सीलिंग कोसळून पाच विद्यार्थी जखमी

0
9

सांगे सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील घटना

सांगे येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेतील सभागृहाच्या सिलिंगचा काही भाग काल शुक्रवारी दि. 10 रोजी कोसळून पाच विद्यार्थी जखमी झाले. जखमीतील तिघांवर सांगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले व दोघांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यात एकावर उपचार करून घरी पाठवले. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत.

अचानक छताचे सिलिंग कोसळल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोधळ उडाला. माकडाने छतावर उडी मारल्यामुळे छत कोसळल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. यामुळे सरकारी शाळा इमारतिच्या मजबुतीचा प्रश्न उभा राहिला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात येऊन त्या विद्यार्थिनीची भेट घेतली व डॉक्टरांकडे चौकशी केली.
या उच्च माध्यमिक शाळेच्या छपराला जोडलेल्या ॲल्युमिनियमचे सिलिंगचा काही भाग यापूर्वी कोसळला होता. या घटनेची माहिती शिक्षण खात्याला व सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आलेली आहे. काल उर्वरित सिलिंगमधील काही भाग सकाळी साडेदहाच्या दरम्यान कोसळला.