Home बातम्या सूर्यकुळाचे वारस आम्ही…

सूर्यकुळाचे वारस आम्ही…

0

– विष्णू सूर्या वाघ

गोव्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना अगदी सहज येणारा एक अनुभव…

अध्यक्ष, प्रमुख पाहुणा किंवा प्रमुख वक्ता म्हणून मी रंगमंचावर. सोबत अन्य मान्यवर- निवेदक कार्यक्रमाची सुरुवात करतो. स्वागत होतं. पुष्पगुच्छ दिले जातात. प्रास्ताविक होतं. आणि सुरू होते पाहुण्यांची ओळख.

मंचावरील मान्यवरांची ओळख करून दिल्यानंतर निवेदक माझ्याकडे वळतो व सहज म्हणून जातो, ‘‘…आणि आजचे आमचे प्रमुख पाहुणे (किंवा अध्यक्ष किंवा प्रमुख वक्ते किंवा जे काय असेल ते) आहेत प्रसिद्ध कवी व नाटककार, कला अकादमीचे अध्यक्ष, सांत आंद्रेचे आमदार माननीय सूर्या विष्णू वाघ!’’

आपल्याकडून कोणती चूक घडलीय ते निवेदकाच्या लक्षात येईपर्यंत प्रेक्षकांत हंशा उडालेला असतो. काहीजण निवेदकाकडे अचंब्याने बघत राहतात. पटकन दातांखाली जीभ चावून निवेदक दुरुस्ती करतो… ‘हं…. माफ करा… आमदार विष्णू सूर्या वाघ!’

बरेच लोक पत्र पाठवताना पत्रावर ‘सूर्या विष्णू वाघ’ असं लिहितात. तरी पोस्टमन बिनचूक पत्र घेऊन येतो. कधीकधी मीही त्याची गंमत करतो- ‘हे पत्र व्यक्तिशः हातात द्यायचं असेल तर तुला कुठं जावं लागेल माहीत आहे ना?’ असं सांगून पोस्टमनलाही खोटं खोटं घाबरवतो.

विष्णू सूर्या वाघ.

सूर्या विष्णू वाघ.

गेली वीस वर्षे या नावाची गोव्यात सरमिसळ होत आलेली आहे. दहापैकी किमान पाच कार्यक्रमांत कुणी ना कुणीतरी माझं नाव ‘सूर्या विष्णू वाघ’ असंच घेतो. काहीजण हसतात. काहीजण आवर्जून सांगतात- ‘अजून ओठांची सवय जात नाही. सूर्यामाम आमच्याकडे यायचे. राहायचे. आम्ही त्यांच्याकडूनच नाटक शिकलो. तेच आमचे गुरू.’

सूर्या वाघ यांच्याकडून नाटक शिकलो म्हणून सांगणारी बुजुर्ग मंडळी मला गावोगावी भेटतात. अक्षरशः गोव्यामधल्या प्रत्येक गावात. एकही शहर किंवा खेडं असं नसेल की जिथं सूर्या वाघनी जाऊन नाटक बसवलं नाही. उलट एकाच गावातल्या पाचपाच, सहासहा वाड्यांवर ते नाटक शिकवायचे. नाटक बसवायचं तर सूर्या वाघांनीच असा दंडकही काही ठिकाणी वर्षानुवर्षे पडला होता. बहुधा त्यामुळेच लोकांच्या स्मृतीत आजही ‘सूर्या विष्णू वाघ’ हे नाव कायम आहे.

