श्रीनगरमधील सीआरपीएफच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी करणनगरमधील एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीत दडलेल्या दहशतवाद्यांना तब्बल ३२ तासांच्या संघर्षानंतर ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले. जम्मू-काश्मीर पोलिस व सीआरपीएफ यांनी ही संयुक्त मोहीम फत्ते केली. मात्र त्याआधी एक जवान सोमवारी शहीद झाला. लष्करे तैयबाच्या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह चकमकीच्या ठिकाणावरून ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीआरपीएफचे महानिरीक्षक रवीदिप साही यांनी दहशतवाद्यांकडील दाने एके-४७ रायफली व काही काडतुसे ताब्यात घेतल्याची माहिती दिली. सुंजवान येथील लष्कराच्या तळावर जैश ए महमदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर दोनच दिवसांनी श्रीनगरमधील सीआरपीएफच्या छावणीवर हा हल्ल्याचा प्रयत्न झाला. करणनगरमधील हल्ल्यातील दहशतवाद्यांकडे सापडलेल्या शस्त्रांवरून ते दोघेही लष्करे तैयबाचे असल्याचे स्पष्ट झाल्याचे काश्मीरचे पोलीस निरीक्षक एस. पी. पानी यांनी सांगितले. मात्र अद्याप त्यांची नेमकी ओळख पटलेली नाही असे ते म्हणाले.
दोन्ही दहशतवादी दडलेली इमारत पाच मजली असल्याने मोहीम पूर्ण करण्यासाठी वेळ लागल्याचे पानी यांनी सांगितले. दोन्ही दहशतवादी छावणीत घुसण्याच्या प्रयत्नात असल्याचा सुगावा लागल्याने सेंट्रीने त्यांना रोखण्याचे धाडस दाखवले. त्याला गौरविणार असल्याचे ते म्हणाले.
सुंजवान : शहीद जवानांची संख्या ६ वर
सुंजवानमधील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यात आणखी एक जवान शहीद झाल्याचे स्पष्ट झाले असून सोमवारी या जवानाचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणी सापडला. यामुळे शहीद जवानांची संख्या सहा झाली आहे. या तळावर सफाईचे काम सुरू झाल्यानंतर जवानाचा मृतदेह सापडल्याचे लेफ्ट. कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले.

