सेल्फी काढण्याच्या नादात सत्तरीत दोघेजण बुडाले

0
12

>> एकाचा मृतदेह सापडला

सावर्डे सत्तरीतील तोणीर काजरेधाट धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी सांकवाळ वास्को येथून आलेले शशी सोमनल (१८) व गौरव रणधीरसिंग (१८) हे दोघेही सेल्फी काढण्याच्या नादात बुडाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केल्यानंतर शशी सोमनल याचा मृतदेह सापडला असून रात्री उशिरापर्यंत गौरव याचा शोध घेणे सुरू होते.

काल सोमवारी दुपारी तीन वाजता आठजणांचा गट तोणीर धबधब्यावर आला होता. यावेळी शशी व गौरव हे दोघेही सेल्फी काढताना एकाचा पाय घसरला. त्याला हात देत असताना दुसराही पाणयत पडला. ही घटना चार वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर वाळपई पोलिसांसह वाळपई अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी शोधकार्य सुरू केले. चार तासांच्या शोधकार्यानंतर शशी याचा मृतदेह सापडला पण गौरवबाबत काहीच थांगपत्ता लागला नाही. काळोख असल्याने शोधकार्य सुरू ठेवणे कठीण होते शेवटी साडेनऊ वाजता शोधकार्य बंद केले. आज मंगळवारी सकाळी परत शोधकार्य सुरू केले जाईल असे पोलीस उपनिरीक्षक गड्डी यांनी सांगितले.

शशी सोमनल हा एमईएस महाविद्यालयात शिकत होता. त्याला एक बहीण आहे. गौरव हा त्याच कॉलेजमध्ये अकरावीत शिकत आहे.