सुदिन ढवळीकरांना मंत्रिपदावरून हटवा

0
4

>> मडकईतील भाजप कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

>> ढवळीकरांनी दक्षिणेतील पराभवासाठी भाजप कार्यकर्त्यांना धरले होते जबाबदार

भाजप सरकारात वीज खात्याचे मंत्रिपद भूषविणाऱ्या सुदिन ढवळीकर यांनी भाजप कार्यकर्त्यांवर केलेले आरोप चुकीचे आहे. उलट भाजप-मगोची युती असतानाही मडकई मतदारसंघात भाजपला कमी प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. मंत्रिपदी असताना कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपाचा आम्ही निषेध करीत असून, मुख्यमंत्र्यांनी सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपदावरून हटवावे, अशी मागणी मडकई मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील पराभवासाठी सुदिन ढवळीकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना जबाबदार धरले होते. त्या टीकेला भाजप कार्यकर्त्यांनी काल उत्तर दिले.

या पत्रकार परिषदेला सुदेश भिंगी, दिनेश वळवईकर, संतोष रामनाथकर, जयराज नाईक, प्रशांत नाईक व सुभाष गावडे उपस्थित होते.
युतीच्या सरकारमध्ये वीजमंत्री पदावर असताना सुदिन ढवळीकर यांनी भाजप कार्यकर्त्यांवर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी काम केले नसल्याचे सुदिन ढवळीकर यांनी केलेले वक्तव्य भाजप कार्यकर्त्यांना मान्य नाही. कारण भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत जोमाने काम केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपदावरून काढून टाकण्याची गरज असल्याचे सुदेश भिंगी यांनी सांगितले.
मडकई मतदारसंघात भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये फूट नाही. सर्व कार्यकर्ते एकजुटीने काम करीत आहे. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार कार्यकर्ते काम करीत असून, लवकरच मडकई मतदारसंघात नवीन भाजप मंडळाची निवड केली जाणार असल्याचे सुदेश भिंगी यांनी सांगितले.

सुदिन ढवळीकरांचे स्पष्टीकरण

आपण भाजप कार्यकर्त्यांना दोष दिलेला नाही. मगोचे कार्यकर्ते भाजपच्या मतदारसंघांत कमी पडले, असे आपण म्हटले होते, असे स्पष्टीकरण सुदिन ढवळीकर यांनी काल दिले.