Home बातम्या सूर्यकुळाचे वारस आम्ही…

सूर्यकुळाचे वारस आम्ही…

0

– विष्णू सूर्या वाघ

 आमच्या वडिलांना आत्मचरित्र लिहायची खूप इच्छा होती. ‘नाटकासाठी सूर्या वाघानं काय केलं, काय सोसलं हे उद्या जगाला कळलं पाहिजे’ असं ते कधीकधी बोलून दाखवत. नाट्यक्षेत्रातील त्यांचे एक मित्र आणि जुन्या जमान्यातील प्रसिद्ध विनोदी नट सुकडाराम आडपैकर यांनी आपले एक छोटेखानी आत्मचरित्र प्रसिद्ध केले होते. लहानपणी मीदेखील ते वाचल्याचे स्मरते. अगदीच इटुकले, वीस ते बावीस पानांचे ते आत्मकथन असेल. भाऊंचे आणखी एक साथी कलाकार विनोदवीर कृष्णा लक्ष्मण मोये यांचेही आत्मकथनाचे पुस्तक प्रकाशित झाले होते. तेव्हा आपणही आपल्या आठवणी लिहून काढाव्या असे भाऊंनी ठरवले व त्यादृष्टीने सुरुवातही केली. ६ जुलै १९७९ या दिवशी, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ते आत्मकथा लिहायला बसले. त्यादिवशी जेमतेम पाच-सहा पाने त्यांनी लिहिली असतील. त्यानंतर ते पुन्हा आपल्या व्यापांत अडकले व ते आत्मचरित्र त्यांना कधीच पूर्ण करता आले नाही. खरोखर त्यांनी आपले लेखन पूर्ण केले असते तर मराठी रंगभूमीच्या गतेतिहासावर बराच प्रकाशझोत पडला असता. कारण त्या काळात रंगभूमीवर वावरणारे फारच थोडे लोक आज हयात आहेत. दुसरे म्हणजे सूर्या वाघ यांच्याकडे उत्तम लेखनाची हातोटी होती. मराठीचे त्यांना व्याकरणशुद्ध ज्ञान होते. पण नाटकाच्या निमित्ताने होणार्‍या अखंड भ्रमंतीने त्यांना लेखन करण्यासाठी लागणारी पुरेशी उसंतच दिली नाही. आषाढी एकादशीला त्यांनी लिहायला घेतलेल्या डायरीची पुढची पाने अर्धवटच राहिली. परवा वडिलांविषयी लिहायला बसलो आणि धाकट्या भावाने अगत्यपूर्वक जपून ठेवलेली ती पाने माझ्या हवाली केली. वडिलांनी आपले बालपण व रंगमंचावरील पदार्पण याविषयी लिहिलेले ते प्रकरण येथे मुद्दाम देत आहे. त्या प्रकरणाची सुरुवातच भाऊंनी अशी केली होती-

मित्रहो, माणसाचे जीवन हे एक मोठे कोडे आहे. त्या कोड्याचे गणित समप्रमाणात सहसा सुटत नाही. कुठेतरी व्यस्त प्रमाण हे असतेच. चढ-उतार असतात. म्हणूनच माणसाला आपल्या जीवनात घडलेल्या घटनांचा आढावा घ्यावा लागतो. त्यामुळेच, माझ्या जीवनातील बहुतेक वर्षे मी ज्या नाट्यव्यवसायात घालवली आणि त्यातील बर्‍या-वाईट प्रसंगांनी आयुष्यात कोणकोणते अनुभव आले ते आपणासारख्यांना कळावे म्हणून मी हा प्रपंच करीत आहे.

मित्रहो, ज्यावेळी मी या नाट्यव्यवसायात उतरलो त्यावेळी माझे वय सतरा वर्षांचे होते. त्यावेळी मी घरात सर्वांचा आवडता होतो. कारण, आमचे कुटुंब मोठे होते, पण त्यापैकी दोन-तीन चुलत्यांना मुले नव्हती. साहजिकच घरची वडीलधारी मंडळी माझ्यावर खूप माया करीत. यामागे आणखी एक कारण असे होते की माझ्या समवयस्क मुलांमध्ये मी खूपच हुशार गणला जात होतो. माझी अभ्यासातील हुशारी पाहून शैक्षणिक जीवनात त्यांनी मला काही कमी पडू दिले नाही. महादेव नावाचे माझे एक चुलते होते. घरात आम्ही सर्वजण त्यांना ‘दादा’ म्हणत होतो. तेच आमच्या घरात जास्त शिकलेले. आमचा मुख्य व्यवसाय शेती व जोडधंदा म्हणून होडीचा व्यवसाय होता. त्यावेळी आतासारख्या मोटारी नव्हत्या. मालाची ने-आण करण्यासाठी लोक होडीचा उपयोग करायचे. तो धंदाही चांगला तेजीत चालायचा व त्यातून मिळकतही बर्‍यापैकी व्हायची.

