– सोमनाथ हेम्पा गावकर, सुर्ला – सत्तरी
सर्वांगसुंदर समुद्रकिनारे, उत्तम देवालये, भव्य गिरीजाघरे यामुळे देशोदेशीचे पर्यटक गोव्याला भेट देतात. पण ही सर्व स्थळे किनारी भागातच असल्यामुळे गोव्याच्या पूर्वेकडील डोंगराळ भाग व तेथील ग्रामीण जीवन आणि निसर्ग यांचे पर्यटकांना दर्शन होत नाही. पणजी ते चोर्लाघाटमार्गे बेळगाव रस्त्यामुळे केरीपासून चोर्ला घाटापर्यंतच्या नैसर्गिक क्षमतेची लोकांना कल्पना आली आणि आता पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बरेच लोक चोर्ला घाटात गर्दी करताना दिसतात.
चोर्ला घाटाबरोबर सुर्ला घाटाचा निसर्ग – पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास चोर्ला घाटापेक्षा सुर्लाघाट उत्तम पर्यटनस्थळ बनू शकतो.
सुर्ला हे गोव्यातील एकच गाव असे आहे की जे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर बसले आहे. पोर्तुगीज आमदानीत सीमेवर असल्यामुळे या गावाला बरेच महत्त्व आले होते. गोवा मुक्तीची चळवळ तीव्र झाल्यानंतर पोर्तुगीजांनी येथे मिलिटरी कॅम्प उभारला होता व गावच्या कर्नाटक सीमेवर खंदक खोदले होते. त्यांच्या रहदारीसाठी ठाणे सत्तरीपासून डोंगर-दर्यांतून आणि कडेकपारी कापून लाखो रुपये खर्च करून सुर्लापर्यंत रस्ता तयार केला होता. जर हा रस्ता दुरुस्त करून रिवें (ठाणे) रस्त्याला जोडला तर निश्चितच निसर्गपर्यटनाला चालना मिळेल व सुर्ला गाव हे ठाणे ग्रामपंचायतीखाली येत असल्यामुळे कसल्याही कामासाठी सुर्लावासियांना साखळीला जाऊन पुन्हा ठाणेला यायचा खर्च व वेळ वाचेल. तसेच पणजी – चोर्ला – बेळगाव हा महामार्ग सुर्लाहून जात असल्यामुळे संपूर्ण सत्तरी तालुक्यातील लोकांना सुर्लामार्गे बेळगावला जाणे सोपे पडेल, तसेच चोर्लाघाट रस्त्यावरील ताण कमी होईल आणि त्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या खर्चापेक्षा कमी खर्चात सुर्लाघाट रस्ता होऊन जाईल. रिवें गावापासून संपूर्ण कच्चा रस्ता उपलब्ध असल्यामुळे फक्त दुरुस्तीसाठी आणि डांबरीकरणासाठीच खर्च करावा लागेल. रिवेंपासूनच हा रस्ता दर्याखोर्यांतून आणि डोंगरकपातीतून जात असल्यामुळे पर्यटकांना दुतर्फा निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेता येईल, तसेच आधीचा कच्चा रस्ता असल्यामुळे झाडेही कापावी लागणार नाहीत. त्यामुळे जंगलाची नासाडी होणार नाही. प्रवास करताना पावसाळ्यात काळ्या कातळावरून बर्याच उंचीवरून रांगेत दरीत कोसळणार्या अनेक धबधब्यांचे मनोहारी दर्शन व अधूनमधून येणार्या गच्च धुक्याचाही आनंद घेता येईल.
पावसाळी पर्यटनाबरोबरच सुर्ला गावचा आंबोली गावाप्रमाणेच पर्यटनस्थळ व थंड हवेचे ठिकाण म्हणून विकास करता येईल, कारण इथे बारमाही थंडी असते. झुळझुळ वारे वाहत असतात. एप्रिल – मे महिन्यात सुद्धा पंख्याची गरज पडत नाही. तसेच रात्रीचा डासांचा उपद्रव नाही.
पर्यटनदृष्ट्या सुर्ला गावाहून खालील ठिकाणांचा आस्वाद घेता येईल –
१) पायकांचा सडाः इथे पोर्तुगीजांचा मिलीटरी कॅम्प होता, त्याचे अवशेष आहेत. इथूनच सुर्लाच्या खोल दरीचे व काळ्या कातळावरून दरीत कोसळणार्या अनेक धबधब्यांचे दर्शन होते.
२) लाडफेचा धबधबाः हा गोव्यातीस सर्वांत उंचीवरून कोसळणारा धबधबा. पावसाळ्यात रौद्ररुप धारण करून घाटमाथ्यावरून दरीत झोकून देतो व त्याचा आवाज दूरवर ऐकू येतो.
