Home बातम्या सूर्यकुळाचे वारस आम्ही!

सूर्यकुळाचे वारस आम्ही!

0

– विष्णू सूर्या वाघ

(भाग-५)

सूर्या वाघ यांनी आयुष्यभर नाटक एके नाटकच केलं. घरची शेतीभाती होती, पण शेतीचा सारा व्यवहार आईच बघायची. वडील क्वचित शेतावर जायचे, पण पेरणी, नडणी, मळणीपर्यंतची प्रत्यक्ष कामे करायची ती आईच. पतीच्या नाट्यवेडाची झळ तिने कुठल्याही परिस्थितीत कुटुंबाला लागू दिली नाही. तसा नाटकामध्ये तिला फारसा रसही नव्हता. तिच्या सर्जनशीलतेला खर्‍या अर्थाने फुलोरे फुटायचे ते धालांच्या मांडावर. धालांची शेकडो गीते तिला तोंडपाठ होती. सलग पाच-पाच रात्री ती धालांच्या ओव्या गात असे. शिक्षण असं काही नव्हतंच, पण तिची स्मरणशक्ती अफाट होती.

पोर्तुगिजांची सत्ता असताना पणजीत आल्तिनोवर एक रेडिओ केंद्र होते. त्यावरून लिस्बन रेडिओचे कार्यक्रम प्रसारित होत. गोवा मुक्तीनंतर त्याचे आकाशवाणी केंद्र झाले. सूर्या वाघ आकाशवाणीचेही मान्यताप्राप्त कलाकार होते. आकाशवाणीवरून प्रसारित होणार्‍या शेकडो नभोनाट्यांत त्यांनी भूमिका केल्या. पुंडलिक दांडे, कृष्णा लक्ष्मण मोये, रमेश सखाराम बर्वे, पुंडलिक नारायण नायक यांनी निर्माण केलेल्या अनेक नभोनाट्यांसाठी त्यांनी आपला आवाज दिला. मुळातच त्यांचा आवाज अतिशय खणखणीत. तशात स्वरांचा पोतही अत्यंत नितळ. त्यामुळे रेडिओला उपयुक्त असा त्यांचा आवाज होता. रेडिओवरच्या श्रुतिका अथवा नभोनाट्य कोकणी किंवा मराठीत असत. बर्‍याच कलाकारांना लिखित स्वरूपातील कोकणी संवाद वाचायची सवय नसे. त्यांच्या उच्चारांवर मराठीची छाप स्पष्टपणे दिसायची. वडील मात्र याला अपवाद होते. ‘मी मराठीवादी असूनही कोकणीवाद्यांपेक्षा चांगलं कोकणी वाचतो’ असे ते गमतीने म्हणायचे.

वडिलांना मराठी भाषेचा खूप अभिमान होता. पण कोकणीचा द्वेष त्यांनी कधी केला नाही. एक भाषा म्हणून कोकणीलाही आपण पुढं आणलं पाहिजे या मताचे ते होते. बालपणी ते आम्हाला मुद्दामहून कोकणी पुस्तकं आणून द्यायचे. रवींद्र केळेकर यांचं वैचारिक साहित्य त्यांना अधिक आवडायचं. कोकणीतलं त्यांनी मला आणून दिलेलं पहिलं पुस्तक म्हणजे ‘वेळेवयल्यो घुल्यो.’ पुंडलिक नायक यांची ‘अच्छेव’ आणि ‘बांबर’ ही पुस्तकंही त्यांनीच आणून मला वाचायला दिली होती. आमच्या समाजातले पुंडलिक नायक, एन. शिवदास, दिलीप बोरकर हे लेखक चांगलं लिहितात याचा त्यांना अभिमान होता. पण त्याचबरोबर कोकणी चळवळीतला उच्चवर्णीय कंपू त्यांना सहसा वर येऊ देणार नाही, असंही ते बोलून दाखवत.

