सैन्य पंतप्रधानांच्या पायाशी नतमस्तक; मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

0
4

मध्यप्रदेशातील एका मंत्र्याने काही दिवसांपूर्वी कर्नल सोफिया कुरेशी यांना ‘दहशतवाद्यांची बहीण’ असे संबोधून भाजपाला अडचणीत आणल्यानंतर आता मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पायावर नतमस्तक आहे, असे विधान करून वाद निर्माण केला आहे.
मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा शुक्रवारी जबलपूर येथे नागरी संरक्षण स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण सत्रात बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवडा म्हणाले, माझ्या मनात खूप राग होता. लोक पर्यटक म्हणून तेथे गेले. तिथे, त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर आणि महिलांना बाजूला उभे केल्यानंतर, त्यांनी त्यांच्यासमोर पतीला गोळ्या घातल्या. मुलांसमोर गोळीबार केला. त्या दिवसापासून माझ्या मनात खूप राग होता. जोपर्यंत याचा बदला घेतला जात नाही आणि मातांचे सिंदूर पुसणारे आणि दहशतवाद्यांना वाढवणारे नष्ट होत नाहीत, तोपर्यंत आपण शांततेत श्वास घेऊ शकणार नाही. मी पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो आणि संपूर्ण देश, देशाचे सैन्य, सैनिक सर्व त्यांच्या पायाशी नतमस्तक आहेत.

काँग्रेसची भाजपवर टीका
काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी सदर विधानाबद्दल भाजपवर टीका केली आहे. भाजप नेत्यांकडून आपल्या सैन्याचा सतत होणारा अपमान अत्यंत दुर्दैवी आहे. प्रथम, मध्यप्रदेशच्या एका मंत्र्याने महिला सैनिकावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आणि आता त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांनी लष्कराचा घोर अपमान केला. या नेत्यांवर कारवाई करण्याऐवजी, भाजपा त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधींनी व्यक्त केली आहे.