सोनसोडोत कचरा प्रकल्पाला आग

0
184

सोनसोडो कचरा यार्डातील कचर्‍याला काल रविवारी सायंकाळी पुन्हा आग लागली. ती विझविण्यासाठी रात्रौ उशीरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान प्रयत्नांची शिकस्त करीत होते. मडगाव दलाचे चार बंब आग विझविण्यात मग्न होते.

आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात येताच विभागीय अधिकारी नितीन रायकार यांनी वेर्णा व फोंडा येथून आणखी दोन बंब मागविले. रस्त्यालगत कचर्‍याचे वर्गीकरण केले जाते व तो कचरा ठेवला होता त्याला आग लागली. तसेच टार्पोलीनने कचरा झाकला होता. तेथे आग पसरताच आगीने रौद्ररुप धारण केले.

शिमगोत्सवात गुंतलेले मुख्याधिकारी अजित पंचवाडकर, अभियंत्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले व कामाची माहिती घेतली.
या आगीमुळे परिसरांतील लोक घाबरलेले दिसले. जीवोत्तमनगर, कुडतरी व राय येथील लोकांनी सरकारच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला. काही महिन्यांमागे आग लागून कित्येक दिवसांपर्यंत विझविण्यात यश आले नव्हते. काल मातीचा थर टाकून विझविण्याचा विचार चालू होता.