– विष्णू सूर्या वाघ
(भाग – ३)
शिरोड्यात शिवनाथाच्या जत्रौत्सवात भूमिका करू लागल्यानंतर वडिलांच्या नावाची चर्चा आजूबाजूला होऊ लागली. एक म्हणजे त्या नाटकात नरहरी वळवईकर, सुकडाराम आडपैकर यांच्यासारखे नावाजलेले नट काम करायचे. वडिलांच्या भूमिका अर्थातच गद्यच असायच्या. पण संगीताची बाजू निकामी असतानाही अभिनयाच्या बळावर ते प्रेक्षकांचे लक्ष आपणाकडे वेधून घ्यायचे. यामुळे या नाटकांना संगीतसाथ देणारे दत्तोबा शिरोडकर यांची विशेष मर्जी त्यांच्यावर बसली. ‘वागांलो सूर्या बरें काम करता आं… हो पार्ट तर तेणेच करपाचो’ असे म्हणत दत्तोबा सूर्याची शिफारस इतरत्र करू लागले. त्यामुळे विविध ठिकाणांहून त्यांना आमंत्रणे येऊ लागली.
आमच्या डोंगरी गावच्या कलासंपन्नतेबद्दल मी बरंच काही याआधीच सांगितलंय. डोंगरी ही संगीत रंगभूमीची गंगोत्री. डोंगरीचं नाट्यवेड हे सर्वात जुनं. डोंगरीकरांची आर्थिक परिस्थिती तशी बेतास बेत, पण नाटक निवडतील ती मात्र एकाहून एक भारी. डोंगरीवासीयांचा एक ठळक गुण (की दोष?) म्हणजे ‘वॉर्रादपण.’ छोटंमोठं नव्हे तर कंपनीचं नाटक गावात झालं पाहिजे ही जिद्द. याच जिद्दीपोटी इंत्रुजोत्सवाच्या काळात डोंगरीत मोठमोठी नाटकं सादर केली जायची. गावात नामांकित नटमंडळी आधीपासूनच होती. सूर्या वाघ यांच्या पदार्पणानंतर त्यात आणखी एकाची भर पडली.
वडिलांच्या तरुणपणी त्यांच्यासोबत नाटकांत काम करणारे अनेक कलाकार होते. अंकुश वेर्णेकर हे मुख्य गायक-नटाची भूमिका करायचे. सोक्रू कुर्डीकर हे स्त्री-भूमिका करण्यात वाकबगार होते. नरसिंह शिरगावकर, रामनाथ शिरगावकर, रामराय शिरोडकर, शिवानंद वेर्णेकर, अनंत वेर्णेकर, गोविंद कुर्डीकर, गोविंद नाईक, केशवराव नाईक, भिकू देसाई, भिकारो शिरगावकर अशी कितीतरी कलाकारांची नावे मला आठवतात. आजोशी येथे रंगनाथ च्यारी नावाचे ज्येष्ठ कलाकार होते. ते संगीत भूमिकाही चांगल्या करीत व हार्मोनिअमसाथही उत्तम प्रकारे करीत असत. च्यारी एक नामांकित संगीतदिग्दर्शकही होते. शिवाय ते उत्कृष्ट काष्ठशिल्पकार होते. डोंगरमाथ्यावरील सटीच्या मूर्तीभोवतीची लाकडी प्रभावळ व मखर त्यांनी करून दिले होते. रंगनाथ च्यारी व सूर्या वाघ ही जोडी असली की नाटकाचा प्रयोग रंगणारच या विश्वासाने रसिक तुडुंब गर्दी करीत. ‘सौभद्र’मध्ये रंगनाथ च्यारी ‘श्रीकृष्ण’ तर सूर्या वाघ ‘वृंदावन’, ‘विद्याहरण’मध्ये रंगनाथ च्यारी ‘कच’ तर भाऊ ‘शुक्राचार्य’, ‘एकच प्याला’मध्ये रंगनाथ ‘रामलाल’ तर सूर्या वाघ ‘सुधाकर’ अशा त्यांच्या भूमिका ठरलेल्या होत्या.
