– विष्णू सूर्या वाघ
(भाग-४)
नवनाट्य श्रृंगार, पणजी आणि हंस संगीत नाट्य मंडळ, फोंडा या दोन संस्थांमुळे सूर्या वाघ यांच्या नाट्यकारकिर्दीला नवी झळाळी मिळाली. ‘नवनाट्य श्रृंगार’ ही संस्था सर्व प्रकारची नाटकं करायची. तथापि तिचा भर सामाजिक नाटकांवर अधिक होता. सं. ‘एकच प्याला’, सं. ‘देवमाणूस’, ‘डॉ. कैलास’ ही नाटकं या संस्थेनं गाजवली. डॉ. सावळो केणी सुधाकरची भूमिका छान वठवायचे. लहान असताना आजारी पडलो की तपासून घ्यायला मी रायबंदरला त्यांच्या दवाखान्यात जायचो. त्यावेळी तपासता तपासता, औषध बनवताना ते आपल्या पहाडी आवाजात सुधाकरचे संवाद म्हणून दाखवायचे. ‘पुण्यप्रभाव’मधला ‘वृंदावन’ही त्यांचा आवडता होता. भाऊंबरोबर काम करणारे वामन कळंगुटकर हे मेरशीचे. धिप्पाड देहयष्टी, भेदक डोळे व खरबरीत आवाज यामुळे स्टेजवर त्यांचे व्यक्तिमत्त्व उठून दिसे. ‘आग्र्याहून सुटका’ या नाटकात ते उमरखानची भूमिका करायचे. वडिलांच्या वाट्याला त्यांची देहयष्टी व आवाज यांना अनुरूप अशी औरंगजेबाची भूमिका यायची. पण वेळप्रसंगी ते मिर्झाराजे, जयसिंगही वठवायचे. ‘डॉ. केलास’मधला हरब करण्यातही त्यांचा हातखंडा होता.
‘हंस संगीत नाट्य मंडळ’ ही केवळ एक संस्था नव्हती. ते एक कुटुंब होते. विश्वनाथ नाईक हे त्या कुटुंबाचे प्रमुख. वारखंडे- फोंडा येथील त्यांचे घर म्हणजे जणू काही हंस संगीतचे कायमस्वरूपी बिर्हाडच होते. किती माणसे नाटकाच्या निमित्ताने त्या घरात राहून जेवून गेली असतील याची गणतीही करता येणार नाही. वारखंडेच्या हनुमान मंदिरातील चैत्रोत्सवात नाटके करण्याच्या हेतूने स्थानिक कलाकारांना घेऊन विश्वनाथ नाईक यांनी हंस संगीत हे नाट्यमंडळ स्थापन केले. १९५१ सालापासून संस्थेने उत्सवी नाटके करायला सुरुवात केली. साताठ वर्षांनंतर सूर्या वाघ, मा. काशिनाथ शिरोडकर, तुळशीदास लोटलीकर, बाबनी गावकर, शांताराम नाईक, राया बोरकर इत्यादी कलाकार विश्वनाथ नाईक यांना मिळाले व संस्थेचा लौकिक वाढत गेला. ‘हंस’चे सर्वाधिक गाजलेले नाटक म्हणजे वसंत कानेटकर यांचे सं. ‘मत्स्यगंधा!’ ‘हंस’ने या नाटकाचे गोवाभर शेकडो प्रयोग केले. बहारदार अभिनय, उत्कृष्ट संगीत, देखणे नेपथ्य, आकर्षक प्रकाशयोजना, परिणामकारक पार्श्वसंगीत आणि उत्तम निर्मितीमूल्ये यांमुळे ‘हंस’च्या ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग व्यावसायिक नाटकाच्या तोडीस तोड होत असे. या नाटकाला मार्गदर्शन करण्यासाठी विश्वनाथकाकांनी काही दिवस खास मा. दत्तारामबापूंना मुंबईवरून बोलावून आणले होते. मला आठवते, सूर्या वाघ स्वतः