माझ्या वडिलांना जाऊन आज २५ वर्षे झाली. नाटक हे त्यांनी आपल्या जीवनाचं एकमेव उद्दिष्ट मानलं. इतर कुठलाही व्यवसाय त्यांना करता आला नाही. तशा बर्‍याच गोष्टी त्यांना अवगत होत्या, पण त्यांचा धंद्यासाठी वापर करून पोटापाण्याची व्यवस्था करावी हे त्यांच्या स्वभावात नव्हतं. घरची शेतीभाती होती. पण तिचा भार वडिलांपेक्षा आईच अधिक सांभाळीत असे. आम्ही वडिलांना ‘भाऊ’ म्हणायचो. नाटकातले लोक ‘सूर्यामाम’ म्हणून ओळखायचे. डोंगरीतलं आमचं घर हे बहुधा वाड्यावरलं माडीचं पहिलं घर होतं. माडीला कोकणीत ‘माळी’ म्हणतात. शेजारची मुलं वडिलांना ‘माळये मामा’ म्हणायची. घराला अनेक दगडी कमानी होत्या. कमानींना कोंकणीत ‘देट्टो’ म्हणतात. त्यामुळे आमच्याकडे जायचे असेल तर ‘देट्ट्यांगेर वयतां रे’ असेही काहीजण म्हणायचे.

भाऊंचा वर्ण सावळा होता. अंगकाठी शिडशिडीत होती. चालण्या-बोलण्यात विशिष्ट प्रकारचा दरारा होता. दृष्टी भेदक पण तेजस्वी होती. रुंद कपाळ, सरळ नाक, तलवारकट मिश्या, सडपातळ ओठ असा त्यांचा चेहरा होता. केस मागे वळवलेले, दाट परंतु काळेभोर होते. शेवटपर्यंत त्यांनी कलप लावला नाही. अधूनमधून पांढरे केस दिसायला लागले की कधी निवांतपणे बसलेले असताना ते आरशात पाहून उपटायचे.

भाऊंची वेशभूषाही ठरलेली असायची. दुपेडी कासेचं स्वच्छ पांढरं धोतर, त्यावर पांढरी किंवा अन्य कुठल्याही रंगाची बंडी, त्यावर निळा किंवा काळा कोट आणि डोईवर वेलबुट्टीची टोपी. या पेहरावात त्यांनी कधी बदल केल्याचे मला आठवत नाही. नाटकात भूमिका करताना ते पँट-शर्ट घालायचे. पण भूमिकेची गरज म्हणून. सार्वजनिक सभा-समारंभांत धोतर-बंडी-कोट हाच वेष. गावात फिरताना मात्र गुडघ्यापर्यंतची हाफ पँट व अंगात गोव्याचं टीपिकल ‘खोमीस’ अशा पेहरावात ते फिरायचे. पायात कोल्हापुरी वहाणा असायच्या. क्वचित प्रसंगी हातात छडी. पावसाचे दिवस असतील तर छत्री.

वडिलांच्या चालण्यात एक झोक होती. खानदानीपणाचा आब होता. कणा शेवटपर्यंत ताठ होता. कारण नसताना कुणापुढेही झुकायचं नाही असं ते आम्हाला बजावून सांगायचे.

वडिलांचं सर्वात मोठं सौष्ठव म्हणजे त्यांचा आवाज. खर्जापासून टीपेपर्यंत तिन्ही सप्तकांत सहज फिरू शकणार्‍या आवाजाची देणगी त्यांना निसर्गानं दिली होती. पण वडील जे काही बोलायचे ते गद्यात. संगीताशी त्यांना काही देणं-घेणं नव्हतं. गाण्यातलं त्यांना सगळं काही कळायचं, पण ते स्वतः कधी गात नसत. आवाजाची जी काही जादूगिरी करायचे ती गद्यात. इतका नितळ धारदार आवाज फारच कमी लोकांना लाभला असेल. सोबत स्पष्ट उच्चारांची जोड. मराठी भाषेचं प्रचंड ज्ञान आणि नुसत्या वाक्योद्गारातून समर्पक भाव निर्माण करण्याचं अंगभूत कौशल्य. रंगमंचावर नाटकांतील वेगवेगळ्या भूमिकांत भाऊंना पाहत असताना त्यांचा आवाज कानात शिरून काळजापर्यंत भिडायचा. सभा-समारंभांत माईकवर त्यांनी ‘प्रिय बंधू-भगिनींनो’ असं म्हणायला अवकाश… बाहेरगावचे पाहुणे नकळत ‘व्वा’ म्हणून त्या आवाजाला दाद द्यायचे. वडिलांच्या या आवाजाची देणगी नंतर माझ्याकडे आली. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर धनुष्यातून तीर सोडल्याप्रमाणं शब्दफेक करण्याचं त्यांचं कौशल्य मलाही पूर्णांशानं जमलं नाही.