गावात होणार्या नाट्यप्रयोगांची चर्चा हळूहळू इंत्रुज उत्सवासाठी येणार्या सग्या-सोयर्यांच्या माध्यमातून पंचक्रोशीत पसरू लागली. ती पणजीपर्यंत पसरली. पणजी हे शहर डोंगरीपासून साधारण १७ कि.मी. लांब. पणजीत त्यावेळी रथसमाप्तीकर समाजातर्फे उत्सवात नाटकांचे प्रयोग केले जात होते. एक दिवस रथसमाप्तीकर समाजातर्फे सूर्या वाघ यांना नाटकात काम करण्याचे आमंत्रण आले. तेव्हापासून रथसमाप्तीकर समाजाचे नाते जुळले. पणजीतील नाटकांमुळे मित्रमंडळीचा पसारा वाढला. ओळखीपाळखी झाल्या व यातूनच काही समविचारी युवकांनी एकत्र येऊन ‘नवनाट्य श्रृंगार’ ही संस्था स्थापन केली. त्यात सूर्या वाघही होते. नवनाट्य शृंगारच्या संस्थापकांत डॉ. सावळो केणी, वामन कळंगुटकर, विष्णू कुर्डीकर, सीताराम नार्वेकर अशी जुनीजाणती कलाकार मंडळी होती. पारंपरिक नाटकांपेक्षा नव्या धाटणीची नाटके करण्यात नवनाट्य शृंगार आघाडीवर होती.
मेरशीला रघुवीर दत्तू होबळे नावाचे तरुण उद्योजक होते. त्यांना नाटकाचे अतिशय वेड. मेरशीतील उत्सवात मोठमोठी नाटके करण्याची त्यांना हौस होती. नाटकातील मुख्य संगीत भूमिका तेच करायचे. संगीत अभिनेत्री मात्र खास पैसे खर्च करून मुंबई किंवा पुण्याहून आणायचे. माझे वडील होबळे यांचे मित्र. त्यामुळे सूर्या वाघ मेरशीत कामे करू लागले. करता करता होबळेंच्या नाटकांचे दिग्दर्शकही झाले.
याच काळात गोव्याच्या स्वातंत्र्याच्या चळवळीने जोर धरला होता. आझाद गोमंतक दल आणि नॅशनल कॉंग्रेस गोवातर्फे ठिकठिकाणी आंदोलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भाऊंचा स्वभाव मुळातच राष्ट्रवादी. विवेकानंद, लोकमान्य, सावरकर यांचे विचार त्यांना नेहमीच पटायचे. तरुण वयात भाऊंनीही स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या परीने योगदान करण्याचा निर्णय घेतला. चळवळीची कागदपत्रे व संदेश इकडून तिकडे पोचवण्याचे काम भाऊ करीत असत. ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र केळेकर यांनी भाऊंच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सविस्तर लिहिलेच आहे. त्याची मी पुनरावृत्ती करू इच्छित नाही.
भाऊंनी स्वातंत्र्यसंग्रामात काम केले खरे, पण याबद्दलची शेखी त्यांनी कधीच मिरवली नाही. ‘मी गोवा मुक्तीसाठी लढलो; व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हे’ असे ते अभिमानाने सांगायचे.
नवनाट्य श्रृंगार या नाट्यसंस्थेनंतर वडिलांचा सहयोग लाभलेली आणखी एक मातब्बर संस्था म्हणजे फोंड्याची ‘हंस संगीत नाट्य मंडळ’. रंगभूमीसाठी निष्ठापूर्वक काम करणार्या संस्थेचं नाव सांगा पाहू असा चटकन प्रश्न एखाद्याला केला तर पहिल्या पाच नावांमध्ये ‘हंस’चा समावेश होईल. ‘हंस’ हा तसं पाहिलं तर एकखांबी तंबू. विश्वनाथ यशवंत नाईक नावाच्या ‘नाट्यपिशा’ माणसाने आपल्या बाहूंचा आधार देऊन उभा केलेला. सोबत अनेक सवंगडी. तेदेखील रत्ने-माणके पारखून घेतात त्याप्रमाणे पारखून, तपासून निवडलेले. त्यातलेच एक सूर्या वाघ. सोबत तुळशीदास लोटलीकर, शांताराम नाईक, बाबनी गावकर, नरसिंह नाईक, पांडुरंग गावकर खांडोळकर, अलका वेलिंगकर, शशिकला नागेशकर, गुलाब मंगेशकर, किशोरी हळदणकर, तुकाराम फोंडेकर, शांताराम नावेलकर, कांता पारकर, केशव वाघुर्मेकर, किशोर बोरकर असे बहुरंगी कलाकार व तंत्रज्ञ.
