सेराफिनच्या निलंबनासाठी सुरक्षा रक्षकांचे उपोषण

0
130

आंदोलन करणार्‍या सुरक्षा रक्षकांपैकी काही महिला सुरक्षा रक्षकांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप असलेले पोलीस अधीक्षक सेराफीन डायस यांना निलंबित करावे या मागणीसाठी काल सुमारे १५० सुरक्षारक्षकांनी कामगार नेते ऍड. अजित सिंह राणे, स्वाती केरकर, ‘जनरेशन नेक्स्ट फॉर गोवा’ या भ्रष्टाचारविरोधी वाहिनीचे अध्यक्ष व कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत व काही बिगर सरकारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांसह एका दिवसाचे उपोषण केले. दरम्यान, सेराफीन डायस यांच्यावर आज सोमवारी पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्याचा निर्णय महिला सुरक्षा रक्षकांनी घेतला आहे.तद्नंतर संध्याकाळी आझाद मैदानावर पत्रकारांशी बोलताना ऍड. राणे यांनी सेराफिन डायस यांच्यावर जोरदार आरोप केला. शांततापूर्णरित्या आंदोलन करणार्‍या सुरक्षा रक्षकांपैकी काही महिलांवर लाठीहल्ला करून त्यांनी कायद्याचे उल्लंघन केले. महिला पोलीस असताना महिलांवर लाठीहल्ला करण्याचा त्यांना अधिकार नव्हता, असे ते म्हणाले. डायस यांची बदली राखीव पोलीस दलात करण्यात यावी, अशी मागणीही राणे यांनी यावेळी केली.
यावेळी बोलताना स्वाती केरकर म्हणाल्या की सेराफीन डायस यांच्याविरुध्द महिला सुरक्षारक्षक सोमवारी पणजी पोलीस स्थानकात तक्रार करणार आहेत.
दुर्गादास कामत म्हणाले की, सेराफिन डायस यांना लाठीहल्ला करण्याचा आदेश ज्येष्ठ पोलीस अधिकारी अथवा अन्य कुणाकडूनही मिळाला नव्हता. असे असूनही त्यांनी महिला सुरक्षारक्षकांवर हल्ला केला.
दरम्यान, काल सकाळी १० ते ५ पर्यंत उपोषण केलेल्यांना लिंबूपाणी दिल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले. शेवटी महिला रक्षकांनी सेराफिन डायस यांच्या प्रतिमेला काठीने बदडून काढले.