लक्ष देऊन नेपथ्याची उभारणी करायचे. गंगेचा घाट, नदीच्या पात्रातलं खळाळतं पाणी, धीवराची झोपडी, सत्यवतीचा बसण्याचा झोपाळा हे सगळं स्वतः करवून घ्यायचे. नाटकाच्या सुरुवातीला कालर्षी व वर्तमान यांचा प्रवेश आहे. आता सहसा तो कुणी करत नाही. पण त्या काळी हा पहिलाच प्रवेश म्हणजे नाटकाचा आकर्षण बिंदू होता. किशोर बोरकर यांचे समर्पक पार्श्वसंगीत, ढगांचा कडकडाट आणि मग कांता पारकर व बंधूंच्या कल्पकतेतून पडद्यावरून सरकत जाणारे काळेभोर मेघ असे वातावरण एकदा का त्या प्रवेशातून निर्माण झाले की प्रेक्षकांची दृष्टी रंगमंचावरच खिळून राहायची. त्यानंतर नाटकाला प्रारंभ व्हायचा तो थेट सूर्या वाघ यांच्या एंट्रीने. ‘‘छे छे छे… काय बेटे नगरवासी पौरजन तरी…’’ असे म्हणत चंडोलच्या रूपात भाऊ एंट्री घेत. पुढचा साताठ मिनिटांचा स्वगतपर मोनोलॉग त्यांचाच असे. नंतर धीवराशी ओळख झाल्यावर सत्यवती नमस्कार करायला येते त्यावेळी ‘हं हं दूर हो. धीवरकन्ये दूर हो. काय हा माशांचा वास? छे छे! नाकातले सगळे केस जळाले…’ हा डायलॉग ते इतक्या उत्तम तर्हेने घेत की प्रेक्षक खो-खो हसायचे.
‘मत्स्यगंधा’मध्ये भाऊ (चंडोल) व बाबनी गावकर (धीवर) यांची जोडी छान जमायची. दोघांचीही ओळख ‘हंस’मध्ये येण्याअगोदर झाली होती. बाबनी गावकर साकोर्ड्याला अगरवालच्या खाणकंपनीत कामाला होते. तिथे नाटके बसवायला माझे वडील जात. बाबनी गावकर हे एक अफलातून नाट्यकलाकार होते. बेढब शरीरयष्टी, थोराड चेहरा, काळा वर्ण, बटबटीत डोळे असे नैसर्गिक वरदान त्यांना लाभले होते. पण आवाज मात्र अतिशय वेगळा होता. या आवाजामुळे कोणतीही भूमिका त्यांना शोभून दिसे. ‘मत्स्यगंधा’तला धीवर ते जीव ओतून करायचे. तसं पाहिलं तर ‘मत्स्यगंधा’ हे एक अद्भुत रसायन होते. विश्वनाथ नाईक यांचा देखणा देवव्रत आणि धीरगंभीर भीष्म पाहणं हा एक थरारक अनुभव होता. त्यांच्या सोबतीला असायचे ते नरसिंह नाईक ‘प्रियदर्शन’ बनून. छोटी भूमिकाही किती उठावदार बनते हे पाहायचे असेल तर नरसिंह नाईकांचा प्रियदर्शन बघावा. भाऊंचा चंडोल तर अप्रतिम व्हायचा. घुडी अवेडे येथे एकदा ‘मत्स्यगंधा’चा प्रयोग झाल्यानंतर प्रख्यात अभिनेत्री कु. फैयाज यांनी सूर्या वाघना ‘मामा, तुमच्यासारखा चंडोल कंपनीत पण दिसत नाही हो. तुम्ही मुंबईला का नाही येत?’ अशी प्रशस्ती दिल्याचे मला आठवते. मी त्यावेळी त्यांच्या बाजूलाच उभा होतो. त्यावेळी स्मितहास्य करीत माझे वडील एवढंच म्हणाले, ‘ताई, आता या वयात मुंबईत जाऊन आम्ही काय करणार? आता मुंबई गाजवली तर कदाचित पुढं आमच्या या चिरंजीवांनी!’
