सुपरफूड भगर किंवा वरई

0
16
  • डॉ. मनाली महेश पवार

काहींच्या मते हे वरीचे तांदूळ उपवासाला चालत नाहीत. पण जर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाट्याचे-केळ्याचे चिप्स, बटाटा चिवडा, साबुदाण्याचे वडे इत्यादी पदार्थ उपवासाला चालू शकतात तर मग भगर किंवा वरीचे तांदूळ का नाही? वरीचे तांदूळ हे उपवासात साबुदाण्याला व लठ्ठपणात मधुमेहासारख्या आजारात गहू व तांदळाला चांगला पर्याय आहे.

उपवास म्हटलं की साबुदाणा, बटाटा, रताळं इत्यादींचीच आठवण येते व उपवासाला याच पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन होते. खरे तर उपवासाला लंघन अपेक्षित असते किंवा पचायला हलका असाच आहार सेवन करायचा असतो. पण नेमकं होतं उलटच! त्याचप्रमाणे वजन कमी करू पाहणारेदेखील डायट करतात. पण नेमकं काय खायचं हे माहीत नसल्याने लठ्ठपणा काही कमी होत नाही. लंघन- उपवास करणे म्हणजे अजिबात काही खाऊ नये किंवा उपाशी राहावे असे नाही; तर पचायला हलका असा आहार सेवन करणे अपेक्षित असते. नाहीतर ॲसिडिटी, डोकेदुखी, उलट्या यांसारखे त्रास उपवासात उत्पन्न होतात. त्याचबरोबर लठ्ठपणा एकटा येत नाही, कॉलेस्ट्रॉल वाढणे, मधुमेह, थायरॉइड, फॅटी लिव्हरसारखे अनेक त्रासही उत्पन्न होत असतात. अशा अवस्थेत तांदूळ, गव्हासारखी धान्ये अपथ्यकर ठरतात. मग अशावेळी आपण काय सेवन करू शकतो?

याला उत्तर आहे वरीचे तांदूळ किंवा भगर. काहींच्या मते हे वरीचे तांदूळ उपवासाला चालत नाहीत. पण जर साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, बटाट्याचे-केळ्याचे चिप्स, बटाटा चिवडा, साबुदाण्याचे वडे इत्यादी पदार्थ उपवासाला चालू शकतात तर मग भगर किंवा वरीचे तांदूळ का नाही? वरीचे तांदूळ हे उपवासात साबुदाण्याला व लठ्ठपणात मधुमेहासारख्या आजारात गहू व तांदळाला चांगला पर्याय आहे.

आयुर्वेदशास्त्राप्रमाणे वरीचे तांदूळ हे तृणधान्य, शूद्र धान्य आहे, जे पचायला एकदम हलके आहे, त्याचबरोबर पोषकसुद्धा आहे. या शूद्र धान्याचे गुण आयुर्वेदशास्त्रात याप्रमाणे दिले आहे-
क्षुद्रधान्यम्‌‍ अनुष्णम्‌‍ स्यात्‌‍
कषायम्‌‍ लघुलेखनम्‌‍
मधुरम्‌‍ कटुकम्‌‍ पाके रुक्षम्‌‍ च क्लेद शोषकम्‌‍
वातकृत बद्धविट्कं च पित्तरक्त कफापघ्म्‌‍॥