बहुतेक गोंयकार मराठी बोलू लागले की कोंकणीतून मराठी बोलतात. कितीही प्रयत्न केला तरी त्यांचा कोंकणी हेल जात नाही. त्यामुळं गोंयकारांची मराठी हा विनोदाचा विषय बनतो. आमचे भाऊ मात्र याला अपवाद होते. त्यांची मराठी शुद्ध व अस्खलित होती. मराठी माणसांप्रमाणेच त्यांचेही उच्चार स्पष्ट व मधुर होते. जेमतेम चौथीपर्यंत शालेय शिक्षण घेतलेल्या या माणसाचं मराठी इतकं शुद्ध, इतकं परिपक्व कसं हा प्रश्‍न अनेकांना पडायचा. आम्हाला मात्र त्यातलं इंगित माहीत होतं. त्यांचं अखंड, अफाट वाचन. भाऊंना उत्तमोत्तम साहित्य वाचण्याचा नाद होता. ज्ञानेश्‍वरीचं वाचन ते सातत्यानं करीत असायचे. त्यामुळे संस्कृतमधले अनेक शब्द त्यांना अवगत होते. ‘पांडवप्रताप’, ‘हरिविजय’, ‘नवनाथ कथासार’, ‘शिवचरित्र’ यांसारखे ग्रंथ आमच्या घरी श्रावणात नियमितपणे वाचले जात. भाऊ त्या ग्रंथांचा अर्थ सांगायचे. त्यामुळे पुराणकथांचा फार मोठा संचय त्यांच्या डोक्यातच असायचा. ऐतिहासिक व पौराणिक कादंबर्‍या त्यांना अतिशय आवडत. ‘स्वामी’, ‘श्रीमान योगी’, ‘मृत्युंजय’सारख्या जाडजूड कादंबर्‍या ते वाचायला घ्यायचे तेव्हा आरामखुर्चीत त्यांच्यामागे उभा राहून मीही भरभर वाचण्याचा प्रयत्न करायचो. भाऊंमुळेच मलाही वाचनाची गोडी लागली हे कबूल केलं पाहिजे.

