Home बातम्या सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण तपासकाम पुन्हा दिल्ली जिल्हा पोलिसांकडे

सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरण तपासकाम पुन्हा दिल्ली जिल्हा पोलिसांकडे

0
एका नव्या घडामोडीत केंद्रीय मंत्री शशीर थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचे तपासकाम क्राईम ब्रँचकडून दक्षिण जिल्हा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच हे तपासकाम दक्षिण जिल्हा पोलिसांकडून क्राईम ब्रँचकडे देण्यात आले होते.

तपासकामातील सलगतेसाठी हे तपासकाम पूर्ववत दक्षिण जिल्हा पोलिसांकडे देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि तपासकामातील सलकतेसाठी जर हे प्रकरण आता दक्षिण पोलिसांकडे देण्यात आले असले तर ते क्राईम ब्रँचकडे का देण्यात आले होते असा सवाल केला असता वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी मौन बाळगले.
त्याआधी काल सुनंदा यांचे बंधू राजेश पुष्कर यांनी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांचा जोरदार बचाव केला. थरूर सुनंदा यांना हानी पोचवण्याच्या शक्यतेची कल्पनाही केली जाऊ शकत नाही असे राजेश म्हणाले. त्यामुळे या अनुषंगाने पसरवल्या जात असलेल्या अफवा बंद व्हायला हव्यात असे ते म्हणाले. राजेश यांनी या संदर्भात एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी सुनंदा या खंबीर मताच्या होत्या व त्या आत्महत्या करतील हे शक्यच नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचे तपासकाम वेगाने केले जावे अशी मागणी त्यांनी त्याद्वारे केली आहे. उपविभागीय न्याय दंडाधिकार्‍यांनी मंगळवारी या प्रकरणाचे तपासकाम सर्व बाजूंनी करण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
या तपासकामा दरम्यान पोलिसांनी सुनंदा यांचे बंधू, मुलगा, थरूर तसेच त्यांचे कर्मचारी यांची जबानी नोंदवली आहे. सुनंदा यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे अहवालात म्हटले आहे.