यासंदर्भातला एक प्रसंग मला चांगलाच आठवतो. एम. ई. एस. हायरसेकंडरीत असताना मी कोकणी चळवळीत सहभागी झालो. वास्कोत राहणारे थोर स्वातंत्र्यसैनिक डॉ. विनायक मयेकर यांनी आम्हाला त्या चळवळीत ओढले. मुरगाव तालुक्यातल्या गावागावांत जाऊन कोकणी सेवा केंद्रे उघडण्याचा धडाकाच आम्ही लावला होता. मीही कोकणीतून नुकताच कविता करू लागलो होतो आणि एक-दोन मोठ्या स्पर्धांमधून मला बक्षिसेही मिळाली होती. कोकणीचा प्रचार आणि प्रसार यावाचून दुसरा कोणताच विषय आम्हाला सुचत नव्हता. आमची ही दिवसेंदिवस वाढत चाललेली कोकणीभक्ती वडिलांच्या नजरेतून सुटली नाही. सुरुवातीला त्यांनी काही म्हटले नाही, पण जसजसे आमचे वेड वाढत गेले तसे त्यांनी एक दिवस मला मुद्दाम आपल्यासमोर बसवले आणि जवळजवळ तासभर माझा क्लास घेतला. ते म्हणाले की, ‘‘मी कोकणीच्या विरोधात नाही. पण निव्वळ कोकणी कोकणी करीत तू मराठीपासून दूर गेलास तर त्यात तुझं फार मोठं नुकसान होईल. कोकणी ही नुकतीच विकसित होऊ लागलेली भाषा आहे. याउलट मराठी भाषेचं वैभव अमर्याद आहे. अफाट आहे. कोकणीच लिहीत राहिलास तर गोव्यापुरता मर्यादित राहशील. मराठीतही लिहिलंस तर महाराष्ट्रात पोचशील!’’

असा हा सगळा उपदेश करून झाल्यावर वडिलांनी मला एक जळजळीत सत्य ऐकवलं. ते म्हणाले की, ‘‘आज कोकणीचा पुरस्कार करणारी जी मंडळी आहे ती सरसकट उच्चवर्णीय आहे. ते घरी बोलतात त्याच भाषेला प्रमाण भाषा म्हणून त्यांनी पुढं आणलं आहे. ही बहुजनांची भाषा नाही. त्यांच्या कंपूत तू गेलास तर ते आपली भाषा तुझ्याही डोक्यात ठोकतील. दोन दिवस तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचवतील आणि नकळत कुठेतरी फेकून देतील.’’

इतक्या गंभीरपणे कुठल्याही विषयावर वडील यापूर्वी कधी बोलले नव्हते. त्यांचा तो उपदेश ऐकून मी नखशिखान्त हादरलो. अंतर्मुख झालो. सतत दोनचार दिवस विचार केल्यानंतर मलाही त्यांचं म्हणणं पटलं आणि कोकणी चळवळीतून मी बाहेर पडलो.

वडिलांना वाचनाचा छंद होता आणि आपल्या मुलांनीही सतत वाचन करीत राहिलं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. पण आम्ही काय वाचतोय याकडेही त्यांचं बारीक लक्ष असे. आमच्या गावात एक ग्रामवाचनालय होतं. रघुवीर मयेकर नावाचे गृहस्थ ते चालवायचे. मयेकर हे निवृत्त शिक्षक होते आणि वाचनालय चालवण्याची त्यांना हौस होती. शाळा सुटल्यानंतर माझा बराचसा वेळ वाचनालयातच जात असे. वाचण्याचं वेड मला बालपणातच लागलं. माझी वाचनाची गती अफाट होती. जाडजूड कादंबर्‍यांचाही मी पाहता पाहता फडशा पाडीत असे. त्या वाचनालयात मी साने गुरुजी, नाथ माधव, ह. ना. आपटे, वि. स. खांडेकर या श्रेष्ठ लेखकांचे साहित्य वाचून काढले. वर्षभरात अख्ख्या वाचनालयातील पुस्तकं वाचून संपली. बाकी राहिली ती डिटेक्टिव्ह कथांची पुस्तकं. बाबुराव अर्नाळकर, एस. एम. काशीकर, गुरुनाथ नाईक वगैरे लेखकांची. चाळा म्हणून मी तीही पुस्तकं वाचू लागलो. हे जेव्हा वडिलांना कळलं तेव्हा थेट वाचनालयात जाऊन त्यांनी रघुवीर मयेकरांनाच दम भरला. पुन्हा असली पुस्तकं याना वाचायला दिलास तर लायब्ररीच बंद करून टाकीन अशी धमकीच देऊन टाकली सरळ. परिणामी मी वेळीच ‘काळापहाड’, ‘धनंजय’, ‘गरुड’, ‘नाईटकिंग’ या डिटेक्टिव्ह हिरोंच्या कचाट्यातून निसटलो.

