भाजपच्या नेत्या सुलक्षणा प्रमोद सावंत यांच्याविषयी बदनामीकारक विधाने करू नयेत, असा आदेश डिचोली न्यायालयाने आम आदमी पक्षाचे नेते व खासदार संजय सिंह यांना दिला आहे.
एका प्रकरणात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी सुलक्षणा सावंत यांनी संजय सिंह यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीच्या खटला डिचोली न्यायालयात दाखल केला आहे, त्यावर काल सुनावणी झाली.
यावेळी सदर खटल्याचा निकाल लागेपर्यंत संजय सिंह यांनी सुलक्षणा सावंत यांची प्रतिमा मलिन करणारी सार्वजनिक विधाने करू नयेत, असा आदेश न्यायाधीश अनुराधा आंद्रादे यांनी दिला. खटल्याचा निर्णय येईपर्यंत सोशल मीडिया किंवा व्हाट्सॲप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर यासह अन्य प्लॅटफॉर्मवर सुलक्षणा सावंत यांची प्रतिमा मलिन करणारी कोणतीही विधाने करण्यास मनाई करण्यात आली आहे.
या याचिकेवरील सुनावणीच्यावेळी आदेश देताना न्यायालयाने संजय सिंह यांना फटकारले. तुम्ही अशा प्रकारे सुलक्षणा सावंत यांची समाज माध्यमांवरून बदनामी करू शकत नाही. आणि त्यांची बदनामीचे सत्र चालूच ठेवले तर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.
या प्रकरणात न्यायालयाने आता डिसेंबर 2025 मध्ये पुढील सुनावणी निश्चित केली आहे. सुलक्षणा सावंत यांच्या वतीने महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आणि ज्येष्ठ वकील सुनील मनोहर, ॲड. प्रल्हाद परांजपे, ॲड. संजय सरदेसाई, ॲड. अनिकेत कुंदे आणि ॲड. तीर्थ पवार हे हजर होते. आपचे नेते संजय सिंह यांच्या वतीने ॲड. सुरेल तिळवे आणि ॲड. सी. नाईक हजर होते.