अलका वेलिंगकर यांची सत्यवती आणि शशिकला नागेशकर यांची अंबा (अधूनमधून गुलाब मंगेशकरही ही भूमिका करायच्या) ही ‘मत्स्यगंधा’ची शक्तिस्थळं होती. पराशरची भूमिका तुळशीदास लोटलीकर बहारदारपणे करायचे. दिसायलाही देखणे आणि गायनही कर्णमधुर. शंतनूची भूमिका करणारे उसगावचे शांताराम नाईक यांचे गाणे नितळ आणि स्वच्छ असायचे! ‘स्त्रीप्रेमाविण जीवन अवघे’ आणि ‘संसारसुख नसे भाळी’ ही दोन्ही गाणी ते उत्कटतेने गायचे. मला त्यांचीच भूमिका खरं तर अधिक आवडायची.
‘मत्स्यगंधे’ने भारलेले ते ‘हंस’मधील दिवस माझ्या काळजावर कायमचे कोरले गेले आहेत. या नाटकात ऑर्गनवादन करायचे सावर्ड्याचे प्रसिद्ध संवादिनीवादक तुकाराम फोंडेकर. तबलासाथीला असायचे वेलिंगचे शांताराम नावेलकर. फोंडेकर व नावेलकर ही जोडगोळी प्रसिद्ध होती, पण दोघांचेही स्वभाव परस्परविरोधी. फोंडेकर अत्यंत सोज्वळ तर नावेलकर प्रचंड वात्रट. माझ्या वडिलांचं व त्यांचं अनेकवेळा (खोटंखोटं) भांडण व्हायचं. तालमीच्या वेळी तबला वाजवताना मध्येच ‘ढॉंऽऽव’ असा आवाज काढून कलाकारांना हसवण्याची त्यांना सवय होती. गंभीर व शोकाकूल गाणं स्टेजवर चालू आहे आणि शांतोमाम मात्र जीभ बाहेर काढून, गाल तट्ट फुगवून अभिनेत्रीला हसवण्याचा प्रयत्न करीत आहेत असं चित्र अनेकवेळा पाहिलं आहे. एवढं असूनही शांताराम नावेलकर यांचं तालावर प्रचंड प्रभुत्व होतं.
‘मत्स्यगंधा’तल्या पडद्यांची तसेच वेशभूषेची जबाबदारी केशव वाघुर्मेकर सांभाळायचे. केशव वाघुर्मेकर ही एक गरीब गाय होती. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पडदेवाल्याचा व्यवसाय केला. त्याकाळी ‘नेपथ्यकार’ हा शब्द फारसा प्रचलित नव्हता. केशवमाम हे पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक पद्धतीची धोतरं पात्रांना नेसवण्यात अत्यंत प्रवीण होते. नाटकाची रंगभूषा सखाराम मयेकर करायचे. मराठी रंगभूमीवर मी पाहिलेला हा एक अत्यंत विनम्र आणि समर्पित रंगभूषाकार. वडिलांसोबत शेकडो नाटकांत त्यांनी रंगभूषा केली. मात्र ते आजही आठवण काढताना सांगतात, आम्ही जरी अनेक नाटकांत मेकअप केला तरी सूर्यामाम हेच चांगले मेकअपमन होते. नाटकातली प्रमुख व्यक्तिरेखा (विशेषतः शिवाजी, संभाजी, ययाती, देवव्रत यांसारखी) दाढी असलेल्या असतील तर ती पात्रं वडिलांकडूनच आपला मेकअप करवून घ्यायची. त्यावेळी त्यांच्यासोबत फिरताना अनेक वेळा मी त्यांना प्रमुख पात्रांची रंगभूषा करताना पाहिले आहे.
