– नारायण उमर्ये, पैकूळ- सत्तरी.
गेल्या महिन्यात शिवजयंती उत्सव, शासकीय व सार्वजनिक पद्धतीने मोठ्या दिमाखात साजरा झाला. अनेक नामवंत वक्त्यांची भाषणे झाली, अनेक विद्वानांनी लेखही लिहिले. त्यांच्या भाषणांतून आणि लेखातूनही ‘‘या देशाला आता एका शिवाजीची गरज आहे’’ असे उद्गार अधूनमधून प्रगट होत असतात.
तसे पाहिले तर वरील उद्गार बरोबरच आहेत, परंतु सर्वस्वी खरे नाहीत. कारण या मुद्द्यावरील माझे स्वतःचे चिंतन आणि निरीक्षण जरा वेगळे आहे. गेल्या २५-३० वर्षांतील एकूणच राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिकसुद्धा, परिस्थितीचे बारकाईने अवलोकन केले तर, आजच्या अत्यंत दूषित वातावरणातही काही राजकीय नेत्यांचे आणि समाजकार्यकर्त्यांचे निष्कलंक चारित्र्य आणि त्यांचा समाजाला होत असलेला उपयोग पाहता वरील उद्गार तथ्यहीन आहेत, असेच म्हणावे लागते. कारण, सध्याच्या परिस्थितीतही छ. शिवाजी महाराजांशी तुलना करता येईल असे मोजकेच का होईना राजकीय नेते, आजही राजकारणात आहेत. याचा अर्थ आपल्या देशाला, अथवा राज्याला शिवाजी महाराज यापूर्वी कधीचेच लाभले आहेत.
आपल्या देशाला किंवा राज्याला उपलब्ध असलेल्या या मोजक्याच शिवाजींची सध्याची फार मोठी अडचण ही आहे की, त्यांना अजूनपर्यंत, जिवाला जीव देणारे असे, तानाजी मालुसरे, बहिरजी नाईक, मुरारबाजी देशपांडे या सारखे इतर अनेक सरदार-मावळे, जिजाई, येसुबाई, हिरकणी यांच्यासारख्या माता-भगिनी, लेकी, सुना तसेच अचूक व योग्य असे मार्गदर्शन करणारे, सल्ला देणारे, प्रापंचिक असूनही निःस्वार्थ असणारे, सरकारकडून किंवा राज्यकर्त्यांकडून काहीही न घेणारे, स्वीकारणारे संत तुकाराम महराजांसारखे संत, महंत अजून पर्यंत सापडलेले नाहीत.
यांच्यासारखे, असे सरदार, माता-भगिनी आणि संत महंत, या शिवाजींना सापडेपर्यंत हे शिवाजी, त्यांची स्वतःची इच्छा असूनही समाजाच्या भल्यासाठी काहीही करू शकत नाहीत किंवा शकणारही नाहीत. कारण शिवाजी एकटा काहीच करू शकला नसता, आणि आताही त्याला एकट्याला काहीच करणे शक्य नाही.
त्याचे असे आहे की, हल्ली प्रत्येक मंत्र्याकडे, आमदाराकडे, खासदाराकडे गर्दी करून जाणारी प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या वैयक्तीक स्वार्थाचे, इतकंच नव्हे तर, आपल्याच गरजू असलेल्या बांधवांचं नुकसान करणारे असे काही तरी काम घेऊन जात असते. आणि त्या मंत्र्याने त्या व्यक्तीचे ते काम आपल्या परीने करून देऊन सुद्धा, ती व्यक्ती खासगीमध्ये बोलताना असे म्हणते, ‘त्या मंत्र्याने काय केलेय आमच्यासाठी? तो आमच्या काहीच उपयोगाचा नाही. कामाचाही नाही,’ असाच गळा काढत असते.
स्वार्थ साधायला कोणाचीच हरकत असण्याचे कारण नाही. परंतु स्वतःकडे आधीच घरची गडगंज संपत्ती असताना, रोजची भरपूर प्राप्ती असताना, दुसर्यांचा गरजूंचा स्वार्थ ओरबाडणारी, मंत्र्यांकडून नोकर्या बळकावणार्या, तथाकथीत लब्ध प्रतिष्ठीत व्यक्तींची कीव येते. घृणा वाटते.
तात्पर्य, दुसर्यांचा स्वार्थ बळकावल्याने, सुरूवातीला दुसर्यांचा घात होतो, पण त्यात कालांतराने आपला स्वतःचाच घात होत असतो, असाच जगात सर्वत्र नित्य अनुभव आहे.
राज्यकर्त्यांना शिव्या घालण्याआधी प्रत्येकाने स्वतःच स्वतःला तपासले पाहिजे. म्हाणूनच अशा स्थितीत आज आपल्या देशाला, राज्याला एका शिवाजीची नव्हे तर हिरकणीसारख्या माताभगिनींची, निःस्वार्थी सरदारांची, सेवकांची आणि संत महंतांची आत्यंतिक अशी तातडीने गरज आहे.
असे हे सर्व उपलब्ध झाल्यास शिवाजीराजे प्रगट झाल्याशिवाय राहणार नाहीत. असे झालं तरच आपल्या सर्वांना हवे असलेले सुराज्य किंवा गुड गव्हर्नन्स येईल. नुसते ’शिवाजी महाराज की जय’ आणि ‘मेरा भारत महान्’ असे तोंडाने म्हणून स्वतः वाट्टेल तसे वागण्याने ते अजिबात शक्य नाही. तसे आपले नित्याप्रमाणे चाललेच आहे, ‘ये रे दिवसा भर रे पोटा!’
सांप्रतच्या कलीयुगात, श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्या पतीतपावन परमेश्वराची, थोडी जरी उपासना, साधना, पूजाअर्चा केली असता, एकवेळ तो देव हमखास प्रसन्न होतो व संकटात अडीअडचणीला निश्चितपणे पावतो.
पण हा माणूस मात्र असा विचित्र प्राणी (?) आहे की, त्याच्यासाठी तुम्ही काहीही कितीही करा, तो कधीच प्रसन्न होत नाही. सदैव तोंड वाकडे. सकाळी केलेले दुपारी विसरतो, आणि वर विचारतो, ‘काय केलंस सकाळपासून?’ असाच सर्वसामान्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा आणि राजकीय नेत्यांचाही सर्वसाधारण अनुभव आहे.
तरीही ‘ सर्वे जनः सुखीनो भवंतु!..’
शेवटी एकच विचार मनात येतो…….
आहे कां कुणाची तयारी?
हिरकणीसारखं कडा उतरण्याची?
तानाजीसारखं मरण्याची?
बाजीप्रभूसारखं लढण्याची?
बहिरजीसारखं हेरण्याची?
आणि संत तुकारामासारखं जगण्याची?
शिवाजी महाराज की जय|
श्री ज्ञानदेव तुकाराम॥