आपल्या मुलांवर उत्तम संस्कार झाले पाहिजेत याकडे भाऊंचा खूप कटाक्ष होता. गुढीपाडव्यानंतर सलग पंधरा दिवस रामाच्या देवळात कीर्तने होत. वडील त्या देवळात स्वतः जात नसत, पण कीर्तनासाठी आम्हाला मुद्दाम पाठवायचे. कुठे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा असली की स्वतः मला घेऊन जायचे. बक्षीस तर मला हटकून मिळायचंच, त्यामुळे परत येताना त्यांचा आनंद द्विगुणित झालेला असायचा. गोव्यात कुठेही राष्ट्रीय नेत्याची सभा असली की ते मला सोबत घेऊन जायचे. अटलबिहारी वाजपेयी, जगन्नाथराव जोशी, मधू दंडवते, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, जॉर्ज फर्नांडिस यांसारख्या अनेकांची भाषणं त्यांनी मला आवर्जून ऐकवली आहेत.

वडिलांनी व्यक्तिशः लक्ष दिल्यामुळे बालपणापासून आमच्यावर चांगले संस्कार घडत गेले. ‘मृत्युंजय’सारखी कादंबरी मी इयत्ता चौथीत असतानाच त्यांनी माझ्याकडून वाचून घेतली. त्या कादंबरीने मला झपाटूनच टाकले. आपणही असे काहीतरी लिहायला हवे अशी ऊर्मी मनात उसळू लागली. त्या झपाटलेपणातच मी ‘एकलव्य’ ही कादंबरिका पाचवीत शिकत असतानाच लिहून टाकली. शिवाजी सावंत यांच्या शैलीची मी खरं तर कॉपी केली होती. पण त्या बालसुलभ वयातही मी काहीतरी लिहिलं याचा आनंद वडिलांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता.

शाळेत शिकत असताना मी कविताही लिहू लागलो होतो. अर्थात शाळेतली मुलं लिहितात याच पठडीतल्या त्या कविता होत्या. पण भाऊंना त्याचंही कौतुक वाटत होतं. १९७६ साली हंस संगीत नाट्यमंडळीचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन साजरा झाला. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेने ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर आणि कविवर्य कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम सुरू होण्याआधी तात्या थिएटरमधील प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसले होते. भाऊ मला त्यांच्याकडे घेऊन गेले. ‘‘तात्या, हा माझा मुलगा. याचंही नाव विष्णूच आहे. हा कविता लिहितो,’’ असं म्हणत त्यांनी माझ्या कवितांची चोपडी तात्यांच्या हाती दिली. कविश्रेष्ठ कुकुमाग्रजांनी ती वही उघडली आणि त्यात मी लिहिलेल्या दोनतीन कविता वाचून काढल्या. मी त्यांच्यासमोर अवघडल्यासारखा उभा होतो. मराठीचा महाकवी आपणासमोर बसलेला आहे हे कळण्याचं ते काही वय नव्हतं. तात्यांनी वही मिटली. कौतुकानं ओथंबलेल्या नजरेनं माझ्याकडं पाहिलं. हलकेच ओठातल्या ओठांत स्मित केलं आणि आपला उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवून म्हणाले, ‘‘कविता उत्तम. अक्षर छान आहे. मोठा कवी होशील!’’