पावसाळ्यात शेती व पावसाळ्यानंतर होड्या असा आमचा जीवनक्रम होता. एवढ्या व्यवसायावर आमच्या कुटुंबाचा चरितार्थ चालत असे. त्यावेळी आताप्रमाणे माणसांच्या गरजा वाढल्या नव्हत्या व महागाईही नव्हती. ‘खाऊनपिऊन सुशेगाद’ म्हणता येईल इतपत सुबत्ता होती. आम्ही घरात सहा माणसांसाठी दोन पैसे ते एक आण्याची मासळी घेत होतो. दोन आण्यांत रत्तलभर (आताची अर्धा किलो) साखर मिळायची. दोन पैशांत नारळ! फार कशाला, आज बाजारात माशांची जी गांथण सहा रुपयांत मिळायची मारामार ती त्यावेळी दोन आण्यांत मिळत असे.’ (भाऊंनी हे लिहिले तेव्हा म्हणजे १९७९ साली गांथनीची किंमत फक्त सहा रुपये होती. त्यांच्या बालपणात दोन आणे! आज गोव्याच्या कुठल्याही मार्केटमध्ये पाचशे रुपयांखाली गांथण मिळत नाही!)

पावसाळ्यात चातुर्मास साजरा करायची पद्धत होती. चातुर्मासात घरी आमचे दादा ‘रामविजय’, ‘पांडवप्रताप’, ‘हरिविजय’, ‘भागवत’, ‘दासबोध’ वगैरे ग्रंथांचे वाचन करीत. केवळ मौज म्हणून ते माझ्याकडूनही वाचून घ्यायचे. त्यामुळे मला मराठी वाचण्याचा चांगलाच सराव झाला. पुढे हे वाचन नाट्यव्यवसायात वावरताना कामी आले. पण एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल केली पाहिजे की माझे उच्चार स्पष्ट असले तरी दादांसारखे सुरेल वाचन मला कधी जमले नाही. स्वरांचे व माझे नाते कधीच जुळले नाही; अन्यथा मी नक्कीच बर्‍यापैकी गायकनट झालो असतो. पण गायनाचे अंग नसतानाही मी या क्षेत्रात टिकलो, कारण माझी अभ्यासू वृत्ती, अचूक शब्दफेक व आवाजाचा कणखरपणा!

