सेंच्युरियनवरही टीम इंडियाची कसोटी

0
187
In this photo taken Tuesday Jan, 2, 2018 Indian bowler Hardik Pandya delivers a ball during a net practice in Cape Town, South Africa. Indian will face South Africa in the first of a test starting Friday, Jan. 5, 2018. (AP Photo)

>> भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा सामना आजपासून

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या मालिकेतील दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून सुरुवात होत आहे. केपटाउन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला ७२ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला होता. या कसोटीत दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली होती. या चुकांमधून धडा घेत मालिका वाचविण्याचे आव्हान टीम इंडियासमोर असेल.

दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत वेगवान खेळपट्टी असा उल्लेख सेंच्युरियनच्या सुपर स्पोटर्‌‌स पार्कचा करण्यात येतो. दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य किल्ला म्हणून हे मैदान ओळखले जाते. दक्षिण आफ्रिका स्वत: वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यासह मैदानात उतरण्याची शक्यता अधिक आहे. मॉर्ने मॉर्केल, कगगिसो राबाडा आणि व्हर्नोन फिलेंडर या त्रिकुटाने पहिल्या कसोटीत भारतावर वर्चस्व राखले आहे. डेल स्टेन दुखापतीमुळे दुसर्‍या कसोटीत खेळणार नाही. त्यामुळे स्टेनच्या जागेसाठी अष्टपैलू आंदिले फेलुकवायो व ख्रिस मॉरिस तसेच वेगवान गोलंदाज दुआने ऑलिव्हर व एनगिडी यांच्यात चुरस आहे. द. आफ्रिकेचा कर्णधार ड्युप्लेसिस याने मॉरिस किंवा लुंगी एनगिडी यांच्यापैकी एकाला निवडण्याचे संकेत दिले आहेत. केशव महाराजमुळे गोलंदाजी फळीला वैविध्यता प्राप्त होत असल्याने त्याला बाहेर बसविण्याची शक्यता फार कमी आहे.

दुसरीकडे, भारतीय संघात सारे काही आलबेल आहे. भारतातील पाटा खेळपट्‌ट्या गाजवलेल्या फलंदाजांचे संदोष तंत्र वेगवान खेळपट्‌ट्यांवर उघडे पडल्याचे पहिल्या कसोटीत दिसून आले. केवळ तीन सामन्यांची मालिका असल्याने व पहिला कसोटी सामना गमावावा लागल्याने संघात बदल अनिवार्य आहेत. रोहित शर्माला कर्णधार कोहलीला पाठिंबा असल्याने त्याची जागा सुरक्षित मानण्यात येत आहे. रोहितने पहिल्या कसोटीत ५९ चेंडूंत ११ आणि दुसर्‍या डावांत ३० चेंडूंत १० धावा केल्या होत्या.

वन-डेत तीन द्विशतके नावावर असणार्‍या रोहितला कसोटीत अद्याप आपला जम बसविता आलेला नाही. त्याला भारताबाहेर एकही शतक ठोकता आलेले नाही. त्याची कसोटीतील तिन्ही शतके ही भारतातीलच आहेत. या खराब रेकॉर्डनंतरही त्याच्या स्थानाला दुसर्‍या कसोटीत तरी धोका संभवत नाही. शिखर धवनचे मात्र तसे नाही. केपटाऊन कसोटीत दोन्ही डावांत दुहेरी धावसंख्या करूनही त्याला बाहेरचा रस्तादाखवण्यात येऊ शकतो. २०१३च्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यात अजिंक्य रहाणे याने दोन अर्धशतके ठोकली होती. यात एकदा त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते. त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्येही शतक ठोकले आहे. विदेशांतील या भन्नाट कामगिरीनंतरही त्याला पहिल्या कसोटीत बाहेर बसावे लागले होते ते केवळ विराटच्या हट्टाखातर.

अजिंक्यची अनुपस्थिती पहिल्या कसोटीत द. आफ्रिकेच्या पथ्यावर पडली होती. दुसर्‍या कसोटीतही हीच परिस्थिती राहिली तर मालिका गमावण्यासाठी भारताला तिसर्‍या कसोटीची वाट पहावी लागणार नाही. सलामीवीर धवनच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलला उतरवून नियमित यष्टिरक्षक वृध्दिमान साहाच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी देण्याचा पर्यायही खुला आहे. अर्थात हा निर्णय संघव्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीला घ्यायचा आहे.

पहिल्या कसोटीत अश्‍विनचा फारसा वापर झाला नव्हता. त्याने दुसर्‍या डावात आपल्या फलंदाजीने मात्र प्रभावित केले होते. त्यामुळे त्याच्या जागी रवींद्र जडेजा किंवा इशांत शर्मा यांना खेळवावे की त्याला संघात राखावे हा कठीण निर्णय खेळपट्टीचे स्वरुप पाहून घ्यावा लागणार आहे.

भारत संभाव्य ः मुरली विजय, पार्थिव पटेल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्‍विन, भुवनेश्‍वर कुमार, मोहम्मद शामी व जसप्रीत बुमराह.
द.आफ्रिका संभाव्य ः ऐडन मारक्रम, डीन एल्गार, हाशिम आमला, एबी डीव्हिलियर्स, फाफ ड्युप्लेसिस, क्विंटन डी कॉक, व्हर्नोन फिलेंडर, केशव महाराज, मॉर्ने मॉर्कल, कगिसो रबाडा व लुंगी एनगिडी.