गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने कुडचडे येथील कथित वासनाकांडाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी सोहम नाईक याने वासनाकांडासाठी वापरलेली कार जप्त केली आहे. संशयित सोहम नाईक याला दुसऱ्या एका लैंगिक अत्याचार प्रकरणात पुन्हा अटक केली असून त्याला 6 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला.
येथील बाल न्यायालयाने संशयित आरोपी सोहम नाईक याची एका लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये 14 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी मंगळवारी केली होती. त्यानंतर गुन्हा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या अत्याचार प्रकरणामध्ये संशयित सोहम नाईक याला अटक केली आहे. संशयित आरोपी सोहम नाईक याच्याविरोधात आत्तापर्यंत पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा विभागाकडून सोहम नाईक याने एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास केला जात आहे. संशयित आरोपी सोहम याने लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. जुलै 2025 ते 9 मार्च 2026 पर्यत हे लैंगिक अत्याचार केले. केपे तालुक्यातील एक धबधबा व इतर ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