आमच्या गावात शिमग्याचा उत्सव ‘इंत्रुज’ या नावाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. इंत्रुजाची परंपरा खूप वर्षांपासून चालू आहे. वास्तविक ‘इंत्रुज’ हे पोर्तुगीज नाव. ख्रिश्‍चन लोक कार्निव्हाल करतात त्याला इंत्रुज म्हणतात. मात्र डोंगरीत इंत्रुज साजरा केला जातो हिंदू बांधवांकडून. ती कहाणी मोठी मजेशीर आहे. धार्मिक दहशतीच्या म्हणजे इन्क्विजिशनच्या काळात पोर्तुगिजांनी हिंदू सणांवर बंदी घोषित केली. गोव्यातले अनेक सण बंद पडले. त्यांत डोंगरीचा शिमगोत्सवही होता. एकदोन वर्षे शिमगा साजरा करताच न आल्यामुळे डोंगरीकर ग्रामस्थ बेचैन झाले. काय करावे कोणाला कळेना. शेवटी बराच खल करून त्यांनी एक युक्ती काढली- ‘पणजीला जाऊया व आम्ही इंत्रुज साजरा करणार आहोत असे सांगून लायसन्स काढूया. पोर्तुगिजांनाही वाटेल की आता हिंदूसुद्धा इंत्रुज करतायत हे चांगले लक्षण आहे.’ सर्वांना ही कल्पना पसंत पडली व ग्रामस्थांच्या मंडळाने पणजीला जाऊन ‘इंत्रुज’ साजरा करण्याचे लायसन्स काढले. मात्र गावात येऊन इंत्रुजाच्या नावाखाली पारंपरिक शिमगाच साजरा केला. तेव्हापासून डोंगरीच्या शिमगोत्सवाचे नामाभिधान ‘इंत्रुज’ असे झाले! इंत्रुज हा सण संपूर्ण गाव एकत्र येऊन करीत असला तरी गावातले लोक एकूण पाच माटवांत विखुरलेले आहेत. थोरल्या भाटात तारी, बाब्रो व धोमे असे तीन माटव व धाकट्या भाटात देट्टेकार व सटी जगदंबा असे दोन माटव. आमचे घर थोरल्या भाटात होते. त्यापैकी तारी माटवाचे लोक इंत्रुजोत्सवात नाटक करीत. बाकीच्या दोन माटवांत नाटके करायची पद्धत नव्हती. अर्थात डोंगरीत होणारी सर्व नाटके मराठी नाट्याचे आद्यशंकराचार्य वै. कृष्णंभट्ट बांदकर यांच्या परंपरेचा वारसा घेऊनच होत असत. तारी माटवात नाटके होतात पण आमच्या माटवात होत नाहीत हे शल्य ‘धोमे’ माटवातील काहीजणांना सतत जाचत होते. याच माटवातील काहीजणांनी एकत्र येऊन धोमे माटवात नाटके करायला सुरुवात केली. ‘रामराज्यवियोग’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘रणदुंदुभी’, ‘विद्याहरण’ यांसारखी दर्जेदार नाटके त्यांनी हिरिरीने सादर केली. मात्र हा जोम जेमतेम साताठ वर्षे चालला व हे नाट्यप्रयोग बंद पडले. यात जमेची बाजू एवढीच होती की, या नाटकांतून माझे एक चुलते कै. येसो सूर्या वाघ यांनी अनेक भूमिका वठवल्या. ते एक अतिशय उत्तम नट होते असे मला वडीलधारी माणसे सांगायची. आम्ही काही त्यांच्या भूमिका पाहू शकलो नाही. कारण ते वारले तेव्हा आम्ही अगदी लहान होतो. पण ते गेल्यानंतरही त्यांनी गाजवलेल्या भूमिकांची चर्चा लोकांमध्ये अनेक वर्षे चालू होती. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकातील त्यांचा विक्रांत तर म्हणे गोवाभर गाजला होता. ‘विद्याहरण’ नाटकातील त्यांची शिष्यवराची भूमिका पाहून साक्षात मा. दीनानाथ यांनी रंगपटात येऊन म्हणे त्यांची पाट थोपटली होती व ‘आमच्या कंपनीसोबत मुंबईत येऊन नाटकात कामे करता काय?’ अशीही विचारणा केली होती. पण येसोकाकांनी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि दोघांची एकमेकांशी चांगली मैत्री असतानाही मुंबईची ऑफर अव्हेरून येसोकाका डोंगरीतच राहिले.

आता मा. दीनानाथ व येसो सूर्या वाघ या दोघांचीही दोस्ती कशी जुळली अशी शंका काहीजणांच्या मनात आली असेल. त्याचे उत्तर एवढेच की दीनानाथांच्या बालपणातला बराच काळ डोंगरी गावात गेला. त्यावेळी अनेक डोंगरीकर त्यांचे सवंगडी बनले. डोंगरीला तारी मंडपात नाटक चालू असताना पडदा पडला रे पडला, छोटा दीना रंगमंचावर चढायचा व आपल्या अनोख्या ढंगात ‘पांडुनृपती जनक जया’ हे नाट्यपद आपल्या सुरेल पण पल्लेदार आवाजात गाऊन दाखवायचा. लोकही खूश होऊन छोट्या दीनाला पैसा- दोन पैसे बक्षीस म्हणून द्यायचे. कधीकधी आणादेखील मिळायचा. पुढे दीनानाथ मुंबईला गेला. महाराष्ट्रभर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या अनेक भूमिका गाजल्या. पण मोठा गायकनट बनूनही दीनानाथ गावातल्या आपल्या सहकार्‍यांना विसरला नाही. कंपनीच्या वाहनातून दौर्‍यावर आला की तो आवर्जून येसो व इतर मित्रांना भेटण्यासाठी यायचा. आपल्या नाटकाच्या प्रयोगाचे पासेस त्यांना देऊन मुद्दाम नाटकाला बोलवायचा. माझ्या ओळखीच्या कितीतरी जणांनी दीनानाथांच्या ओळखीने कंपनीची ती नाटके पाहिली होती.