‘हंस’चे हे ‘मत्स्यगंधा’ गोवाभर गाजले. पुढे ते विश्वनाथकाकांनी दिल्लीला नेले. महाराष्ट्र रंगायनच्या संगीत नाटक स्पर्धेत या नाटकाला पहिले बक्षीस मिळाले. आमच्या डोंगरीच्या मुकुंद मयेकरांची बस घेऊन हंस संगीत नाटक मंडळी दिल्लीला गेल्याचे मला आठवते. आम्ही तेव्हा शाळेत शिकत होतो. दिल्ली भेटीनंतर नाटक कंपनी आग्रा, ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी फिरून आली.
‘हंस’ने निर्मित केलेली आणखी दोन नाटके गाजली. ती म्हणजे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘ययाती आणि देवयानी.’ ‘रायगड’मध्ये विश्वनाथ नाईक (शिवाजी), तुळशीदास लोटलीकर (संभाजी), अलका वेलिंगकर (सोयराबाई), शशिकला नागेशकर किंवा किशोरी हळदणकर (येसूबाई), शांताराम नाईक किंवा पांडुरंग खांडोळकर (हंबीरराव) यांच्यासोबत बाबनी गावकर (अण्णाजी) आणि सूर्या वाघ (मोरोपंत) ही जोडगोळी होती. पुढे नरसिंह नाईकदेखील हंबीरराव करू लागले. राजारामची भूमिका सोमनाथ, रवींद्र किंवा विजयकुमार हे काकांचे चिरंजीव आलटून पालटून करायचे.
उत्सवी रंगभूमीवर ‘हंस संगीत’ने जे योगदान केले आहे त्यावर स्वतंत्रपणे एक ग्रंथच लिहिता येईल. पण या एकंदर कामात सूर्या वाघ यांचाही अतिशय मोलाचा वाटा होता. रूढार्थाने या नाटकांचे दिग्दर्शक विश्वनाथकाकाच असायचे, पण तालीममास्तर मात्र सूर्या वाघ. संवादफेकीचे कौशल्य, उच्चारांतील स्पष्टता व उपयुक्त अभिनय यांचे धडे बहुधा तेच इतर कलाकारांना देत असत. ‘हंस’च्या नटमंडळीने केलेली अनेक जुनी, अभिजात नाटके बालपणी मी बघितली आहेत. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘मानापमान’, ‘नेकजात मराठा’, ‘शिक्का कट्यार’, ‘आग्र्याहून सुटका’ अशी एक ना अनेक कितीतरी नाटकांची नावे घेता येतील.
‘नवनाट्य श्रृंगार’ व ‘हंस’व्यतिरिक्त आणखी अनेक ठिकाणी सूर्या वाघ यांनी अभिनय व दिग्दर्शनाचा आविष्कार सातत्याने घडवला. रघुवीर होबळे यांच्याबद्दल मागे लिहिलंच आहे. सावईवेर्याचे सिद्धहस्त लेखक व्यंकटेश पै रायकर हे एक नाट्यवेडं व्यक्तिमत्त्व. सावईवेर्याला चैत्रपौर्णिमेत ते नाटकं करायचे. नाटकं म्हणजे अशीतशी चिल्लर नव्हेत; पुण्या-मुंबईत गाजलेली. मुख्य भूमिका ते स्वतः करायचे. एकदा तर त्यांनी ‘मत्स्यगंधा’त भीष्म आणि पराशर अशा दोन्ही भूमिका केल्या होत्या. त्यांच्या वर्षातून एकदाच होणार्या या नाटकाच्या तालमी किमान दोन महिने चालायच्या. त्यावेळी त्याना सर्वाधिक गरज वाटायची ती सूर्या वाघ यांची. नेपथ्यापासून दिग्दर्शनापर्यंत ते नाटकात भूमिका करूनसुद्धा रायकरांना प्रॉम्प्टींग करीपर्यंत सगळी कामं सूर्या वाघ त्यांच्यासाठी उत्साहाने करायचे. पै रायकरांचं नाट्यवेड इतकं अफाट होतं की नाटक होऊन आठ-दहा महिने उलटले तरी प्रयोग कसा झाला, आपली भूमिका कशी झाली, आपण कुठे चुकलो यावर भाष्य करणारी रायकरांची मनस्वी व भावोत्कट पत्रे आमच्या घरी दोन-दोन आठवड्यांनी येतच असत!