आजही त्या प्रसंगाची आठवण झाली की मनावर मोरपीस फिरल्याचा भास होतो.

नाटकाच्या निमित्तानं वडील गोवाभर फिरले. या भटकंतीत त्यांनी अनेक मित्र कमावले. मोठमोठ्या, प्रतिष्ठित लोकांशी स्नेह जोडला. नाटकाइतकीच त्यांना समाजकार्याचीही आवड होती. गोमंतकीय भंडारी समाजाच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. कुठेही समाजाचा मेळावा असला की ते मला घेऊन जात. त्यामुळे प्रा. गोपाळराव मयेकर, कृष्णनाथ बाबुराव नाईक, दत्ताराम चोपडेकर यांच्यासारख्या त्यावेळच्या आमदारांचे दर्शन मला बालवयातच घडले. नंतर जयकृष्ण शिरोडकर, विनायक चोडणकर यांचाही परिचय झाला. भाऊसाहेब बांदोडकरांशीही भाऊंची चांगली मैत्री होती. भाऊसाहेब डोंगरीला आमच्या घरी येऊन जात असत. त्यावेळी के. बी. नाईक, प्रा. मयेकर वगैरे भाऊंच्यासोबत होते. पुढे त्यांच्याशी पटेनासे झाल्यावर केबींनी पुढाकार घेऊन ‘नवमहाराष्ट्रवादी गोमंतक’ या पक्षाची स्थापना केली. नवमगोची निशाणी होती ऊंट. केबींच्या मैत्रीमुळे सूर्या वाघ नवमगोचे काम करू लागले. पण निवडणुकीच्या रिंगणात या उंटाला कोणतीही चाल करता आली नाही. लोकांनी उंटाचा धुव्वा उडवला व सिंहालाच सत्ता दिली. पुढे शशिकलाताई मुख्यमंत्री झाल्यावर भाऊ पुन्हा मगोचे काम करू लागले व विनायक चोडणकर यांचे निकटवर्ती बनले.

भंडारी समाजाचे नेतृत्व त्यावेळी के. बी. नाईक, विद्याधर नाईक, दत्ताराम चोपडेकर यांच्यासारखी उच्चशिक्षित व सुसंस्कृत मंडळी करीत होती. दत्ताराम चोपडेकर हे प्रखर बहुजनवादी होते. मात्र त्यांचा भर शैक्षणिक प्रगतीवर होता. समाजातील मुलांनी शिक्षणात उन्नती साधली पाहिजे. त्यासाठी आपल्या शिक्षणसंस्था निर्माण केल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. करमळी, बिठ्ठोण येथे त्यांनी शाळाही सुरू केल्या होत्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन वडिलांनीही डोंगरी-मंडूर परिसरात एखादी शाळा असावी या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. मंडूरला सरकारची प्राथमिक शाळा होती. नेवर्‍याला नंदा बोरकर व इतरांनी पुढाकार घेऊन गोमंतक मराठी शिक्षण परिषदेतर्फे दयानंद आर्य शाळा स्थापन केली होती. मात्र आसपासच्या परिसरात कुठेच इंग्रजी हायस्कूलची सोय नव्हती. ही उणीव लक्षात घेऊन सूर्या वाघ यांनी गावातल्या काही मंडळींना एकत्र केलं आणि ‘उदय एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. विठोबा नास्नोडकर, रामराय शिरोडकर, सीताराम शिरोडकर, गोविंद कुर्डीकर, तुळशीदास बांदोडकर, सोनू शिरोडकर, दिपू कुर्डीकर यांसारखे सहकारी त्यांना मिळाले आणि संस्थेतर्फे हायस्कूल सुरू करण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. सर्व सिद्धता झाली. प्रश्‍न एवढाच राहिला की शाळेला नाव काय ठेवायचे? मग भाऊंनीच शक्कल काढली. आमची पंचायत त्यावेळी मोठी होती. आजोशी, मंडूर व नेवरा ही तीन गावं मिळून पंचायतीचं क्षेत्र विस्तारलं होतं. भाऊंनी तिन्ही गावांची नावं इंग्रजीत लिहून काढली आणि प्रत्येक गावातून पहिली दोन अक्षरं घेत अर्थात अनचअछए ‘आझमाने’ हे नवीन नाव बनवलं. गावातल्या गावात इंग्रजी शाळा झाल्यामुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची चांगलीच सोय झाली.