‘मुंबईला येतोस का आमच्यासोबत?’ हा दीनानाथांचा प्रस्ताव येसो वाघ यांनी धुडकावला. कारण कर्त्यासवरत्या मुलाने नाटकं करायला कंपनीत जाणं घरच्या माणसांना पसंत नव्हतं.

येसो वाघ यांची मुंबईची वारी हुकली पण गावातली नाटकं मात्र चालूच राहिली. तथापि, त्यांचा वकूब पंचक्रोशीपर्यंत मर्यादित होता, तो नंतर वाढला व येसो वाघ यांना गोव्याच्या इतर भागांमधूनही निमंत्रणे यायला लागली.

नाटकाचा कीडा हा असा येसो सूर्या वाघ यांच्यामार्फत माझ्या अंगात घुसला त्याची कथा अशी ः

थोरल्या भाटात नाटके फक्त तारी मंडपात होतात याचा विषाद माझ्या समवयस्क असलेल्या अनेक मित्रांना एकसारखा वाटत होता. नाटकात काम करायला इच्छुक असलेल्यांची संख्या तर वाढत चालली होती आणि त्या मानानं संधी तशा कमी होत्या. युवा मंडळींनी यावर बराच खल केला, चर्चा केली आणि सरतेशेवटी असा निर्णय घेतला की गावातला कुठलाही उत्सव, ज्या उत्सवात गावचे सरसकट लोक सहभागी होतात असा उत्सव निवडून त्यात नाटक करायचे. असा उत्सवही फारसं डोकं न खाजवता मिळाला. ‘डोंगरमाथ्यावरील सटीच्या देवळात होणारा चोवीस तासांचा नामसप्ताह.’ सबंध गोव्यातून नामांकित भजनी कलाकार या सप्ताहात सहभागी होऊन आपली सेवा सटीचरणी अर्पण करायचे. मात्र सप्ताहकाळात नाटके होत नसत. बस्स! ही उणीव भरून काढण्याचा चंग आम्ही युवामनांनी बांधला आणि दोन नाटकांची निवडही करून टाकली. ती दोन नाटके होती- संगीत ‘यज्ञमंडप’ आणि संगीत ‘प्रजेचा राजा.’

वरील दोन नाटकांपैकी सं. ‘यज्ञमंडप’ या नाटकात शंकराची प्रमुख भूमिका माझ्या वाट्याला आली. तीच माझी पहिली भूमिका. साल होते १९४२. याच वर्षी ९ ऑगस्टपासून भारतात ‘छोडो भारत चळवळ’ सुरू झाली होती. देशात राज्यक्रांती तर माझ्या जीवनात ‘नाट्यक्रांती.’ ‘नाट्यक्रांती’ हा शब्दप्रयोग मी मुद्दाम वापरला आहे. त्याचे कारण पुढे ओघाने येईलच.