सूर्या विष्णू वाघ यांच्या रंगमंचीय कारकिर्दीविषयी मी सविस्तर लिहिणारच आहे, पण त्यापूर्वी त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाशझोत टाकण्याचा मोह मला आवरत नाही. जातिवंत रंगकर्मी कसा घडतो हे समजून घ्यायचं असेल तर त्याच्या उपजत आवडीनिवडी, अंगभूत कलाकौशल्य यांचाही अभ्यास करावा लागतो. भाऊंचं एकूणच व्यक्तिमत्त्व पूर्णपणे कलासक्त होतं. त्यांच्या हातातच कसलीतरी जादू होती. कोणतंही काम हाती घेताना ते अधिकाधिक सुंदर, नाजूक व स्वच्छ कसे होईल याकडे ते विशेष लक्ष द्यायचे. कागदापासून फुलं करण्याची त्यांची कला वाखाणण्याजोगी होती. पताका बनवण्याचे रंगीत कागद तसेच खास फुलांसाठी वापरण्यात येणारे क्रेप कागद यांपासून ते फुलं बनवायचे. या फुलांपासून विविधरंगी गेंद व वेली बनवायचे. दिवाळसणातील धेंडल्याला, सप्ताहातील सुखासनाला आणि इत्रुजातील लालखीला वडिलांनी बनवलेले गेंद व वाली बांधल्या जात. बांबूच्या बारीक काड्या करणं, मैदा पाण्यात कालवून तो चुलीवर गरम करून कागद चिकटवण्यासाठी खळ करणं, विविध पाकळ्यांचे आकार कापून घेणं इत्यादी गोष्टी ते सहजतेनं करीत. फुलं बनवण्याची ही कला त्यांच्याकडून मी शिकलो. भाऊ सुंंदर आकाशदिवे बनवायचे. आकाशदिव्यांवर लावली जाणारी सुंदर डिझाईन्स ते स्वतः कापून घ्यायचे. नक्षीदार पताका बनवण्यातही त्यांचा हातखंडा होता. क्रेप कागदापासून सुंदर हार बनवण्याची कलाही त्यांना अवगत होती. गोव्यात लग्न करून दिलेली मुलगी पहिल्यांदा गर्भवती झाली की तिला फुलं माळण्याची पद्धत आहे. फुलं माळताना तिच्याभोवती नेवर्‍या, पंचखाजी, मिठाई मांडण्याचा प्रघात असतो. ही सगळी मिठाई केळीच्या पानाचा आकार असलेल्या एका कागदी चटईवर मांडली जाते. या चटईला ‘शिरती’ म्हणतात. शिरती बनवणं ही एक कलाच आहे. भाऊ फार सुंदर शिरत्या बनवायचे. त्यांच्याकडून पुढं मीही शिकलो. कागदी डिझाईनची सुंदर मखरं बनविण्यातही ते प्रवीण होते. गणेशोत्सवात मखरांची सजावट ते स्वतःच करायचे. श्रावण महिन्यात आमच्या गावातल्या प्रत्येक देवळात सोमवार साजरा केला जातो. त्यावेळी केळीच्या गब्यांचं मखर बनवतात. अशा प्रकारचं मखर बनवावं ते भाऊंनीच. उलट त्यावर लावण्यासाठी चकचकीत पाकळ्या असलेली फुलांची कमळंही ते आपणहून बनवायचे. एका माणसाच्या अंगी किती कला असू शकतात याचा वस्तुपाठच होते आमचे भाऊ!

भाऊ जे काही करायचे ते मन लावून करायचे. त्यांच्याकडे एक कलात्मक, सौंदर्यवादी दृष्टी होती. हाती घेतलेल्या कामात कुठल्याही प्रकारची अस्वच्छता त्यांना खपत नसे. प्रसंगी वेळ लागला तरी चालेल पण घाईगडबडीत कामाचा ‘इबाड’ होता कामा नये अशी त्यांची धारणा होती. मला आठवतं, चवथीच्या आदल्या रात्री माटोळी बांधायचं काम असे. बहुतेक घरांत अर्ध्या- पाऊण तासात माटोळी बांधून होई. आमच्याकडे मात्र माटोळी बांधायला कमीत कमी सात-आठ तास लागत. माटोळीला बांधण्यात येणारे आम्रपर्णाचे घोस तसेच कांगलां, करमलां, सुपारीची शिट्टी, नारळांची पेंड, फणस, मके, तोरंगां… सगळी फळफळावळ एकाच रांगेत असली पाहिजे, ती वर-खाली, वाकडीतिकडी असता कामा नये हा भाऊंचा दंडक होता. त्यामुळे माटोळीला एखादी वस्तू बांधली की पुन्हा मागे जाऊन तिचा ‘बॅलन्स’ ते न्याहाळून बघीत. समाधान झालं नाही तर पुन्हा वर-खाली करीत. त्यांच्यासोबत माटोळी बांधताना आमची मात्र दमछाक होत असे. गणपतीची माटोळी बांधण्यात इतका काटेकोरपणा आणखी कुणी पाळला असेल की नाही याची मला शंंका वाटते.