हंस संगीत नाट्यमंडळ ही संस्था विश्वनाथ नाईक यांनी सुरुवातीला गावातील उत्सवांत नाटके करण्यासाठी स्थापन केली होती. कालांतराने तिचे क्षेत्र विस्तारत गेले व रंगभूमीच्या क्षेत्रात ती गोव्यातील आघाडीची संस्था बनली.
सूर्या वाघ यांनी आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्षे हंस संगीतसाठी वेचली. त्यासंबंधी मी विस्ताराने पुढे लिहिणार आहे. पण ‘हंस’सोबत वावरताना त्यांच्या रंगमंचीय व्यक्तिमत्त्वाचा जो विकास झाला त्यामागे त्यांची एक कलाकार म्हणून नक्की भूमिका काय होती याचे दर्शन घडवणारा त्यांचा एक लेख ‘हंस’च्या रौप्यमहोत्सवी स्मरणिकेत मला सापडला. हा लेख वाचल्यानंतर सूर्या वाघ यांची रंगभूमीवर किती नितांत श्रद्धा होती याचा प्रत्यय वाचकांना येईल.
गोमंतकातील नाट्यवेड : एक चिंतन आणि आवाहन
– सूर्या वाघ
आज मी तुमच्यासमोर जे विचार मांडणार आहे ते माझ्या तीस वर्षांच्या नाट्यविषयक अनुभवांतून प्रकट झालेले आहेत.
गोमंतक ही कलावंतांची भूमी आहे; आणि सर्वार्थाने ते खरेही आहे. पण गोमंतकीयांच्या या कलागुणांचे चीज होण्याजोगे क्षेत्र मात्र त्याला गोव्याबाहेर मिळवावे लागले हे एक कटू सत्य आहे.
गोमंतकातील कलाकार हा सर्व कलांमध्ये अग्रेसर असला तरी त्याला जबरदस्त आकर्षण आहे ते नाट्याचे. ते इतके की नाट्यवेड हा गोमंतकीयांचा एक स्थायीभाव होऊन राहिला आहे. त्याचे प्रत्यंतर गोव्यात दरवर्षी शेकड्यांनी नाटके होतात यावरून दिसून येईल. पण या नाटकांतून किती कलावंत निर्माण झाले हे एक प्रश्नचिन्ह आहे.
मी जे हे वरील विधान केले आहे ते ऐकीव नाही तर स्वतःच्या अनुभवांवरून मी हे लिहितो आहे. आज जवळजवळ मी याच क्षेत्रात वावरत असून गोव्याच्या कानाकोपर्यांत मी माझ्या कुवतीनुसार बहुतेक सर्व नव्या-जुन्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे आणि अजूनही करतो आहे. त्यातून जो मला अनुभव आला तो असा की, आम्हा गोमंतकीयांना एक न्यूनगंड आहे की, आम्ही जात्याच कलावंत आहोत आणि नाटक काय किंवा कोणतेही क्षेत्र काय, आम्ही सहज काबीज करू शकतो. माझ्या दृष्टीने हा आमचा एक भ्रम आहे. नाटकाचेच क्षेत्र जर घेतले तर ते इतके सोपे नाही. आज आम्ही ज्या तर्हेने नाटके सादर करतो ती पाहिल्यास आम्हाला या क्षेत्रात अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे याची प्रचीती येते.