फातोर्ड्याचे सूर्यकांत लोटलीकर हे असेच एक नाट्यप्रेमी गृहस्थ. त्यांनाही महाराष्ट्रातील अभिनेत्री आणून मोठमोठ्या नाटकांचे प्रयोग करण्याची हौस होती. दिग्दर्शक अर्थातच सूर्या वाघ. जोडीला त्यांनी भूमिकासुद्धा केली पाहिजे हा आग्रह. त्यांच्यासारखे शेकडो नाट्यवेडे गोवाभर पसरले होते. पेडण्यापासून काणकोणपर्यंत नाट्यदिग्दर्शन करण्यासाठी भाऊंना बोलावून नेणारी माणसं होती. सुर्ल, वेळगे, होंडा, उसगाव, गुळेली, वाघुर्मे, खांडेपार, बोरी, शिरोडा, तरवळे, सावर्डे, कुडचडे, सांगे, केपे, पाडी, असोळणे, कुंकळ्ळी, वेळ्ळी, चिंचोणे, साकवाळ, कुठ्ठाळी, चिखली, वास्को (मायमोळे, बेलांबाय ते पाट्रॉंग व सडापर्यंत), पुन्हा शिवोली, मांद्रे, कळंगुट, नावेली, आमोणा, वरगाव, माशेल, म्हार्दोळ, प्रियोळ, कुर्टीपर्यंत शेकडो गावांत माझे वडील नाटकाच्या निमित्ताने पोचले. अडाणी व निरक्षरांनाही त्यांनी नाटक शिकवलं. गावोगावी आपले शिष्य घडवले. कितीतरी माणसं जोडली. पैशांची श्रीमंती त्यांना मिळाली नाही पण मैत्रीची संपत्ती त्यांनी अफाट कमावली.
रंगमंचाशी निगडीत अशी एकही गोष्ट नव्हती जी सूर्या वाघ यांना येत नव्हती. ते उत्तम अभिनेते होते, दिग्दर्शक होते, नेपथ्यकार होते. बांबूंचा आधार न घेता व कुठेही दोर्या न बांधता तरफांचा सेट रंगमंचावर उभा करण्याचं कसब त्यांच्यापाशी होतं. वेशभूषेतले ते जाणकार होते व रंगभूषाही त्यांना अगवत होती. याशिवाय आणखी एक कौशल्य त्यांच्यापाशी होते, ते म्हणजे, प्रॉम्प्टींग. उत्सवी रंगभूमीवर अत्यंत आवश्यक मानली जाणारी ही गोष्ट. गावोगावी होणार्या उत्सवांत हौसेचा भाग अधिक. नाटकातले संवाद पाठ करायला वेळ कुणापाशी? म्हणून मग चांगला प्रॉम्प्टर आणणं अनिवार्य असायचं. चांगला प्रॉम्प्टर म्हणजे सूर्या वाघ. ‘प्रॉम्प्टींग’ ही नाटकाला उपकारकच ठरते असे नव्हे तर तीसुद्धा शेवटी आपल्यापरीने एक ‘कला’च असते हा साक्षात्कार मला झाला तो माझ्या वडिलांच्या प्रॉम्प्टींगचं कसब पाहून. प्रॉम्प्टींग करताना ते आवाजाचा जो टोन लावायचे व ज्या चपळाईने इकडून तिकडे फिरायचे तो एकूणच प्रकार अफलातून होता. सूर्या वाघ यांचे हे तंत्र नंतर मीसुद्धा बर्यापैकी शिकलो व पुढं पुढं मलाही ‘प्रॉम्प्टर’ म्हणून भाऊंसोबत येण्याची आमंत्रणं मिळू लागली.
