सूत्रनिवेदन म्हणजे कार्यक्रमाचा विचका करणे नव्हे

0
1777

– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा
कुठलाही एखादा कार्यक्रम घ्या. तो कार्यक्रम लोकांसमोर चांगल्या पद्धतीने सादर करण्यासाठी एक व्यक्ती त्या कार्यक्रमाची सूत्रे हाताळत असते. कुठलाही सांगीतिक कार्यक्रम किंवा एखादा महोत्सव किंवा एखादा उद्घाटन सोहळा घ्या, त्या कार्यक्रमाची रुपरेषा लोकांसमोर मांडून मध्ये मध्ये त्या कार्यक्रमाशी संबंधित किस्से ऐकवून, कार्यक्रमाच्या विषयाला अनुकूल अशा विनोदाची पेरणी करून लोकांना त्या कार्यक्रमात खिळवून ठेवणारी व्यक्ती म्हणजे निवेदक/निवेदिका. पूर्वी जी संगीत नाटके सादर व्हायची, तेव्हा सर्वप्रथम रंगमंचावर आगमन व्हायचे ते म्हणजे सूत्रधाराचे. हा सूत्रधार अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगमंचावर वावरून काही वेळा अगदी पात्रांच्या मध्ये (त्यांचे अस्तित्व पात्रांना समजायचे नाही, पण प्रेक्षकांना त्याचे बोलणे व्यवस्थित ऐकू यायचे) लुडबूडून हे नाटक व्यवस्थितरित्या पुढे न्यायचा. तेव्हापासून या सूत्रधाराचा धागा पकडून हल्लीचे हे सूत्रसंचालन किंवा निवेदन ही कला समोर आली असावी.काही वर्षांपूर्वीची गोष्ट. म्हापसा म्युनिसिपल मार्केटमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवात दरवर्षी कोल्हापूरच्या एका वाद्यवृंदाचा कार्यक्रम बराच गाजत होता. इतका की, एका वर्षी त्या वाद्यवृंदाच्या व्यवस्थापकाने स्वतःहून जाहीर केले की, आम्ही दरवर्षी इथे कुठल्याही आमंत्रणाशिवायदेखील कार्यक्रम सादर करू. त्या वाद्यवृंदाचे सूत्रसंचालन जो माणूस करीत होता, तो व्यवसायाने कोल्हापूरच्या एका कॉलेजात मराठी साहित्याचा प्राध्यापक होता. त्यामुळे आलंकारिक भाषा, मुद्देसूद विवेचन, मधेमधे, विनोदाच्या पेरणीबरोबरच मराठी साहित्यिकांचे व संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे किस्से व विविध प्रथितयश लेखकांच्या कोट्या यांचा वापर तो आपल्या सूत्रसंचलनामध्ये व्यवस्थित करायचा. मी त्या कार्यक्रमाला सलगपणे जवळजवळ पाच – सहा वर्षे हजेरी लावल्यामुळे मला तिसर्‍या वर्षापासून त्याच्या निवेदनात तोच तोचपणा जाणवायला लागला. साहित्यिकांचे तेच किस्से, तेच तेच विनोद व त्याच कोट्या यामुळे माझा त्या सूत्रसंचालकाबद्दलचा आदर जरा कमी झाला. सांगायचा मुद्दा हा की, निवेदन/सूत्रसंचालन करताना त्या माणसाने थोडा कल्पकपणा दाखवून, तोचतोचपणा टाकून आपल्या निवेदनात वैविध्य आणले असते, तर ते जास्त प्रभावी ठरते.
तसे पाहिले तर निवेदन ही एक स्वयंस्फूर्तीने येणारी कला आहे. त्यासाठी निवेदकाला ओघवती वाणी असायला हवी, आपल्या आवाजावर नियंत्रण ठेवून निवेदन करताना त्यात व्यवस्थित चढउतार करायला हवेत. त्याचबरोबर त्याला सतत वाचनाचा चांगलाच सराव असायला हवा. आणि मुख्य म्हणजे आपण ज्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतोय, त्या कार्यक्रमाचा नक्की काय विषय आहे याचे भान ठेवून हे निवेदन व्हायला हवे. कार्यक्रमाची नक्की काय रुपरेषा आहे, नक्की किती काळ हा कार्यक्रम चालणार आहे याचे भान राखून निवेदकाने आपले निवेदन आखायला हवे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे समयसूचकता दाखवून या निवेदनाची उंची जर वाढवली, तर ते निवेदन त्या कार्यक्रमाला पूरक असे ठरून तो कार्यक्रम उंचावण्यास मदत होते.
