सुशासन आणि हिंदुत्व

0
76

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी व्यासपीठावर बोलावून उपस्थितांकरवी त्यांना उभे राहून मानवंदना द्यायला लावले, या घटनेचा अर्थ मोदींचेच नाव पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निश्‍चित झाले आहे आणि केवळ औपचारिक घोषणाच बाकी आहे असा काढला जात आहे. त्याच बैठकीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगढचे रमणसिंह यांनाही त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कामगिरीबद्दल गौरवले गेले असले तरी मोदींना दिल्या गेलेल्या मानवंदनेला निश्‍चितच विशेष अर्थ आहे. मोदी या नावाचे वलय दिवसेंदिवस वाढतच चालले आहे आणि प्रादेशिक नेत्याकडून राष्ट्रीय नेत्याचा स्तर आणि उंची त्यांना जवळजवळ प्राप्त झाली आहे. पक्षामध्ये मोदींच्या विरोधात तुरळक आवाज अधूनमधून येत असले तरी पक्षाची आताची एकंदर दिशा पाहाता मोदी त्यात मिट्ट बसतात! राजनाथसिंह यांनी भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पक्षाला पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या वाटेने नेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अर्थातच हिंदुत्वाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी हेच नाव पुढे येते.

लालकृष्ण अडवाणी यांनी ९० च्या दशकात हिंदुत्वाच्या रथावर स्वार होऊन राममंदिराची चळवळ पुढे नेण्याचे काम केले होते. पण तेव्हा पक्षाला सर्वमान्य होईल असा एक सहिष्णू नेता हवा होता आणि ज्येष्ठतेप्रमाणेच या गुणामुळेही अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले गेेले. इतर पक्षांचा टेकू घेतल्याविना सरकारस्थापनेचा विचारही करणे शक्य नाही याची कल्पना असल्याने तेव्हा वाजपेयी हाच स्वीकारार्ह पर्याय ठरला होता आणि केवळ त्या नावामुळे उमर अब्दुल्लांपासून जॉर्ज फर्नांडिसांपर्यंतची मंडळी भाजपाच्या साथीने उभी राहिली होती. आजही राजकारणाची एकंदर स्थिती पाहाता भाजपा केवळ स्वबळावर सरकार स्थापण्याजोगी स्थिती दिसत नाही. त्यामुळे भाजपाने जरी हिंदुत्वाचा मार्ग उघडपणे अनुसरलेला असला तरी उद्या राजकीय समिकरणे जुळवताना नरेंद्र मोदी हे नाव सहयोगी पक्षांना स्वीकारार्ह होईल का, हा पक्षासाठी थोडासा चिंतेचा विषय आहे. त्यावर उताराही पक्षाने काढलेला दिसतो. आगामी निवडणुकीसाठी पक्षाची घोषणा आहे ‘सुशासन संकल्प ः बीजेपी विकल्प’! याचा अर्थ स्पष्ट आहे. ‘सुशासना’चे उदाहरण म्हणून गुजरातचे नाव पुढे करून मोदींना स्वीकारार्हता मिळावी याची धडपड केली जाईल. २००२ च्या दंगलीमुळे मोदींना आजही काहींकडून दुःशासनाच्या रूपात पाहिले जात आहे हे जरी खरे असले तरी त्यांनी केलेला राज्याचा चौफेर विकास, निर्माण केलेल्या गुंतवणुकीच्या संधी, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्यात त्यांना बर्‍यापैकी आलेले यश, यातून जी सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे, तिच्यावर स्वार होऊन आगामी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा भाजपाचा विचार दिसतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळापुरते हिंदुत्व गुंंडाळून ठेवले गेले तरी आश्चर्य वाटायला नको. सुशासन संकल्प ः बीजेपी विकल्प या घोषणे’ध्येच सारे काही आले. आपल्या चार मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये गौरवून, आपला पक्ष सुशासन कसा देत आहे त्याचा प्रत्यक्ष दाखलाच राजनाथसिंह यांनी या देशाच्या जनतेपुढे ठेवला आहे. मोदींचे आर्थिक विकासाचे मॉडेल, पर्रीकरांचे लोकाभिमुख प्रशासन, शिवराजसिंह यांनी ‘अंत्योदय’ सारख्या तळागाळापर्यंत जाणार्‍या राबवलेल्या योजना, आदींतून त्यांची जी सकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे ती देशापुढे उभी करणे हे ‘हिंदुत्वा’चा जप करण्यापेक्षा सर्व समाजघटकांमध्ये स्वीकारार्हता मिळवण्यासाठी अधिक उपयुक्त आहे एवढे शहाणपण भाजपापाशी नक्कीच आहे. पण हे करीत असताना आपण हिंदुत्व निवडणुकीपुरते गुंडाळून ठेवले अशी प्रतिमा निर्माण होऊ नये यासाठी मग हिंदुत्व आणि सुशासन या दोन्हींचा जो चेहरा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी! माध्यमे दहा वर्षांपूर्वीच्या गुजरात दंगलींच्या खपल्या उकरत बसली असली तरी मोदी वरील दोन्ही गोष्टींचे प्रतीक म्हणून पुढे करता येतात. त्यामुळे जेथे हिंदुत्व अडचणीचे ठरत असेल तेथे सुशासनाचा मुद्दा पुढे रेटायचा आणि जेथे सुशासनाचा मुद्दा तितकासा प्रभावी ठरणार नाही, तेथे हिंदुत्वाचा वापर करायचा अशी एकंदर नीती आगामी निवडणुकीत भाजपा राबवणार आहे असे दिसते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांचेच नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याचा विचार पक्षामध्ये पक्का होत चालला आहे याचीच चाहुल राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीने दिली आहे.