सीबीआय पथम गोव्यात, कागदपत्रे घेतली ताब्यात

0
6

>> सोनाली फोगट खून प्रकरणी तपास सुरू

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट खून प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचे पथक काल गोव्यात दाखल झाले. त्यानंतर बांबोळी येथील सीबीआय कार्यालयात गोवा पोलिसांकडील सोनाली मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

सोनाली फोगट यांचा गेल्या २३ ऑगस्ट २०२२ रोजी हणजूण येथे खून झाला होता. सोनाली यांच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या प्रकरणी गोवा पोलिसांनी तपास करून पाच जणांना अटक केली होती. त्यात सोनाली यांचे सहकारी सुधीर सांगवान, सुखविंदर सिंग यांचा समावेश आहे. तसेच याच प्रकरणात अमलीपदार्थ पुरवल्याने एडविन नुनीस व इतर दोघांना अटक केली होती. गोवा पोलिसांच्या पथकाने हरयाणा येथेही तपासकाम केले होते.
सोनाली फोगट यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने होणार्‍या सीबीआय चौकशीच्या मागणीमुळे अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची विनंती गोवा सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती. केंद्रीय मंत्रालयाने सीबीआय चौकशीला मान्यता देऊन या प्रकरणी पुढील तपास करण्याची सीबीआयला सूचना केली.
सीबीआयच्या पथकांकडून या प्रकरणातील मुख्य संशयित सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील दोघाही संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे.

सीबीआयचे पथक सोनाली यांनी वास्तव्य केलेल्या हणजूण येथील हॉटेल आणि कर्लिस क्लबला भेट देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.