करमळीलगतच्या ओफळा-धोंगजो खाजनात आमचं शेत होतं. शेतीचं काम आईच बघायची. पण शेतकरी कूळ संघटनेचं कामकाज मात्र सूर्या वाघच चालवायचे. मानशींची देखभाल करणे, बांधांची दुरुस्ती करणे, भगदाड (भोंव) पडल्यास ते बुजवणे ही कामे कूळ संघटनेमार्फत केली जायची. वडिलांसोबत गोपीनाथ बकाल, विठ्ठल नाईक, काझमीर डायस इत्यादी शेतकरी संघटनेवर पदाधिकारी होते. भाऊ अनेक वर्षे ओफळा धोंगजो कूळ संघटनेचे सरचिटणीस होते. संघटनेचा सारा हिशेब ते स्वहस्ताने, चोखपणे लिहून ठेवीत. आताप्रमाणे त्याकाळी शेतात खारे पाणी घुसवून मासे पिकवण्याचे फॅड पसरले नव्हते. बांधांच्या देखभालीसाठी पारंपरिक पाळणी पद्धत होती. ती आता रद्दबातल झाली आहे.

आपण अगणित नाटकांतून कामं केली. आता सिनेमातही केलं पाहिजे असे वडिलांना खूपदा वाटे. ही त्यांची इच्छा १९८६ साली पूर्ण झाली. डॉ. विजया मेहता यांनी ‘बॅरिस्टर’ या नाटकावर आधारित ‘रावसाहेब’ हा चित्रपट करायला घेतला आणि त्याचे संपूर्ण चित्रीकरण गोव्यात केले. या चित्रपटात विक्रम गोखले, तन्वी किरण, निळू फुले इत्यादी नामवंत कलाकारांसोबत त्यांनी काही ज्येष्ठ गोमंतकीय कलाकारांनाही घेतले होते. तातोबा वेलिंगकर, सूर्या वाघ इत्यादींना बाईंनी या चित्रपटात भूमिका दिल्या होत्या.

गोवा दमण व दीव सरकारने कलाक्षेत्रात विशेष योगदान करणार्‍या व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान करण्याची प्रथा १९८२ पासून सुरू केली. १९८४ साली नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी हा पुरस्कार सूर्या वाघ यांना मिळाला. के. टी. सातारावाला हे त्यावेळी गोव्याचे नायब राज्यपाल होते. त्यांच्याच हस्ते पुरस्कार प्रदान होणार होता. कला अकादमीची विद्यमान वास्तू तेव्हा पूर्ण झालेली नव्हती. आज जिथे इडीसी हाऊस आहे त्या जागेवर अकादमीचे जुने थिएटर होते. पुरस्कार प्रदान सोहळा तिथेच होणार होता. वडिलांचा सन्मान असल्यामुळे मी व रामराव आम्ही दोघेही या सोहळ्याला कॉलेज चुकवून गेलो होतो. कोकणी-मराठी वादामुळे वातावरण हळूहळू तापू लागले होते. या वादाचे पडसाद त्या सोहळ्यातही उमटतील अशी वदंता होती.

