. - सकाळी अभ्यंग, परिषेक, स्नान, धूपन, स्वेदन आणि उदरवेष्टन, खाणे व नंतर निद्रा असा स्त्रीचा उपक्रम असावा.
- बालकाने स्तन्यपान केल्यानंतर स्त्रीला भरपूर भूक लागली पाहिजे, म्हणून दुपारच्या जेवणात वरणभात, मेथी, दुधी, पडवळ यांपैकी भाजी, आमटी, गरमागरम पोळी तुपाबरोबर खाण्यास द्यावी.
- लसणीचे तिखट, मुरलेले लिंबाचे लोणचे द्यावे.
- या सर्व आहारामुळे वाताचा उपशय होऊन रसायन या लसणीच्या गुणधर्माचा पुनर्नवीभवनासाठी उपयोग होतो.
- सूतिकेच्या मधल्या वेळच्या खाण्यातही लसणीचा उपयोग करावा. उदा. तांदळाची धिरडी, उकड, आंबोळी, तिखट मिठाचा सांजा यांत लसणीचा वापर करावा.
- वड्यांमध्ये सुंठ, गूळ, तूप घातलेल्या सुंठीच्या वड्या, खसखस घालून केलेल्या आल्याच्या वड्या, बदाम घालून केलेल्या आल्याच्या वड्या द्याव्यात.
- मेथी, सुंठ, आले, लसूण, जुने तांदूळ, ओवा, आवडत असल्यास बाळंतशेपा, बडीशेप या सर्वांचा वापर करून रूचिपालट होऊन पथ्यकर अन्न तिच्या पोटात जाईल असे पाहावे. यामुळे सकस आणि भरपूर दुधाचा पुरवठा बालकाला होतो.
- साठेसाळी तांदळाचा मऊ भात, मुगाच्या डाळीची मेथी घालून केलेली खिचडी असा विविध प्रकारे वापर करावा.
- हे करून देणारे कोणी नसल्यास खारकेची पूड ओल्या खोबऱ्याबरोबर सकाळी खावी व वर दूध प्यावे.
- परिस्थिती नसल्यास नाचणीची कांजी द्यावी. असे चार वेळा बाळंतिणीला खायला द्यावे.
- दुपारी तूप लावून पोळी किंवा बाजरीची भाकरी द्यावी.
- दूध दोन वेळा द्यावे.
- हे शक्य नसल्यास कांजी, कढण असे द्रवपदार्थ बाळंतिणीच्या पोटात जातील याची काळजी घ्यावी. याचा परिणाम म्हणजे बालकाला सकस दूध मिळते.
- शतावरीसिद्ध दूध कमीत कमी तीन महिने किंवा सहा महिने बाळंतिणीला प्यायला द्यावे.
- शतावरी, अश्वगंधा, बला, विदारी, आवळा, सुंठ, गुळवेल, ज्येष्ठमध इत्यादी औषधांचा स्तन्यवाढीसाठी उपयोग करावा.

