सीजेपीकडून 20 बड्या नेत्यांना पाठिंब्याचे आवाहन

0
12

नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) गेल्या 25 दिवसांपासून दिल्लीत आंदोलन करत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पाठिंबा दिला असून, ते स्वत: 17 दिवसांपासून जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. नीट पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीने केली आहे. 25 दिवसांनंतरही केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता सीजेपीने देशातील 20 बड्या नेत्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आणि पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, संजय राऊत, जे. पी. नड्डा, नितीन नबीन, असदुद्दीन ओवेसी, ओमर अब्दुल्ला यासह 20 नेत्यांना सीजेपीच्या वतीने पत्र पाठविण्यात आले आहे. दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीकडून ‘चलो संसद’ मार्चची घोषणा करण्यात आली आहे. 20 जुलै रोजी हे मार्च आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये अनेक नेत्यांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे 20 तारखेपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन देखील सुरू होत आहे. राहुल गांधींसह विविध नेत्यांनी सीजेपीच्या आंदोलनात हजेरी लावल्यास अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. तसेच, आंदोलनाची धारही तीव्र होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आता या 20 नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.