‘मॅसेेंजर ऑफ गॉड’ प्रकरण चिघळले
‘मॅसेंजर ऑफ गॉड’ या चित्रपटाला मान्यता दिल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅम्सन यांच्या राजीनाम्या पाठोपाठ काल बोर्डाच्या आणखी आठ सदस्यांनी राजीनामा दिला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली यांनी या विषयावरून कॉंग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे.आपल्या राजीनाम्यात आठही सदस्यांनी सेन्सॉर बोर्डावर सरकार दबाव आणत असल्याचा दावा करीत नाराजी व्यक्त केल्याने लीला सॅम्सन यांच्या आरोपांना पुष्टी मिळाल्याची चर्चा आहे.
मात्र केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अरुण जेटली व या खात्याचे राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी सरकारवरील या सर्वांचे आरोप फेटाळले आहेत. आपल्या मंत्रालयाने सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा दबावही आणला नाही. सॅम्सन यांनी तसे पत्र किंवा एसएमएस यासारखे पुरावेही सरकारला सादर करावेत. त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असे राठोड यांनी सॅमसन यांच्या राजीनाम्यानंतर स्पष्ट केले होते.
मॅसेंजर ऑफ गॉड या चित्रपटात डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम यांची प्रमुख भूमिका असून राम रहीम यांनी त्यात स्वतःला परमेश्वर म्हणून सादर केले आहे. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली नव्हती. मात्र परस्पर सरकारी हस्तक्षेपाने ती मान्यता देण्यात आली, असा दावा करण्यात आला आहे. लीला सॅम्सन यांनी प्रथम राजीनामा दिल्यानंतर काल सकाळी इरा भास्कर, लोरा प्रभू, पंकज शर्मा, राजीव मसंद, शेखर बाबू कंजरेला, शाजी करूण, शुभ्रा गुप्ता व टी. जी. थायमगराजन या आठ सदस्यांनी आपले राजीनामे मंत्रालयाला सादर केले. या सर्वांनी श्रीमती सॅम्सन यांचे समर्थन केले. अन्य काही कारणांबरोबरच या सदस्यांनी सरकार सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हे सर्व सदस्य युपीए राजवटीवेळी नेमलेले असल्याने कॉंग्रेस या विषयाचे राजकारण करीत असल्याचे जेटली यांनी म्हटले आहे.
‘मॅसेंजर ऑफ गॉड’वर पंजाबात बंदी
वादग्रस्त ठरलेल्या ‘मॅसेंजर ऑफ गॉड’ चित्रपटामुळे राज्यात शांततेला बाधा निर्माण होण्याच्या शक्यतेने पंजाब सरकारने राज्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार हरचरण बैन्स यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर राज्यात तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बैन्स यांनी सांगितले. या अनुषंगाने गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला होता असे ते म्हणाले. या चित्रपटाविरोधात हरयाणा व दिल्लीत जोरदार निदर्शने झाल्यानंतर पंजाब व हरयाणात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

