सोनिया गांधींविरुद्ध फोंडा पोलिसात तक्रार

0
8

‘वंदे मातरम्‌‍’चा अवमान केल्या प्रकरणी भाजप नेते नरेंद्र सावईकर आक्रमक

काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी नुकत्याच झालेल्या भारतीय स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्‌‍’चा अनादर केल्याची तक्रार गोवा प्रदेश भाजप उपाध्यक्ष नरेंद्र सावईकर यांनी फोंडा येथील पोलीस स्थानकात नोंदवली आहे.
17 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत नरेंद्र सावईकर यांनी म्हटले आहे की, 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथील काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारताचे राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्‌‍’ हे गायिले जात असताना सोनिया गांधी ह्या काही लोकांशी बोलत होत्या. तसेच हातवारेही करीत होत्या. त्याद्वारे त्यांनी वंदे मातरम्‌‍ हे गायिले जात असताना त्यात व्यत्यय तर आणलाच शिवाय या राष्ट्रीय गीताचा अनादरही केला असल्याचे सावईकरांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. या अवमान कृतीसाठी सोनिया गांधी यांच्यावर एफआरआर दाखल केला जावा. तसेच या एकूण घटनेची कसून चौकशी केली जावी, अशी मागणीही सावईकरांनी केली आहे.

या घटनेबाबत काँग्रेसने मात्र जाहीरपणे वेगळेच स्पष्टीकरण दिले असल्याचे नरेंद्र सावईकर यांनी म्हटले आहे. सोनिया गांधी ह्या त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत होत्या, असे पक्षाने म्हटले असून पोलिसांनी योग्य ती चौकशी करून सत्य काय आहे ते समोर आणावे, अशी मागणी सावईकर यांनी केली आहे.
संसदेने राष्ट्रीय सन्मान अवमान प्रतिबंधक कायदा 1971 मध्ये हल्लीच दुरुस्ती घडवून आणली आहे. त्याद्वारे ‘वंदे मातरम्‌‍’ हे राष्ट्रीय गीत गाण्यास जाणीवपूर्वक प्रतिबंध करणे व ते गायिले जात असताना अडथळा आणणे आदी कृत्यांसाठी 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या एकूण प्रकरणाची गंभीरपणे चौकशी केली जावी, अशी मागणी सावईकर यांनी आपल्या तक्रारीतून केली आहे.