– सतीश दत्ताराम दळवी
‘शिक्षण हा काही अन्य चीजवस्तूंप्रमाणे एखादा जिन्नस नाही’ असे विचार अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे भाई वैद्य आपल्या ‘संपूर्ण शिक्षण’ या पुस्तकात मांडतात. ते पुढे म्हणतात, ‘वास्तविक व्यक्तित्त्व आणि समाज यांच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याची ताकद शिक्षणामध्ये आहे. जगातल्या महापुरुषांना – अगदी भगवान बुद्ध, सॉक्रेटसपासून ते आपल्या सर्व राष्ट्रपुरुषांपर्यंत प्रत्येकाला याचे भान होते. बुद्धाच्या शिकवणीतून जगातले सर्वांत जुने नालंदा विद्यापीठ उभे राहिले होते आणि सॉक्रेटिसचा शिष्य प्लॅटो याने ‘अकादमी’ अडीच हजार वर्षांपूर्वी स्थापन केली होती. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्व राष्ट्रपुरुषांनी आपापल्या परीने राष्ट्रीय शिक्षणाचा ध्यास घेतला होता. आपला देश स्वतंत्र व बलवान करायचा असेल तर त्याचा पाया शिक्षणाद्वारेच रचता येईल याची प्रत्येकाला जाणीव होती.
आपल्याकडे पोर्तुगीज काळात सुद्धा सधन लोकांनी घरी शिक्षक (मास्तर) ठेवून आपल्या आणि गावातल्या मुलांची शिक्षणाची सोय केली होती. पण तेव्हाची परिस्थिती व आजची परिस्थिती यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आज आपल्या समाजोद्धाराचा प्रश्न जाचक बनला आहे. ब्रिटिशांनी घालून दिलेल्या मार्गाहून आपल्या शिक्षणाच्या गाडीने नवीन मार्ग चोखाळण्याची गरज आहे. आज आपण शिक्षणात जी पेरणी करू त्याचीच उगवणी उद्या समाजात दिसून येणार आहे. आपल्या समाजात ज्या तर्हेचे पीक हवे त्याचे बी आपण शिक्षण व्यवस्थेत रुजवले पाहिजे. शिक्षण व समाज हे परस्परावलंबी आहेत. पण आपला समाज हा शिक्षण व समाज अलगअलग समजतो. ते खाजगी व व्यक्तिगत काम आहे असे मानतो. आज जो भ्रष्टाचार, स्वार्थ, गळेकापू स्पर्धा, दुराचार, अनिती, गुंडगिरी पसरत आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस चिंतित असतो. त्याला समाजात असुरक्षितता वाटू लागली आहे. पण हे असे का घडते आहे याचा त्याला उलगडा होत नाही. तो केवळ राजकर्त्यांनाच दोष देऊन मोकळा होतो. या परिस्थितीचे मूळ कारण आपल्या शिक्षण व्यवस्थेत आहे, याची त्याला जाणीवच नाही.
ब्रिटिशांनी फक्त कारकून वा कामगार निर्माण करणारे शिक्षण सुरू केले. आपण आज सुद्धा इंजिनियर, डॉक्टरपर्यंतचे विविध स्तराुचे कामगार वा कारकूनच निर्माण करीत आहोत.
