26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

सुजाण, सुसंस्कृत

एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या निधनाची दखल संपूर्ण देशाकडून घेतली जाणे हे फार क्वचितच घडते आणि त्यात ते राज्य छोटे असेल तर असे होणे अधिकच दुर्मीळ असते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची दखल संपूर्ण देशाने घेतली होती, परंतु त्यामध्ये त्यांची संरक्षणमंत्रिपदाची सफल कारकीर्द हाही एक भाग होता. नुकत्याच दिवंगत झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री दीक्षित यांच्या बाबतीत मात्र त्यांची कारकीर्द केवळ दिल्लीपुरती मर्यादित असूनही राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या मृत्यूपश्‍चात् हळहळ व्यक्त झाली. यामध्ये त्यांचा सात्त्विक, समाधानी चेहरा आणि शांत, संयमी व्यक्तिमत्त्व यांचा जसा मोठा वाटा आहे, तशीच देशाचे ह्रदय असलेल्या दिल्लीच्या जडणघडणीमध्ये त्यांनी दिलेल्या अफाट योगदानाचेही नक्कीच योगदान आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचा शतकानुशतकांचा वारसा असलेला सांस्कृतिक चेहरा एकीकडे जपताना, दुसरीकडे उत्तम रस्ते, फ्लायओव्हरचे जाळे, मेट्रोसारख्या साधनसुविधा यातून तिला नवा प्रागतिक चेहरा मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दीक्षित यांनी आपल्या तीनवेळच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत केले, जे विसरणे दिल्लीवासीयांना शक्य नाही. आज दिल्लीमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये सीएनजीवर चालणारी वाहने सर्रास दिसतात. बसवाहतुकीमध्ये सीएनजीसारख्या ‘स्वच्छ’ इंधनाचा वापर करण्याचे धाडस सर्वप्रथम दाखवले ते शीला दीक्षित यांनीच. जनतेचा सुरवातीचा विरोध पत्करून वीज वितरणाचे खासगीकरण करून त्याद्वारे दिल्लीकरांना त्यांनी उत्तम वीजपुरवठा उपलब्ध करून दिला, जवळजवळ सत्तरहून अधिक फ्लायओव्हरच्या उभारणीद्वारे दिल्लीचा कोंडलेला श्वास मोकळा केला, अत्यंत दाटीवाटीच्या भागाखालूनही मेट्रो नेऊन दिल्लीवासीयांचे एक स्वप्न साकार केले. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अत्यंत सफल आयोजनासाठी दादही मिळवली. त्या स्पर्धेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या साधनसुविधांबाबतीत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप जरूर झाले, परंतु आज त्या साधनसुविधा आजही दिल्लीसाठी उपकारक ठरलेल्या आहेत. दिल्लीची एकूण राजकीय रचना गुंतागुंतीची आहे. देशाची राजधानी असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेसारखा विषय तेथे केंद्र सरकारच हाताळते. अनेक प्रशासकीय बाबींमध्ये केंद्र सरकारची लुडबूड चालत असते. असे असूनही आपल्या तिन्ही कार्यकाळांमध्ये शीला दीक्षित त्यांचा आणि केंद्र सरकारचा संघर्ष कधी झडल्याचे दिसले नाही. उलट भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार असताना देखील अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांच्याशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून दीक्षित यांनी दिल्लीच्या विकासयोजनांना केंद्राचे साह्य मिळविले होते. दीक्षित यांच्या नंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी आलेल्या अरविंद केजरीवालांनी वारंवार जे पोरकटपणाचे दर्शन घडवले, ते पाहता दीक्षित यांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द अधिकच उठून दिसते. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था ही केंद्र सरकारकडे असल्याने निर्भया प्रकरण जेव्हा घडले तेव्हा मुख्यमंत्री असूनही आपण या विषयात किती हतबल आहोत हे पाहून आपल्याला प्रचंड वैफल्य आल्याची खंत शीला दीक्षितांनी आपल्या आत्मचरित्रात व्यक्त केलेली आहे. सोनियांनीच त्यांच्यावर विश्वासाने एकेक जबाबदार्‍या सोपवल्या आणि त्यांनी त्या यशस्वीपणे पारही पाडल्या. हरिकृष्णलाल भगत, जगदीश टायटलर अशा दिग्गज पक्षनेत्यांना डावलून शीला दीक्षित पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या आणि सोनियांच्या अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आतल्या गोटात त्यांनी स्थान मिळवले. ९८ च्या निवडणुकीत त्यांना पूर्व दिल्लीतून लोकसभेच्या निवडणुकीत उतरवण्यात आले होते. पूर्व दिल्ली हा मोठा मतदारसंघ आहे. जवळजवळ वीस विधानसभा मतदारसंघ त्या खाली येतात. एच. के. एल. भगतांचा हा बालेकिल्ला, परंतु ९१ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यांच्या जागी शीला दीक्षितांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी ती जागा जिंकूनही दाखवली. पुढे तालकटोरा स्टेडियमवरच्या कॉंग्रेस कचेरीचा ताबा त्यांच्याकडे आल्यानंतर तरुणांची फौज उभी करून शीला दीक्षित यांनी कॉंग्रेस पक्षसंघटनेला नवा, तरतरीत चेहरा मिळवून दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराणा आणि साहिबसिंग वर्मा यांच्यात जेव्हा बेबनाव निर्माण झाला, तेव्हा त्या दोघांच्या ऐवजी सुषमा स्वराज यांना भाजपने विधानसभेच्या रिंगणात उतरवले. तेव्हा त्यांना पर्याय म्हणून कॉंग्रेसने शीला दीक्षित यांना विधानसभेत उतरवले आणि तेथून त्यांची विधानसभेतील वाटचाल सुरू झाली आणि मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले. त्यांचे सासरे उमाशंकर दीक्षित हे स्वातंत्र्यसैनिक आणि नेहरूंचे सहकारी नेते होते. तो वारसा त्यांच्या मुलाने विनोद दीक्षित यांनी जरी चालवला नाही, तरी शीला यांनी तो चालवून दाखवला. राजकारणातील असा एक सर्वपरिचित चेहरा आता कायमचा नजरेआड झाला आहे. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार दिल्लीच्या निगमबोध घाटावर त्यांचे दहन सीएनजी इंधनावर चालणार्‍या विद्युत दाहिनीत करण्यात आले. एक सुजाण व्यक्तिमत्त्व आता कायमचे नजरेआड झाले आहे!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

स्वातंत्र्याचा हुंकार!

बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली...

कॉंग्रेसी सुंदोपसुंदी

कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव आज गोवा दौर्‍यावर येत आहेत. राज्य विधानसभेची निवडणूक आता आठ महिन्यांवर आली असल्याने कॉंग्रेस पक्षाला त्यासाठी...

विझलेला चिराग

राजकारण हे कोणत्या थराला जाऊ शकते आणि रक्ताच्या नात्यावरही कसे मात करू शकते त्याचा दाहक प्रत्यय सध्या स्व. रामविलास पास्वान यांचे चिरंजीव...