नाट्यव्यवसाय हा एक असा व्यवसाय आहे की एकदा तो स्वीकारल्यानंतर माणसाला प्रकृतीकडे लक्ष देणे कठीण होते. निदान आताची परिस्थिती पूर्वीपेक्षा जरा बरी आहे. आज बहुतेक नाटके सात किंवा आठ वाजता सुरू होतात व मध्यरात्रीपूर्वी संपतात. पण त्याकाळी नाटक सुरू व्हायचं तेच मुळी ११ किंवा १२ वाजता. प्रयोग पहाटेपर्यंत चालायचा. वाहतुकीची साधने जवळजवळ नव्हतीच. त्यामुळे प्रयोग संपला की त्याच गावात मुक्काम ठोकून सकाळी बस पकडून पुन्हा गावी परतायचं असा भाऊंचा दिनक्रम होता. सततच्या जागरणांमुळे त्यांची तब्येत अधूनमधून बिघडायची. नाटकवाल्यांना बहुधा असतात ती व्यसनं त्यांना नव्हती. होतं एकच सिग्रेट ओढण्याचं व्यसन. तेही हरिद्वारला गेल्यानंतर त्यांनी गंगार्पण करून टाकलं व शेवटपर्यंत सिग्रेटला हात लावला नाही. एरवी १९८६ पर्यंत मी कधीच वडिलांना आजारपणामुळे इस्पितळात पडलेलं पाहिलं नाही. अधूनमधून त्यांचा खोकला व अस्थमा बळावायचा तेवढाच. अस्थमा वाढला की आमंत्रणं घेतल्याठिकाणी जाणं त्यांना कठीण व्हायचं. मग नाईलाजाने नाटक अर्धवट बसवलेलं असेल तर ते पूर्ण करायला भाऊ मला पाठवायचे. मला आठवतं, आवेडे बोरी इथं सं. ‘राजा हरिश्चंद्र’ नाटक त्यांनी बसवायला घेतलं होतं. पण प्रकृती साथ देईना म्हणून मी ते पूर्ण करायला गेलो. उरलेल्या सार्या तालमी मीच घेतल्या. प्रयोगही चांगला झाला. जिथं हा प्रयोग झाला त्याठिकाणी त्यावेळी देऊळबिऊळ काही नव्हतं. फक्त एका झाडाला साईबाबांचं चित्र खिळ्यानं ठोकलं होतं. हे नाटक मी बसवलं तेव्हा मी जेमतेम आठवीत असेन. आज त्या ठिकाणी श्रीसाईबाबांचं भव्य मंदिर उभं राहिलं आहे.
बोरीनंतर भाणस्तारी, धाकटे नेवरा, धोंडेभाट, करमळी अशा काही ठिकाणी मी बदली दिग्दर्शकाची जबाबदारी निभावली. पण माझा जीव त्यात रमला नाही. एक तर नाटकामुळे माझ्या अभ्यासात खंड पडत होता व वडिलांची ओढाताण पाहून मला नाटकाच्या व्यवसायाची भीती वाटू लागली होती. त्यामुळे इयत्ता दहावीत पोचल्यानंतर मी ‘नाटक’ हा विषयच मनातून काढून टाकला.