अशीच दक्षता भाऊ गणपतीची मूर्ती मखरात बसवताना घ्यायचे. मूर्ती मखराच्या मधोमध आहे की नाही, तिची नजर ठीक आहे की नाही हे पुन्हा पुन्हा तपासून घ्यायचे. अनेक लोकांना हा वेळेचा अपव्यय वाटायचा. पण कामात परफेक्शनीजम आणायचं असेल तर त्यासाठी काही वेळ द्यावाच लागतो हे भाऊंनी आम्हाला शिकवलं.

कलाकुसरीतल्या विविधांगी प्रावीण्याव्यतिरिक्त आणखी अशा कितीतरी गोष्टी भाऊंना अवगत होत्या. माडाच्या झावळ्यांपासून ते ‘मल्लं’ विणायचे. झावळ्यांची चुडते मोडून पावसापासून बचाव करण्यासाठी भक्कम ‘कडवो’ बनवायचे. छपराखाली नाजूक ‘पाकेत’ करायचे. चवथीच्या उत्सवकाळात शेतातल्या ‘नव्या’ची पूजा करतात. या ‘नव्या’ला आंब्याच्या पानांचं वेष्टन घालून बांबूच्या नाजूक फळ्यांचा तक्ता करून पूजेला लावतात. भाऊ हा तक्ता सुंदर पद्धतीने बनवायचे. त्यांचं एकूणच व्यक्तिमत्त्व असं कलासंपन्न होतं.

आता थोडंसं ‘सूर्या विष्णू वाघ’ आणि ‘विष्णू सूर्या वाघ’ या नावांविषयी. मागील किमान आठ पिढ्या आमच्या घराण्यात ही नावं चालत आली आहेत. माझ्या आजोबांचं नाव विष्णू सूर्या वाघ होतं तर पणजोबांचं नाव ‘सूर्या विष्णू वाघ’ असं होतं. ब्रिटिश राजघराण्यात ज्याप्रमाणं एडवर्ड, जॉर्ज, चार्ल्स अशी नावं पुन्हा पुन्हा येतात व त्यांना पहिला जॉर्ज, दुसरा जॉर्ज, पंचम जॉर्ज अशा नावांनी ओळखलं जातं, ती पद्धत आमच्या घराण्यात असती तर माझे वडील ‘पंचम सूर्या’ व मी ‘षष्ठम विष्णू’ अशा नावांनी नक्कीच ओळखलो गेलो असतो. तब्बल पाच पिढ्या आमच्या कुटुंबात जन्मलेल्या मोठ्या मुलाला एकतर ‘सूर्या’ किंवा ‘विष्णू’ या दोन नावांखेरीज तिसरा पर्याय मिळाला नाही. ही पद्धत माझ्या मुलांची नावं ठेवताना मी सर्वप्रथम मोडली.

तर, सूर्या आणि विष्णू या नावांच्या घोळाची कथा ही अशी. त्याखेरीज आमच्या कुटुंबांची आणखी एक ‘टीपिकल’ गोष्ट म्हणजे आमचं आडनाव. गोव्यात ‘वाघ’ आडनावाची मोजकीच घराणी आहेत. तीदेखील सारस्वत. बहुधा ‘कामत-वाघ.’ पण भंडारी समाजात संपूर्ण गोव्यात ‘वाघ’ हे आडनाव लावणारे आम्ही एकमेव!