  • म्हणजेच हे शूद्र धान्य अनुष्ण आहे. जास्त उष्णही नाही व शीतही (थंड) नाही. थोडेसे तुरट व मधुर चवीचे लघु म्हणजे पचायला अगदी हलके.
    लेखन म्हणजे शरीरातील क्लेद, कफ, चिकटपणा शुद्ध करणारा, साफ करणारा म्हणून लठ्ठपणात, कॉलेस्ट्रॉल वाढल्यास, मधुमेहात हा क्लेद जो वाढलेला असतो, ज्या कारणाने या व्याधी उत्पन्न होतात. त्या क्लेदाचे लेखन करणारा गुण भगरीत आहे. म्हणून वरीचे तांदूळ सेवन करावेत.
    आजच्या बैठ्या कामाच्या पद्धतीने, त्याचबरोबर तांदूळ, गव्हासारख्या स्निग्ध द्रव्यांच्या अतिसेवनाने तसेच अतिरिक्त तेल-तुपाच्या, तळणीच्या पदार्थांच्या सेवनाने लठ्ठपणा, मधुमेह, फॅटीलिव्हर, कॉलेस्ट्रॉल, आमवात यांसारखे आजार निमंत्रणाशिवायच येत आहेत. त्यामुळे लेखन (मेदाचे क्षरण) करणारा गुण असलेली ही भगर, तांदूळ व गव्हाला उत्तम पर्याय आहे. फॅट कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी आपल्या आहारात तांदूळ व गव्हाऐवजी वरीच्या तांदळाला जास्त प्राधान्य द्यावे. साधारण 40-45 वयानंतर स्त्री-पुरुषांच्या शरीरात मेदाचं प्रमाण वाढायला लागतं व मांसधातू काहीसा शोष पावल्यागत वाटत असतो. मग हे वाढत असलेले मेदाचे प्रमाण कमी करण्याकरिता रोजच्या आहारात वरीचे तांदूळ सामील करण्यास काय हरकत आहे?
  • रुक्ष ः ही वरई थोडीशी रुक्षही आहे, म्हणजे शरीरात थोडासा कोरडेपणा उत्पन्न करते. त्यामुळे सर्दी, खोकला, दमा यांसारखे कफाचे विकार कमी व्हायला मदत होते. आता पावसाळ्यात हवेत गारवा, दमटपणा असतो, त्यामुळे कफविकार होण्याची शक्यता जास्त असते आणि त्याचबरोबर हा व्रत-वैकल्याचा म्हणजे उपवासाचा काळ, त्यामुळे या काळात हे वरीचे तांदूळ आपण आपल्या आहारात जरूर घ्यावे.
  • क्लेद म्हणजे शरीरातील द्रव भाग कमी करणारे द्रव्य आहे. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त द्रव किंवा ओलसरपणा कमी होतो. रक्तपित्त, आम्लपित्त, अतिसार, ग्रहणीसारख्या आजारात हे धान्य पथ्यकर म्हणून वापरावे.
  • बद्धविट्कं ः मल बांधून करण्याची प्रवृत्ती. अतिसार, ग्रहणीसारख्या आजारात जेव्हा वारंवार मलप्रवृत्ती होते तेव्हा मल बांधून बाहेर काढण्यासाठी या भगराचा उपयोग होतो. म्हणून ज्यांना वारंवार आम्लपित्त होते, जुलाब होतात, पचनशक्ती मंद आहे त्यांनी भगर खाल्ली पाहिजे. पण मलावरोधाचा त्रास असलेल्यांनी मात्र ही भगर रुक्ष असल्याने कमी प्रमाणात खावी व ही भगर खाताना तूप मात्र अवश्य घालावे.
    आयुर्वेदशास्त्रात भगरला भग्नसंधारकम्‌‍देखील म्हटले आहे. हाडांचे विकार, लिगामेंट टिचर, फ्रॅक्चर इत्यादी व्याधीत झिज भरून काढण्यासाठी भग्न म्हणजे फ्रॅक्चरमध्ये संधान म्हणजे जोडण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • मधुमेहींसाठी तर ही भगर वरदानच आहे. मधुमेह हा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हा जीवनशैलीजन्य आजार आहे. आपला आहार हा शहरात म्हणा, गावात म्हणा पाश्चिमात्त्य झालेला आहे. फास्टफूड, जंकफूडला नुसतं उधाण आलेलं आहे. नवीन धान्य, अतिरिक्त फॅट अशा आहाराचा अतिरेक होतो, त्यामुळे शरीरात क्लेद वाढतो व त्यातूनच या मधुमेहासारख्या आजाराची उत्पत्ती होते. शूद्रधान्य, तृणधान्य खाणाऱ्यांमध्ये उदा. आदिवासी भागात या मधुमेहाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. याचे मुख्य कारण, त्यांची आहारपद्धती. या भगरची ग्लायसेमिक इंडेक्स फार लो असते, म्हणजे ही भगर खाल्ल्यावर साखरेत रूपांतर होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. त्यामुळे डायबिटिस झाला असल्यास किंवा ज्यांना डायबिटिस होऊ नये असे वाटते त्यांनी आपल्या आहारात भगरचा समावेश नक्की करावा.
    हा वरीचा भात व दाण्याची आमटी असा उपवासाला आहार घेतला जातो, पण ही वरी सेवन करणारे अगदीच कमी. त्यातल्या त्यात मोठ्या देवस्थानांमध्ये उपवासाच्या दिवशी वरीचा भात व दाण्याची आमटी असा महाप्रसाद दिला जातो. पण हा आहार फक्त सध्यातरी उपवासापुरतीच आहे.
    भगर मुलांनाही प्रथम आहार म्हणून सुरू करता येतो. कारण भगर ही पचायला हलकी असते व पोषणमूल्यांनी युक्त असते. त्यामुळे अगदी वरचा आहार सुरू करताना आपण मुलांना नाचणीबरोबर ही भगर सुरू करू शकतो. या तृणधान्याची ओळख मुलांना लहानपणातच करायला हवी. आज कमी वयात येणारा मधुमेह लक्षात घेता या वरईचा आपल्या आहारात समावेश करायलाच हवा.

त्यामुळे ही भगर (वरई) ही उपवासापुरती मर्यादित न ठेवता, त्याचा दैनंदिन आहारात समावेश व्हायलाच हवा. ही वरई वरीचा भात, वरीची इडली, वरीचा डोसा, वरीचा उपमा अशा वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करता येते. वरी सातत्याने सेवन करताना काळजी एकच घ्यायची असते, ती म्हणजे, ही वरी गुणाने ‘रुक्ष’ असल्याने वरीबरोबर घरी बनवलेले साजूक तूप अवश्य घ्यावे.
आपल्या मातीत ज्वारी, नाचणी, वरी, राजगिरा अशी तृणधान्ये पिकतात तेव्हा या सुपरफूडचा आपल्या आहारात नक्की समावेश करा आणि याचा आरोग्यावर कसा जादुई परिणाम होतो याचा नक्की अनुभव घ्या.