पुष्कळवेळा हे निवेदक एकदा ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला की चौफेर उधळू लागतात. आलंकारिक भाषा व अवास्तव अशा कोट्या यांचा मुक्त वापर करून जणू हा कार्यक्रम त्यांच्या निवेदनाचे कौशल्यच पुढे करायला आयोजित केला आहे काय, असा भास होतो. त्यामुळे अशा निवेदकांमुळे पुष्कळ वेळा कार्यक्रमाचा विचका होतो व श्रोत्यांमधून नाराजीचे सूर ऐकू येतात. त्यामुळे प्रत्येक निवेदकाने आपली स्वतःची व समोर बसलेल्या श्रोत्यांची पायरी ओळखूनच आपले निवेदन आखायला हवे.
निवेदक म्हटले की आमच्यासमोर अमीन सायानी यांचे व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर येते. जरी त्या काळी आम्ही त्यांना प्रत्यक्ष न बघता केवळ रेडिओ सिलोनवरच ऐकायचो, तरी त्यांचा तो लाघवी आवाज व त्यातील साजेसे चढउतार, ओघवती वाणी व मुद्देसूद अशा माहितीमुळे ते सर्व श्रोत्यांना खिळवून ठेवण्यात यशस्वी व्हायचे.
या निवेदकांच्या बाबतीत अन्य काही नावे घ्यायची झाल्यास सुधीर गाडगीळ, कै. सुहासिनी मुळगावकर, पै. फारूख शेख व श्रीमती मंगला खाडिलकर ही नावे समोर येतात. गोव्याच्या बाबतीत या निवेदकांचा विचार केला तर काही नावे जी ठळकपणे समोर येतात, ती म्हणजे प्रा. अनिल सामंत, डॉ. अजय वैद्य, गोविंद भगत, सिद्धी उपाध्ये, संगीता अभ्यंकर इत्यादी.
आता एकदा कुठल्याही कार्यक्रमाच्या निवेदनाचे काम एखाद्याने स्वीकारले, तेव्हा त्या निवेदकाला काही पथ्ये पाळावी लागतात. पहिली गोष्ट म्हणजे आयोजकांना भेटून त्या कार्यक्रमाचे नक्की स्वरूप काय, हा कार्यक्रम नक्की किती वेळ चालेल, कोण कोण त्यात सहभागी होणार आहेत, या सर्व गोष्टींची पक्की माहिती मिळवायला हवी. एखादा चर्चासत्राचा किंवा व्याख्यानाचा कार्यक्रम असेल, तर त्यात भाग घेणार्‍या सर्व मान्यवरांची माहिती संकलित करायला हवी. एखाद्या सांगीतिक कार्यक्रम असला, तर त्यात कोणते कलाकार भाग घेणार, ते कुठली गाणी सादर करणार व त्या गाण्यांविषयी सविस्तर माहिती मिळवावी लागते. त्यामुळे या निवेदकाला हा कार्यक्रम सहजपणे हाताळण्यास मदत होते. पण अगदी खेदपूर्वक असे नमूद करावेसे वाटते की हल्लीचे बहुतेक निवेदक/निवेदिका हे कार्यक्रमात आपली छाप कशी पडेल याती काळजी घेताना दिसतात व त्यामुळे आपल्यामुळे कार्यक्रमाचा विचका होईल हे माहीत असूनसुद्धा हे सूत्रसंचालक मागे हटक नाहीत. काही निवेदक आपण या सूत्रसंचालकांच्या भूमिकेत असताना कार्यक्रमाशी निगडीत असलेल्या विविध व्यक्तिरेखांशी आपण किती समरस आहोत हे दाखवण्यासाठी विविध फंडे वापरत असतात. उदाहरणच द्यायचे झाले तर हल्ली गोव्यातील एक सूत्रसंचालक कार्यक्रम सादर करताना एखादा दिग्गज व्यक्तिमत्त्वाबाबत बोलताना भलताच हळवा होऊन पुष्कळवेळा सद्गदित स्वरांतून बोलू लागतो, हे मी स्वतः दोन – तीन वेळा अनुभवले आहे. हल्लीच कला अकादमीत जेव्हा असे घडले, तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या एका ओळखीच्या प्रेक्षकाने अगदी भाबडेपणाने मला विचारले, ‘‘डॉक्टर, पंडितजींना जाऊन किती दिवस झाले हो?’’ त्यामुळे असे दृष्य म्हणजे तामिळनाडूत जयललितांच्या जागेवर शपथ घेताना ओक्साबोक्षी रडणार्‍या मुख्यमंत्री पनीरसेल्वन यांच्यासारखे केविलवाणे वाटते.
तेव्हा मला या सर्व निवेदकांना असे सुचवावेसे वाटते की, निवेदक म्हणून वावरताना या व्यक्तीने जास्तीत जास्त भर हा कार्यक्रम सुलभ सुंदर कसा होईल यावर द्यावा आणि ज्यामुळे प्रेक्षकांची नाराजी ओढवली जाईल व कार्यक्रमाचा विचका होईल, अशा गोष्टी टाळाव्यात.