पुरस्कार सोहळा सकाळी १० वाजता सुरू झाला. कला व संस्कृती खाते त्यावेळी अस्तित्वात आले नव्हते. हे पुरस्कार क्रीडा व युवा खात्यातर्फे दिले जात. खात्याच्या कुठल्यातरी अधिकार्‍याने स्वागतपर भाषण केले ते इंग्रजीतून. सूत्रसंचालकही इंग्रजीतूनच बोलत होता. मुख्यमंत्री राणे यांनीही (बहुधा नायब राज्यपालांना समजावे म्हणून) इंग्रजीतून भाषण केले. यामुळे प्रेक्षागृहातील उपस्थितांत चुळबूळ सुरू झाली. एन. शिवदास, भरत नायक, दामोदर घाणेकर व इतर कोकणीवादी मंडळी आपापसात बोलू लागली. पुरस्कार देऊन झाल्यावर विजेत्यांच्या वतीने बोलायला भाऊ उभे राहिले. त्यांनी मराठीतून बोलायला सुरुवात केल्याबरोबर ‘कोकणी उलय, कोकणी बरय, कोकणीतल्यान सरकार चलयऽऽ’ अशा घोषणा सभागृहात घुमू लागल्या. शिवदास, भरत नायक वगैरे लोकच घोषणा देत होते. घोषणाबाजी वाढत गेली तसा सूर्या वाघ यांचाही पारा चढला. आपल्या खड्या आवाजात माईकवरूनच त्यांनी आंदोलकांना दम भरला, ‘‘आरडाओरड करून कोकणीचं भलं होणार नाही. कोकणी आम्हालाही हवी आहे. पण तुम्हाला बोंबच मारायची असेल तर कोकणी शाळा बंद पडून इंग्रजी कॉन्व्हेंटस् उघडली जाऊ लागली आहेत, तिथे जाऊन मारा!’’

एरव्ही सौम्य वाटणारे सूर्या वाघ इतका कडक दम भरतील याची अपेक्षा घोषणा देणार्‍यांनाही नसावी. त्यांच्या शाब्दिक भडिमार्‍याने ते अवाक् झाले. ‘जावं रे… तो सूर्यामाम आमचो… उलोवंदी ताका…’ एकटा कुजबुजला. हळूहळू सगळे खाली बसले. सभागृह शांत झाले. सूर्या वाघ यांनी आपले भाषण विनाव्यत्यय केले. कलाकार हा मातीतून जन्माला येतो. मातीमधूनच त्याला प्रेरणा मिळते. म्हणून प्रत्येक कलाकाराने मातीशी प्रामाणिक राहायला हवे असे मत त्यांनी मांडले. त्यांचे संपूर्ण भाषण इतके उत्कृष्ट होते की प्रेक्षकांमध्ये बसलेले दै. ‘गोमन्तक’चे संपादक नारायणराव आठवले यांनी भाऊंकडून मुद्दाम त्या भाषणाची प्रत मागून घेतली व रविवारच्या आवृत्तीत ते संपूर्ण भाषण जसेच्या तसे छापून आणले.

कला अकादमीच्या त्या जुन्या नाट्यगृहातील रंगमंचावर घडलेले वडिलांचे करारी दर्शन अजून डोळ्यांपुढे उभे राहते आणि मी कणाकणाने तेजाळून निघतो. रंगभूमीवर निष्ठापूर्वक वावरलेल्या त्या थोर नाट्यसूर्याचे आम्ही वारस आहोत या अभिमानाने छाती फुलून येते. सूर्या वाघ गेले असं मला आजही वाटत नाही. स्वप्नात अनेकदा ते मला दिसतात. काहीतरी सांगत असतात. सूर्या वाघ हा माझ्यासाठी भूतकाळ नाही; ती वर्तमानाची सोबत आहे. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हा आश्‍वासक दिलासा आहे. म्हणून आम्ही खुल्या कंठाने म्हणू शकतो- ‘तुझ्यामुळे रे तेजस आम्ही… सूर्यकुळाचे वारस आम्ही!’