आज गोव्यात जी नाटके होतात त्यांचे स्वरूप इतके विकृत असते की काही ठिकाणी तर उबग येण्यासारखे प्रयोग सादर केले जातात. काही नाट्यसंस्था किंवा व्यक्ती सोडल्या तर हे लोक नाटके कशाला करतात असे खेदाने म्हणावे लागते. मागच्या काळात जर आम्ही गेलो तर आम्हाला असे दिसून येते की त्यावेळी जी गोमंतकीयांनी नाटके करून लौकिक मिळविला, महाराष्ट्रातसुद्धा ज्यांचा उदोउदो झाला ते गोवेकर नट आज कुठे आहेत. शिवाय त्यावेळी नाट्यविषयक साधने इतकी तुटपुंजी होती की नाटके सादर करणे हे एक दिव्य होते. पण त्यावेळच्या नटांच्या अंगी एक जिद्द होती, निष्ठा होती म्हणून त्यांनी गोमंतकीय कलेची शान वाढवून, गोमंतक ही कलाकारांची भूमी आहे ही म्हण सार्थ करून, गोमंतकाचा लौकिक वाढविला. आज या कलेला पोषक अशी साधने व सोयी असून नाटके मात्र व्यवस्थित होत नाहीत. याचे कारण असे की, पहिल्याप्रथम पाठांतराचा अभाव. नाटक चार दिवसांवर आले की नाटक निवडायचे, त्यातील पात्रे ठरवायची आणि तयारीला लागायचे. मग त्यांची इतकी धावपळ चालत असे की दोन दिवसांसाठी पेटी, नाटकाच्या वेळी नटी, आणि या सर्वांचे पातक मस्तकावर घेण्यासाठी दिग्दर्शक. अशा अवस्थेत जे नाटक होते ते पाहण्यासाठी प्रेक्षक येतात. त्यांनी जर काही विचारले तर मोठ्या अभिमानाने सांगायचे की, ‘आम्ही तालमीच घेतल्या नाहीत. चार दिवस झाले नाटक ठरविल्यास. शिवाय आम्हाला मास्तराने काहीच दाखवले नाही. आम्ही जे करतो ते सर्व आमच्या पदरचे.’ मग तेही बिचारे स्मितहास्य करून, वरून कौतुक व मनातून शिव्या देत निघून जातात किंवा आपलेपणाच्या भावनेने नाटक पाहतात. अशावेळी या तथाकथित नटवर्गास वाटते की, आमचे नाटक बरे होत नाही तर ते लोक कशाला बसून राहिले असते? या भावनेने ते नाटक करतात आणि रंग पुसल्यानंतर आपण केलेल्या नाटकाचे चर्वितचर्वण करून स्वतःच स्वतःचे कौतुक करतात. आमच्या आजच्या अपयशाचे मुख्य कारण ते हे होय.
माझ्या या अनुभवांतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की, आज आम्ही जी नाटकं करतो ती जर एक निश्चित ध्येय ठेवून केली असती तर मात्र आम्ही काही उच्च स्तरावर नाटके करून गोमंतकाच्या कलेत खासच भर घातली असती. कारण आमच्या आत्म्याची जडणघडण इथल्या निसर्गाच्या सान्निध्याने कलावंताची घडविल्यामुळे इतक्या सहजतेने आम्हाला नाटके सादर करणे शक्य होते. उणीव ही की, हिरा जरी कितीही तेजःपुंज असला आणि त्याला जर पैलू पाडले नसतील तर त्याची किंमत काचेच्या मोलाची होते. म्हणूनच उत्तम कारागीराकडून पैलू पाडून योग्य अशा कोंदणात बसवला जातो तेव्हाच त्याचे तेज प्रकट होते. त्याप्रमाणे त्या आमच्यातल्या उपजत कलाकाराला जर आम्ही प्रयत्नांच्या निकषावर घासून योग्य अशा कारागीराचे मार्गदर्शन घेतले तर आम्ही खचितच गोमंतकाची शान वाढविण्यास कारणीभूत होऊन गोमंतक ही कलाकारांची खाण आहे या संज्ञेस पात्र होऊ.
आम्ही आजच्यापेक्षा चाळीस वर्षे मागे गेलो तर मात्र आम्हाला एवढे मोठे चिंतन करावे लागेल. कुठे आहेत ते महाराष्ट्राला वेडावून सोडणारे कै. मा. दीनानाथ मंगेशकर, कै. गोविंदराव माशेलकर, कै. रघुवीरराव सावकार किंवा उत्सवातून नाटके करता करता मास्टर, नटवर्य या पदव्या मिळविणारे मा. दत्ताराम वळवईकर, मा. गंगाराम वळवईकर, रामदास कामत, नटवर्य श्री. श्रीपाद नेवरेकर? हे पाहिले तर ‘नाही, आज तरी नाही’ हेच उत्तर मिळेल. पण ही परिस्थिती आज तरी आमच्यावर येता कामा नये. कारण या माणसांनी ही कला प्रयत्नांनी साध्य केली. कीर्ती मिळविली ती निष्ठेने प्रयत्न करून. कारण आजच्यासारखी प्रभावी साधने त्यावेळी नव्हती म्हणून. मी म्हणतो की, आजच्या तरुणांना हे आव्हान आहे. ते आव्हान त्यांनी स्वीकारले तर मात्र आम्ही खचितच विजयी होऊ.