तसं पाहिलं तर आमच्या ‘वाघ’ या आडनावालाही बराच मोठा इतिहास आहे. तसं आमचं मूळ आडनाव नाईक. पूर्वज फोंडा महालातल्या शिरोडा गावी ‘वाजे’ या वाड्यावर राहायचे असं म्हातारी लोकं सांगायची. नंतर कधीतरी ते जुवारी खाडीतून डोंगरीला आले. गाव सोडून आल्यानंतर गावची आठवण राहावी म्हणून ‘नाईक-शिरोडकर’ हे नाव घेतले. प्रारंभी आमचं घराणं म्हणे बरंच सुखवस्तू होतं. माडीचं घर होतं. आमचं अंगण म्हणजे धालो खेळायचा मांड होता. एरव्ही गावात धा जणांच्या मांडावरच धालो खेळतात. पण आमच्या खाजगी मांडावर धालो व्हायच्या त्याअर्थी आमच्या घराण्याचा मानमरातब बर्‍यापैकी मोठा असावा. पूर्वी व्यापार-उदीमही म्हणे चांगला होता. पणजोबा पाचसहा होड्यांचे मालक होते. होड्या म्हणजे नदीत चालणारे छोटे पोंजेळ नव्हे, तर मालवाहतूक करणार्‍या मोठ्या होड्या. कोचीन ते कराचीपर्यंत त्या ये-जा करायच्या. त्यामुळे आमदनीही चांगली असावी. दुर्दैवानं पुढच्या पिढीतील काहीजणांना जुगाराचा नाद लागला आणि त्यात सगळं गमावून बसले. अर्थात हे भाऊंचा जन्म होण्याआधी. हातातली संपत्ती पूर्वजांनी जुगारात गमावली हे जाणत्या वयात भाऊंना कळलं तेव्हापासून त्यांनी कधीच पत्त्यांना हात लावला नाही आणि आम्हालाही लावू दिला नाही.

तर, अशा या आमच्या नाईक-शिरोडकर घराण्यात कुणीतरी एक पूर्वज वाघासारखा शूरवीर होऊन गेला किंवा कुणीतरी जंगलात गेल्याठिकाणी वाघाची शिकार केली व तेव्हापासून आमच्या आडनावात ‘वाघ’ या नावाची भर पडली. पण त्यामुळं झालं काय की आमचं आडनाव ‘नाईक-शिरोडकर-वाघ’ असं लांबलचक बनलं. व्यवहारात एवढं मोठं आडनाव कसं वापरणार? असा विचार करता करता ‘शिरोडकर’ काढून टाकलं. मग ‘नाईक-वाघ’ राहिलं. माझ्या जन्माची नोंदणी होईपर्यंत ‘नाईक-वाघ’ होतं. आता ‘नाईक’ही गेलं व ‘वाघ’ तेवढं शिल्लक आहे.

सूर्या वाघांचा जन्म डोंगरी गावात झाला. दिवस वा तिथीची नोंदणी करणारी यंत्रणा गावात नसल्यामुळे जन्मतारीख नक्की कोणती ते सांगता येणार नाही. पण साल होतं १९३७.

डोंगरी हा तसा ऐतिहासिक गाव. श्रीषष्टी शांतादुर्गा अर्थात सटीच्या कृपेनं पावन झालेला. याच गावात आद्य संगीत नाटककार कृष्णंभट्ट बांदकर यांचाही जन्म झालेला. भाऊंच्या आधी सुमारे शंभर वर्षांपूर्वी कृष्णंभट्ट जन्माला आले. ते श्रीरामाच्या मंदिरातील पुजारी होते. कृष्णंभटाना उपजत कविप्रतिभेची देण होती. तशात त्यांना कोकणप्रांतातील विष्णुबुवा सोमण या गुरूंचा अनुग्रह लाभला व त्यांची काव्यप्रतिभा बहरत गेली. ‘विश्‍वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे’सारखी विपुल प्रासादिक रचना कृष्णंभटानी केली. ‘होती डोंगरी डोंगरी, झाली अयोध्या नगरी’ असे डोंगरीचे वर्णन केले. कृष्णंभटानीच आधुनिक भजनी सप्ताहांचा पाया घातला. ‘चला चला चला श्रीराम दर्शना चला| भलाभलाचि योग हा आम्हांसि लाभला’ हे त्यांचं दींडीच्या चालीचं गाणं गोमंतकभर पोचलं.