जगातल्या व्यवस्थापन क्षेत्राकडे गुरू सी. के. प्रल्हाद म्हणतात, ‘पिरॅमिडच्या तळाला खूप शक्ती पडून आहे. ती वापरली जात नाही.’ याचा विचार फोंड्यात १९११ सालीच झाला होता. डॉ. दादा वैद्य व त्यांचे समविचारी सहकारी श्री. सीताराम केरकर आणि श्री. विनायक सरज्योतिषी यांनी गोवा विद्याप्रसारक मंडळ स्थापन करून त्यांच्यामार्फत ‘आल्मेदा हायस्कूल’ सुरू केले. त्या विद्यालयात अभ्यासांतर्गत व्यवसाय शिक्षणाची पण सोय निर्माण केली. श्रीयुत केरकरांचा स्वतःचा जपानी हातमागचा व्यवसाय होता. तिथे विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाची सोय केली. त्याशिवाय शाळेमध्ये खास सुतारकामाच्या शिक्षणाची पण व्यवस्था केलेली होती. पण जसजसा व्याप वाढत गेला तसतशा काही गोष्टी व्यवस्थापनाच्या आवाक्याबाहेर गेल्या असतील किंवा काही अडचणी निर्माण झाल्या असतील. पण कार्यानुभव मागे पडून फक्त ‘पुस्तकी ज्ञाना’लाच जास्त महत्त्व प्राप्त झाले. दुर्दैवाने आजदेखील तेच चालू आहे. मध्यंतरी शिक्षण क्षेत्रात कार्यानुभव म्हणून काहीतरी थातूर मातूर विषय लावले गेले आणि नंतर येरे माझ्या मागल्या. पण शिक्षणाचा प्रसार अगदी खेड्यापाड्यातून व्हावा म्हणून गोवा विद्याप्रसारक मंडळाने फोंड्याच्या आसपासच्या खेड्यांतून शाळा सुरू केल्या. ३० जून १९६२ मध्ये बांदिवडे येथे ‘आदर्श विद्यालय’, १० जून १९६४ मध्ये सावईवेरे येथे ‘उत्कर्ष विद्यालय’ तर १४ जून १९६५ मध्ये बोरीला ‘प्रगती विद्यालय’ व खांडेपारला ‘प्रतिभा विद्यालय’ स्थापन करून खेड्यातील मुलांनासुद्धा शिक्षणाची दारे खुली केली.
आदर्श विद्यालयाने यंदा ५० वर्षे पूर्ण केली आहेत. एखाद्या शैक्षणिक संस्थेने ५० वर्षे पूर्ण करणे म्हणजे फार मोठा काळ नव्हे, पण त्या ५० वर्षांत आदर्श विद्यालयाने कूस बदलली. ‘आदर्श’चे ‘राजमाता पद्मावती राजे सौंदेकर हायस्कूल’ झाले. पण जो आदर्श सुरूवातीपासून या शाळेत ठेवलेला किंवा ‘गोवा विद्याप्रसारक मंडळा’च्या संस्थापकांनी डोळ्यासमोर ठेवलेला त्याला शाळेने फाटा न देता तो विविध रंगच्छटांनी पुढे नेला. दुसर्या शाळेतून बदली होऊन आलेले श्री. स्टीफन माथुनी (मुख्याध्यापक) व शाळेचे कला शिक्षक श्री. श्रीधर कामत बांबोळकर यांनी इतर शिक्षकांच्या मदतीने त्याला नवा आयाम दिला.
सर्वच मुले काही अभ्यासक्रमाच्या ‘पुस्तकी शिक्षणातल्या’ प्रत्येक विषयांत प्रवीण असू शकत नाही. अशा मुलांना त्यांच्या इतर कुशलतेला – बलशक्तीला क्षेत्र मिळवून देण्याचे काम शाळेत झाले पाहिजे. खेड्यातल्या शाळेत तर याचे भान प्रत्येक शिक्षकाला असणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात मुलांना विविध संधी प्राप्त होतात. ज्याला खेड्यातला विद्यार्थी वंचित असतो. अशावेळी शाळेमध्ये ते प्राप्त करून देणे हे त्या विद्यालयाचे काम असते. एखादा विद्यार्थी कोणत्या कलेमध्ये पुढे येऊ शकतो याचे सूक्ष्म निरीक्षण शिक्षकाने करणे आवश्यक असते. जसे एखाद्या पाषाणातून कसली मूर्र्ती उपजू शकते याची नजर ती मूर्ती घडविणार्या कलाकाराला असते, तसा शिक्षक हा मूर्तीकार असला पाहिजे. असा मूर्तीकार एखाद्या विद्यार्थ्याला मिळाला की, त्याचे नशीब फळफळते. नकळतच तो विद्यार्थी ‘घडत’ जातो. असे मूर्तिकार आर.