मला आजच्या तरुणांना आवर्जून सांगावेसे वाटते की, आम्ही जी ही कला कष्टसाध्य रीतीने जागविली, वाढविली तिची जोपासना तुम्हाला सहजतेने करता येण्याजोगी आहे. आज गोव्यात सरकारने ‘कला अकादमी’ स्थापन करून तिच्यामार्फत कलेच्या वाढीस पोषक अशी अनेक दालने उघडली आहेत. दरवर्षी घेतल्या जाणार्या नाट्यस्पर्धा, शिबिरे, त्या स्पर्धांत यशस्वी ठरलेल्या कलाकारांचा गौरव… हे पाहून वाटते की, आमच्या तरुणांनी हे आव्हान जर स्वीकारले तर आम्ही भविष्यात तरी गोव्याची शान वाढविणारी वैशिष्ट्यपूर्ण रंगभूमी निर्माण करून गोमंतकीय हे सर्वार्थाने कलावंत आहेत ही म्हण सार्थ करू.
मला आज अभिमानाने सांगावेसे वाटते की, ज्या संस्थेच्या रौप्यमहोत्सव स्मरणिकेत मी हे विचार मांडले आहेत ते आमच्या ‘हंस संगीत नाट्य मंडळ’ फोंडा, या संस्थेच्या या महनीय कामगिरीने भारावून गेल्यामुळे. पंचवीस वर्षांमागे ही संस्था आपल्यातील सामान्य माणसांनी निर्माण करून, तन, मन, धनाने सर्व तर्हेची झिज सोजून, आपल्या निष्ठेचे व त्यागाचे खतपाणी घालून बी पेरले म्हणून आज त्यांचा फुलाफळांनी बरहण्याजोगा वृक्ष झाला व त्याच्या मुळाशी बसून अनेकांना नाट्यविषयक सावली घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. आज जो हा महोत्सव साजरा केला जातो त्याचे कारण या माणसांनी केलेली मशागत व त्याला पोषक असे आर्थिक, मानसिक व शारीरिक ध्येयनिष्ठेने खतपाणी घालणार्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. विश्वनाथ नाईकांनाच द्यावे लागते, हे अभिमानाने व कृतज्ञतेने सांगावेसे वाटते. या माणसाने ही संस्था नावारूपास आणण्यासाठी आपल्या प्रापंचिक बाबीकडेसुद्धा एकवेळ दुर्लक्ष करून एवढी झिज सोसली आहे की तिला माझ्या दृष्टीने तरी तोड नाही. आम्ही आज सतत चौदा वर्षे ते पाहत आहोत.
आज संस्थेत जी गुणवान माणसे दिसतात त्यांना जमविण्यासाठी, जमविलेली एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले व घेताहेत त्याची प्रशंसा करावी लागेल.
म्हणून मी अभिमानाने सांगतो की, गोमंतकात नाट्यसंस्था पुष्कळ असल्या तरी पंचवीस वर्षे टिकाव धरून आपला रौप्यमहोत्सव साजरा करणारी तीच एकमेव नाट्यसंस्था होय. या फुलाफळांनी बहरास येणार्या संस्थेचा आदर्श व प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी आत्मचिंतन केले तर या संस्थेच्या कार्याचा आपण मोठाच गौरव केल्यासारखे होईल व आपल्या कलेच्या विकासात भर पडेल.
मला या संधीचा फायदा मिळाला तो लक्षात घेऊन या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व संचालक मंडळाने मागील भूतकाळाचा अनुभव घेऊन, शुभद अशा वर्तमानकाळाचा मागोवा घेत, रम्य अशा आदर्शमय भविष्यकाळातील सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करावी अशी नटेश्वरापाशी प्रार्थना करतो.