३) बाराजणांचा धबधबाः पणजी बेळगाव महामार्गालगत असलेला हा धबधबा आणि लगतचा परिसर नितांतसुंदर आहे.
४) घुंगूरड्याचा धबधबाः ठाणे गावातून दिसणारा हा धबधबाही सुंदर आहे. हा धबधबा पाहायला जाताना घुंगरड्याच्या टेकडीवरून संपूर्ण गोव्याचा परिसर नजरेत येतो आणि ते दृष्य मनोहारी दिसते.
५) श्री माऊली देवस्थानः कणकुंबी येथील प्रसिद्ध माऊली देवस्थान व महादेव मंदिर येथून फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे. येथूनच मलप्रभा नदीचा उगम होतो. कळसा नदीचा कालवा येथेच आहे. सुर्लावरून या स्थळांचेही दर्शन घेता येता.
६) चिगुळेची दरीः कुणकुंबीवरून तीन किलोमीटर अंतरावर चिगुळे गाव आहे व त्यालगतच या गावची एक मनोहारी खोल दरी आहे. इथूनच त्या दरीचे व आजूबाजूच्या डोंगर टेकड्यांचे दर्शन घेता येते. तिळारी धरणाच्या जलाशयांच्या काही भागांचे येथून दर्शन होते.
७) सड्याचा किल्लाः सुर्लापासून सहा किलोमीटर अंतरावर सडे या गावानजिक एक प्रेक्षणीय असा ऐतिहासिक शिवकालीन किल्ला आहे. हा किल्ला उंचावर असल्याने एका बाजूने गोव्याचे व दुसर्या बाजूने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दर्शन होते. तसेच तिळारी धरणाच्या जलाशयाचेही चांगले दृश्य दिसते. येथे इतिहासकालीन एक प्रेक्षणीय विहीरही आहे.
८) पारवडेश्वरबाबांचा मठः सुर्लावरून नऊ किलोमीटर अंतरावर पारवाड हे गाव आहे. पारवाडेच्या बाबांचा तेथे प्रेक्षणीय मठ आहे. दरीच्या एका काठावर सुर्ला गाव तर दुसर्या काठावर पारवाड गाव आहे. पारवाडच्या बाजूने दरीच्या काठावर उभा राहिल्यानंतर संपूर्ण सत्तरी तालुका नजरेच्या टप्प्यात येतो.
९) मांगेलीचा धबधबाः सडे या गावापासून दोन किलोमीटर अंतरावर मांगेलीच्या प्रसिद्ध धबधब्याचे दर्शन घेता येते.
१०) चोर्ला गावचे रामेश्वर मंदिर ः सुर्लापासून चार कि. मी. अंतरावर चोर्ला गावचे आराध्यदैवत श्री रामेश्वराचे प्राचीन मंदिर व लगतचा परिसर यांचे दर्शन घेता येईल.
११) बेळगाव शहर येथून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर असल्याने व सुर्लावरून पुढे घाट लागत नसल्याने सपाट रस्त्याने एक किंवा दीड तासाच्या आत बेळगावला पोचता येते व खरेदीचा आनंदही घेता येतो.
आंबोलीशी तुलना करता सुर्ला गाव कुठल्याही बाबतीत मागे नाही. आंबोली जसे थंड हवेचे ठिकाण आहे, तसे सुर्ला त्याच उंचीवर असल्याने तेही थंड हवेचे ठिकाण आहे. आंबोलीला बघण्यासारखे तसेच सात-आठ पॉईंटस् आहेत, तसेच सुर्लाहून बघण्यासारखे वर नमूद केलेले अकरा पॉईंटस् आहेत. उलट सुर्ला हे गोव्यात असून गोवा व बेळगावच्या मधल्या अंतरावर आहे. म्हणून मला गोवा सरकारला विनंती करावीशी वाटते की सुर्ला गाव पावसाळी पर्यटन व थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित करावे. त्यासाठी सुर्लानजीकच्या अनेक सड्यांवर (जांभ्या दगडापासून बनलेल्या पठाराला सुर्लाच्या भाषेत सडा म्हणतात.) फर्मागुढीसारखी निवासी कुटिरे उभारावीत, जेणेकरून पर्यटकांना तेथे राहून त्या परिसराचा आनंद लुटता येईल व बेळगावची बाजारहाटही करता येईल. नवविवाहितांना मधुचंद्रासाठी हे एक नजीकचे रम्य ठिकाण होईल. व्यावसायिकांना व नोकरदार मंडळींना विसाव्यासाठी शहरी रहदारी व गजबजाटापासून चार दिवस शांतीने निसर्गाच्या सान्निध्यात घालविण्यासाठी हे एक उत्तम पर्यटनस्थळ होईल.