कृष्णंभट्टाची काव्यप्रतिभा अद्वितीय होतीच, पण याहून मोठं होतं त्यांचं रंगमंचीय कर्तृत्व. आधुनिक नाटकाचा पाया विष्णुदास भावे यांनी घातला असं आपण सर्वसाधारणपणे मानतो. पहिले मराठी संगीत नाटककार म्हणून अण्णासाहेब किर्लोस्करांचे नाव घेतले जाते. पण अण्णासाहेबांच्याही आधी मराठी संगीत नाटकाची पताका डोंगरीसारख्या आडगावात कृष्णंभट्ट बांदकर यांनी रोवली हे कितीजणांना माहीत आहे? एवढंच नव्हे तर अण्णासाहेबांनाही नाट्यलेखनाची प्रेरणा देणारे खुद्द बांदकर महाराजच होते या ऐतिहासिक सत्याची जाणीव तरी किती जणांना आहे?

कृष्णंभट्ट बांदकर हे उत्तम नाटककार होते. ‘शुकरंभा संवाद’, ‘अहल्योद्धार’, ‘लोपामुद्रा संवाद’ यांसारखी नाटके त्यांनी लिहिली होती. पूर्वीची नाटके व बांदकरांची नाटके यांत मोठा फरक असा होता की, पूर्वीच्या नाटकांत एकटा सूत्रधार तेवढा गायन करायचा व संवाद म्हणायचा. बाकीची पात्रे नुसत्याच हालचाली करायची. बांदकरांनी आपल्या नाटकात थेट पात्रांच्या तोंडी संवाद घातले व गाणीही त्या-त्या पात्रांनीच म्हटली पाहिजेत अशी योजना केली. गावच्या हौशी तरुणांना एकत्र करून त्यांनी या नाटकांचे खेळही डोंगरी गावात चालू केले.

अशाच एका नाटकाचे खेळ चालू असताना अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे गोव्यात आगमन झाले. अण्णासाहेब त्यावेळी ब्रिटिश आमदानीत नोकरीला होते. गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता होती. त्याकाळी मेरशी, शिरदोण, भाटी परिसरात मोठ्या प्रमाणात मिठाचे उत्पादन होत असे. पोर्तुगीज या मिठाची निर्यात करीत. ब्रिटिश गोव्यातून मिठाची खरेदी करीत. ही खरेदी करायला क्रॉफर्ड नावाचा ब्रिटिश अधिकारी आला त्याच्यासोबत कारकून म्हणून अण्णासाहेब आले. पणजीहून जवळच एका गावात कोणीतरी माणूस नाटके लिहून त्यांचे खेळ करतोय अशी वार्ता कुणीतरी त्यांच्या कानावर घातली व कुतूहलापोटी अण्णासाहेब डोंगरीला गेले. तिथे त्यांनी कृष्णंभट्टांचे आधुनिक तंत्राचे नाटक पाहिले व ते भारावून गेले. ‘या नाटकाचे खेळ तुम्ही सांगली- कोल्हापूरला येऊन का करीत नाही?’ अशी पृच्छा त्यांनी बांदकरांना केली. त्यावेळी बांदकरांनी विनम्रपणे ‘हे सारं मी प्रभू रामरायाची सेवा म्हणून करतो आहे, मला यातून पैसा नाही कमवायचा’ असे सांगत किर्लोस्करांना नकार दिला. मात्र, अशा प्रकारचं नाटक लिहायची स्फूर्ती तुम्हाला झाली तर जरूर लिहा असं सांगत श्रीरामाचा प्रसाद म्हणून श्रीफळ व पुष्पहार त्यांच्या हातावर टेकवला. हाच आशीर्वाद घेऊन किर्लोस्कर माघारी गेले व त्यांनी ‘शाकुंतल’ नाटकाची निर्मिती केली. नाट्याचार्य कृष्णंभट्ट बांदकर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या याच डोंगरी गावात सूर्या वाघ यांचाही जन्म व्हावा याला योगायोग म्हणावे की ईश्‍वरी संकेत? (क्रमशः)