सं. ‘यज्ञमंडप’ हे आम्हा मुलांचे पहिलेच नाटक होते. पण त्याचा प्रयोग अतिशय सुंदर वठला. माझी भूमिकाही अप्रतिम झाली. प्रेक्षकांनी मुक्तकंठाने स्तुती केली. काहीजण म्हणाले, हा चुलत्याच्या वळणावर गेला. त्याच्यासारखाच आवाज. शब्दांची फेकही त्याच्यासारखीच पण देहयष्टी मात्र किडकिडीत. आज आहे तशीच. लोक माझी स्तुती करीत होते. चुलत्याशी माझी तुलना करीत होते. पण मी त्यांना धडपणे पाहिलेही नव्हते. त्यांचे नाटकातील एकही काम नजरेसमोर ठेवावे एवढे माझे वय नव्हते. मला जाण येण्याअगोदर येसो वाघ कैलासवासी झाले. पण पूर्वसंकेतानुसार घराण्यातील व्यक्तीचे गुण नंतरच्या पिढीत उतरतात असे म्हणतात तसाच काहीसा प्रकार माझ्याबाबतीत घडला असावा. हे सर्व जरी खरे असले तरी माझ्या त्या भूमिकेच्या यशाचे सारे श्रेय आमच्या त्या नाटकाचे दिग्दर्शक कै. मा. फोंडू वेरेकर यांनाच खर्‍या अर्थाने द्यावे लागेल. ही आमची दोन्ही नाटके त्यांनी व त्यांचे एक सहकारी उत्तम सातर्डेकर यांनी बसवली होती. या नाटकांच्या तालमी तब्बल पाच महिने चालल्या होत्या. फोंडूमाम व सातर्डेकर मास्तर डोंगरीत तळ ठोकूनच बसले होते. या प्रदीर्घ काळात मी सतत त्यांच्यासोबत असायचो. त्यांचे जेवण करणे, त्यांना पाणी आणून देणे, भांडी घासणे ही सगळी कामे शिष्याने गुरूंची सेवा करावी अशा अनन्यभावाने मी करीत होतो. त्यामुळे दोन्ही मास्तर माझ्यावर खूश होते. वेळ मिळेल तेव्हा नाटकात काम करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे ते मला शिकवायचे. नटाने नाटकात कसे चालले पाहिजे, कसे बसले पाहिजे, कसे उठले पाहिजे यातील खाचाखोचा समजावून सांगायचे. पन्नास मीटर अंतरावर असलेल्या माणसालासुद्धा नाटकातले संवाद नीट ऐकू आले पाहिजेत. त्यासाठी पल्लेदार आवाज हवा व तो कमावण्याचे शास्त्रही यायला हवे. जोडीला उत्तम मुद्राभिनय करता यायला हवा. पण मुद्राभिनयापेक्षा अधिक महत्त्वाचे ठरते ते लांब पल्ल्यापर्यंत संवाद पोचवण्याचे तंत्र. पुन्हा संवाद बोलताना भाषा शुद्ध बोलण्याचे व्यवधानही आवश्यक. उच्चार स्पष्ट असले तरच संवाद ऐकू येणार. त्यासाठी जिभेलाही शुद्ध बोलण्याचा सराव झाला पाहिजे अशा अनेक खुब्या त्यांनी मला शिकवल्या. मीही निष्ठापूर्वक त्याला अभ्यासाची जोड दिली. वाचण्याचा सराव तर आधीपासून होताच. त्यामुळे तालीम व्यवस्थित वठली तर नाटकातील भूमिका कधी कोसळत नाही हे मला फोंडूमाम वेरेकर यांनी शिकवले. शंकराची भूमिका त्यामुळे मी यथास्थितपणे केलीच, पण पुढील आयुष्यातही अनेक भूमिकांचे आव्हान पेलताना मला हा अनुभव कामी आला.

‘यज्ञमंडप’मधील माझी शंकराची भूमिका चांगली झाली. त्यामुळे याला पुढे जर चांगले शिक्षण मिळाले तर हा एक चांगला नट होऊ शकेल असे आमच्या नाटकाला संगीत देणारे गोव्यातले त्याकाळचे प्रख्यात पेटीवादक दत्तोबा शिरोडकर यांना वाटले व तसे त्यांनी माझे वडील विष्णू सूर्या वाघ यांच्याकडे बोलूनही दाखवले. ‘याला डोंगरीपुरताच का ठेवतोस? जरा बाहेर जाऊनही करू दे की नाटकं’ असं म्हणत त्यांनी मला शिरोड्याला श्री शिवनाथाच्या जत्रोत्सवात नाटक करण्यासाठी नेले. शिवनाथ हा आमचा कूळदेव. शिरोड्याला नाटक म्हटल्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. पण नाटकाच्या तालमी व्हायच्या बांदोड्यात. आजचे प्रसिद्ध गायक मा. नरहरी वळवईकर यांच्या घरी. तिथे मला कै. विनायक वळवईकर ऊर्फ दादीमाम व मा. पांडुरंग फडते बांदोडकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे माझी कामे अधिक चांगली व्हायला लागली. मलाही आता अभिनयात गोडी वाटू लागल्यामुळे मी मन लावून माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकेविषयी अभ्यास करू लागलो. अभ्यासावाचून काही साध्य होत नाही याची खूणगाठ मी मनाशी अगोदरच बांधून ठेवली होती. नाटकात काम करणे हा केवळ परकायाप्रवेश असतो हे मला जाणकारांनी शिकवले होते. स्टेजवर काम करणे म्हणजे भूमिकेत घुसणे नव्हे तर ती भूमिका आपल्या व्यक्तिमत्त्वात पेरणे हा गुरूमंत्रही दिला होता. त्यामुळे मी भूमिकेविषयी विचार करू लागलो. त्याकाळी बहुतेक सर्व नाटके संगीतच असायची. मला गाण्याचे अंग नव्हते. त्यामुळे नायकाची भूमिका सहसा माझ्या वाट्याला येत नसे. पण प्रमुख खलनायकाची किंवा प्रमुख विनोदी पात्राची भूमिका हटकून मलाच दिली जायची. त्याकाळातली बहुतेक नाटके पौराणिक किंवा ऐतिहासिक असत. सामाजिक नाटकांची प्रथा साधारण १९५०-५५ नंतर सुरू झाली. खलनायकी भूमिका करताना रंगभूमीवर खूप ‘बेअरिंग’ सांभाळावे लागते. त्या मानाने विनोदी भूमिका करताना थोडे रिलॅक्स मूडमध्ये जाता येते.