पी.आर. सौदेकर हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना मिळाले. त्यांनी त्यांच्यासाठी बागकाम, चित्रकला, नाट्य-अभिनय, तंतूकाम (फायबरवर्क), मधमाशा पाळणे, खडू तयार करणे, कठपुतळी, समाजोपयोगी वस्तू असे कितीतरी कार्यानुभव तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चालू केले. यामुळे विद्यार्थ्याला मेंदूबरोबर कार्यशिलतेला चालना मिळाली आणि त्यांचे प्रश्न कुठच्या कुठे पळाले. बागकाम ते कठपुतळी प्रत्येक गोष्टीत आपापल्या आवडीप्रमाणे रस घेऊन त्या त्या गोष्टी आत्मसात करून विद्यार्थी जीवनात पुढे आले. वानगीदाखल ः
१) प्रदीप आर. देसाई – १९८२ च्या बोर्ड परीक्षेत गोव्यात १९ वा., २) प्रवीण आर. देसाई – १९८४ च्या बोर्ड परीक्षेत गोव्यात ७ वा., ३) कु. मेघना आर. देसाई – १९८६-८७ च्या अखिल भारतीय विज्ञान सेमिनारला गोव्यातून निवड, ४) पांडुरंग गावडे – १९८६-८७ च्या अखिल भारतीय ग्रामीण खेळांत गोव्याच्या टीममध्ये समावेश, ५) किशोर नाईक- पोहण्याच्या स्पर्धेत सदैव प्रथम, ६) संतोष एल. नाईक – १९८६ च्या अखिल भारतीय कॅम्लिन पेंटिंग स्पर्धेत गोल्ड मेडल, ७) स्नेहलता एल. नाईक – १९८६ च्या अखिल भारतीय कॅम्लिन पेंटिंग स्पर्धेत सिल्वर, ८) प्रेमानंद च्यारी, जयेश बांबोळकर, सचिन नाईक, अमोघ बुडकुले, सुदीन कुर्पासकर अशा अनेक विद्यार्थी कलाकारांनी गोव्यात विविध ठिकाणी चित्रकला स्पर्धा तसेच रांगोळी स्पर्धेत बक्षिसे मिळविली, ९) गुरुदास गावडे, जयेश बांबोळकर, ओमकार नाईक अशी अनेक नावे क्रीडास्पर्धेत चमकली. असे विद्यार्थी पुढे यशस्वी आणि जबाबदार नागरिक म्हणून गोव्यात आपापल्या क्षेत्रात चमकताना दिसतात. उदाहरणदाखल पुढील नावे पाहाः साहित्यक्षेत्र ः एन. शिवदास, सुदेश लोटलीकर, रामनाथ ग. नाईक, दत्ताराम बांबोळकर, प्रेमलता फडते. नाट्य-अभिनयः- ागेश फडते, अजित केरकर, सुरेश केरकर, प्रविण बांदेकर.राजकारणः- दीपक ढवळीकर, सुदीन ढवळीकर, प्रेमानंद गावडे, रामनाथ कामत बांबोळकर, आनंद नाईक, सदानंद पार्सेकर, सुखानंद कुर्पासकर. क्रीडाक्षेत्रः- तन्वि नाईक, किशोर नाईक, रंजिता गावडे, गुरूदास गावडे, जयेश बांबोळकर, ओंकार नाईक. त्याशिवाय डॉक्टरकी व इतर क्षेत्रांमध्ये चमकणारे काही ः डॉ. वल्लभ धायमोडकर, डॉ. दीपक रामनाथकर, अविनाश रामनाकर, गाब्रियेल काब्राल, ऍ. मनोज बांदोडकर, देमू उर्फ शिवाजी गावडे.
अशा ‘आदर्श’ राजमाता पद्मावती राजे सौंदेकर हायस्कूल’चा सुवर्णमहोत्सव सुद्धा गेल्या डिसेंबरमध्ये आदर्श झाला त्यात नवल ते काय?