आपलं नाट्यवेड आम्हा मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न वडिलांनीही कधी केला नाही. या व्यवसायातील खाचखळगे आमच्या वाट्याला येऊ नयेत ही त्यांचीही इच्छा असावी. माझ्या धाकट्या भावाला- रामरावला- तर नाटकात फारसा रस नव्हताच. नाटकाचं प्रेम आनुवांशिकरीत्या माझ्यात उतरलं होतं. इयत्ता तिसरीत असताना मी रंगभूमीवर रीतसर प्रवेश केला. त्यावेळी गावातल्या हौशी कलाकारांनी ‘अपराध मीच केला’ या नाटकाचा प्रयोग तिकिटे लावून केला होता. नाटकाच्या तालमी दिपू कुर्डीकर यांच्या घरातल्या माडीवर व्हायच्या. मनोहर शिरगावकर, वेंकटेश देसाई, श्याम शिरगावकर, विष्णू नाईक ही मंडळी त्यात काम करीत होते. त्यात संजयची भूमिका मला दिली होती. नाटक सूर्या वाघ यांनीच बसवलं होतं. त्यामुळं माझ्या पहिल्या भूमिकेचे गुरू तेच ठरले. या नाटकातील भूमिकेसाठी त्यांनी हौसेनं माझ्यासाठी नवीन पँट व खास टी-शर्ट शिवून घेतले होते. आयुष्यात पहिल्यांदाच या भूमिकेच्या निमित्ताने मला बूट घालायला मिळाले, ही आठवण मी कधी विसरणार नाही.
नंतर मी गावच्या उत्सवांतील नाटकांत छोट्या-मोठ्या भूमिका करू लागलो. ‘संत दामाजी’त विदू महार, ‘सैतानी पाश’मध्ये नारद अशा अनेक भूमिका केल्या. पौराणिक नाटकांत नारदाची भूमिका का कोण जाणे पण माझ्याच वाट्याला यायची. कदाचित मी पुढे पत्रकारितेत जाईन याची ती पूर्वसूचना असावी. कारण नारद हा पृथ्वितलावरचा सर्वात पहिला बातमीदार मानला जातो.
रंगभूमीची सेवा करीत असताना सूर्या वाघ यांनी अनेक कलाकार घडवले; पण अनेक लेखकांनाही त्यांनी लिहिते केले. बरेच होतकरू नाटककार नवीन नाटक लिहिलं की ते बसवून देण्यासाठी सूर्या वाघ यांच्याकडे यायचे. आज सगळीच नावं मला नीटशी आठवत नाहीत, पण वास्कोला उमाकांत साळगावकर नावाचे एक फोटोग्राफर होते. ‘जनता फोटो’ नावाचा त्यांचा स्टुडिओ होता. त्यांची दोनतीन नाटकं भाऊंनी दिग्दर्शित केली होती. भाऊंचे रंगनाथ वायंगणकर नावाचे कारापूर येथील मावसभाऊ- त्यांचीही एकदोन नाटके त्यांनीच सर्वप्रथम बसवली. त्याशिवाय लेखक व सामाजिक कार्यकर्ते शंभू भाऊ बांदेकर यांचे दिवंगत बंधू कै. विलासभाऊ बांदेकर यांनी छत्रपती संभाजीवर लिहिलेलं एक नाटकही त्यांनी रंगमंचावर आणलं होतं. प्रसिद्ध पत्रकार वामन राधाकृष्ण यांनी लिहिलेल्या ‘देव माघारी गेले’ या नाटकाचं दिग्दर्शनही भाऊंनीच केलं होतं. आमच्या गावातला तरुण लेखक तुळशीदास काणकोणकर यालाही नाटक लिहिण्याची प्रेरणा सूर्या वाघ यांच्याकडूनच मिळाली. भाऊंच्या आग्रहावरून रहस्यकथालेखक गुरुनाथ नाईक यांनी ‘दिपाजी राणे’ हे नाटक लिहून दिलं. त्यातील पेगाद या पोर्तुगीज अधिकार्याची भाऊंनी केलेली भूमिका बरीच गाजली. याच नाटकात महिलांच्या धालोत्सवाचा प्रसंग आहे. या प्रसंगात धालो म्हणणार्या महिलांचं डोंगरीतील पथक घेऊन माझी आई सहभागी झाली होती. रंगमंचावरचं हे तिचं पहिलं आणि शेवटचं पदार्पण.