डोंगरी व शिरोडा येथील नाटके गाजवल्यानंतर मला पंचक्रोशीतून नाटकांत कामं करण्याची आमंत्रणे येऊ लागली. जाईल तिथे माझा गवगवा होतो हे पाहून घरचेही लोक सुखावत होते. गावच्या पंचक्रोशीतील नाटकांत ज्या-ज्या वेळी मला काम असे त्यावेळी माझ्या कुटुंबीयांपैकी माझे वडील, माझे एक चुलते नारायण नाईक व चुलतबंधू कृष्णा शाणो नाईक हे प्रामुख्याने हजर असत. लोकांनी माझे कौतुक केले की त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढे. वडील तर नाटकातील सर्व कलाकारांची जातीने विचारपूस करून त्यांना चहा-भजी आणून देत. गावच्या नटमंडळीत आम्ही चार कलाकार असे होतो की आमच्या भूमिका नाटकात आहेत असे कळायचा अवकाश, नाटकाला तुफान गर्दी लोटायची. हे चौघे म्हणजे मी स्वतः, दुसरा माझा एक मित्र दिपू सोसो नाईक (आता दिवंगत), तिसरा गणेश नारायण नाईक (तोही हयात नाही) व चौथा अनंत मंगेश नाईक. दिपूचा विनोदी भूमिका करण्यात हातखंडा होता. व्हिलन मी करायचे हे आधीच ठरलेले असायचे. गणेश हिरो व अनंत स्त्रीभूमिकेत शोभून दिसायचा. रामनाथ शिरगावकर नावाचा आणखी एक कलाकार होता तो भावस्पर्शी भूमिका खूप छान करायचा. असे पाचसहा ठराविक कलाकार असले की कुठलेही नाटक आपोआप रंगत असे. संगीत ‘हरिश्‍चंद्र’ या नाटकातील आमच्या भूमिका त्यावेळी बर्‍याच गाजल्या. रामनाथ- हरिश्‍चंद्र, गणेश- नारद, दिपू- भट, अनंत- भटीण व मी- विश्‍वामित्र. मला नाटकातील हरिश्‍चंद्राचा छळ करताना बघून काही प्रेक्षक चक्क शिवीगाळ करीत. बायका माझ्या नावाने बोटे मोडीत. दुसरे एक नाटक आम्ही गाजवले होते ते म्हणजे ‘खुनी सम्राट.’ हे एक काल्पनिक नाटक होते. पुढे आम्ही ‘सौभद्र’, ‘शाकुंतल’, ‘रामराज्यवियोग’, ‘मूकनायक’, ‘मृच्छकटिक’, ‘स्वयंवर’, ‘मानापमान’, ‘कीचकवध’, ‘विद्याहरण’, ‘शिक्का कट्यार’, ‘स्वर्गावर स्वारी’, ‘बाळ चिलया’, ‘सत्याग्रही’, ‘चिमुकले वीर’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’, ‘बेबंदशाही’, ‘करीन ती पूर्व’, ‘रणदुंदुभी’ अशी कितीतरी नाटके गावच्या उत्सवात केली. एक चांगला नट म्हणून मी बर्‍यापैकी स्थिरावलो. पणजी, फोंडा, वास्को, मडकई, मडगाव इत्यादी ठिकाणांवरून नाटकांत कामे करण्याची आमंत्रणे येऊ लागली.

माझ्या वडिलांनी आपल्या हस्ताक्षरात लिहून ठेवलेल्या आत्मचरित्राचे हे पहिले प्रकरण. तेच शेवटचेदेखील. नंतरच्या त्यांच्या आयुष्यातील गोष्टी त्यांना लिहिला आल्या असत्या तर खूप बरे झाले असते. पण त्यांनी ज्या काही आठवणी वेळोवेळी सांगितल्या, त्यांचा जो पत्रव्यवहार मी सातत्याने वाचला आणि संपर्कात आलेल्या माणसांकडून ज्या गोष्टी कानावर पडल्या त्यांतून वडिलांचे व्यक्तिमत्त्व बरेचसे उलगडत गेले.

(क्रमशः)