सुदिन ढवळीकर व नीळकंठ हळर्णकरांना कोरोना

0
154

>> काल दिवसभरात पाच जणांचा मृत्यू, एकूण बळी ११६

>> नवे रुग्ण ३३९, सध्याची रुग्णसंख्या ३८६१

मडकईचे आमदार, माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांना काल कोरोनाची लागण झाली आहे. ढवळीकर यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती ट्वीट संदेशाद्वारे दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्री. ढवळीकर हे इस्पितळामध्ये दाखल झाले आहेत. मागील काही दिवसांत संपर्कात आलेल्या सर्वांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ढवळीकर यांनी केले आहे.

भाजपचे थिवीचे आमदार नीळकंठ हर्ळणकर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आमदार हर्ळणकर यांनी कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आमदारांची संख्या आता २ झाली आहे. भाजपचे दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झाले आहे.
राज्यात कोरोना विषाणूने आणखी पाच जणांचा बळी घेतला असून कोरोना बळींची संख्या ११६ झाली आहे. नवे ३३९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३८६१ झाली आहे. तर, कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १२ हजार ३३३ एवढी झाली आहे.

आके मडगाव येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळामध्ये काल निधन झाले. मडगाव येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये सोमवारी निधन झाले. बोरी येथील ७२ वर्षीय पुरुष, फोंडा येथील ५७ वर्षीय पुरुष आणि बायणा वास्को येथील ६६ वर्षीय पुरुष रुग्णाचे कोविड इस्पितळामध्ये काल निधन झाले.

गोमेकॉत ९५ संशयित दाखल
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्डात ९५ जणांना दाखल करण्यात आले आहेत. या आयसोलेशन वॉर्डात आत्तापर्यंत ३०२९ कोरोना संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

२९८ कोरोनामुक्त
राज्यातील २९८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८३५६ झाली आहे. कोरोनाबाधित २३१ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या २३९१ झाली आहे.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेतून २४९५ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. ५३३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने २७४४ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत.

पणजीत नवे ९ रुग्ण
पणजी महानगरपालिका क्षेत्रात नवे ९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णांची संख्या १८९ झाली आहे. सांतइनेज, करंजाळे, चिंचोळे- भाटले, कांपाल, रायबंदर या भागात रुग्ण आढळून आले आहेत. पर्वरी येथे सचिवालयात काम करणार्‍या करंजाळे येथील ४७ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. पणजी मार्केटमध्ये मटण शॉप असलेली एक व्यक्ती कोरोना बाधित झाला आहे. पणजी बसस्थानकावर जनरल स्टोअर्स असलेल्या पाटो रायबंदर येथील व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे.

आयुषमंत्र्यावर उपचारांसाठी
एम्सचे खास पथक गोव्यात
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर उपचार करण्यासाठी नवी दिल्ली येथील एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांचे खास पथक काल दाखल झाले. दोनापावल येथील मणिपाल इस्पितळामध्ये नाईक यांच्यावर १३ ऑगस्टपासून उपचार सुरू असून त्यांच्यावरील उपचारांचा एम्सच्या डॉक्टरांकडून आढावा घेतला जात आहे.