सीआरझेड क्षेत्रातील घरेही कायदेशीर होणार

0
15

>> 1991 पूर्वीच्या घरांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कळंगुटमध्ये मोठी घोषणा; ‘माझे घर’ योजनेला विरोध म्हणजे घरे पाडण्याची भूमिका

1991 सालच्या आधीची सीआरझेड क्षेत्रात असलेली सर्व घरे आता ‘माझे घर’ योजनेंतर्गत कायदेशीर होणार आहेत. ज्यांना सीआरझेड क्षेत्रात घरे असल्याने नोटिसा आल्या आहेत, त्यांनी या योजनेखाली अर्ज सादर करावा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली.
कळंगुट येथे ‘माझे घर’ योजनेच्या अर्जांचे वितरण करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार मायकल लोबो, सरपंच जोझफ सिक्वेरा, सरकारी अधिकारी, तसेच मतदारसंघातील सरपंच, जि. पं. सदस्य उपस्थित होते.

पुढील 3 महिन्यांत प्रत्येक पंचायत स्तरावर ‘माझे घर’ योजनेशी संबंधित कार्यक्रम भरवले जाणार आहेत. सर्व अधिकारी पंचायत स्तरावर येऊन योजनेची अधिक माहिती लोकांना देणार आहेत. लोकांना जी कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याची माहितीही दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माझे घर योजनेची पुढील वर्षभरात सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून, कायदेशीर झालेल्या घरांची सनद आपण स्वतः देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत 38 मतदारसंघांत अर्ज वितरण पूर्ण करण्यात आले असून, दोन मतदारसंघ लवकरच पूर्ण केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

माझे घर योजना म्हणजे गोवेकरांची घरे कायदेशीर करण्याची चळवळ आहे. लोकांचे हित लक्षात घेत प्रत्येक गोवेकराचे घर नियमित व्हावे, त्यांच्या नावावर व्हावे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. तसा कायदाही करण्यात आला आहे. त्यासाठी जात आणि धर्म पाहिला जात नसून, फक्त गोवेकर असल्याचे पाहिले जाते. गोव्याबाहेरील लोकांना अर्जांचे वाटप केले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. प्रत्यक्षात मात्र गोवेकरच त्याचा लाभ घेतात ही वस्तुस्थिती आहे. 28 फेब्रुवारी 2014 पूर्वी परराज्यातून गोव्यात स्थायिक झालेल्या अवघ्या 5 टक्के लोकांची घरे नियमित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

आमदार मायकल लोबो यांनी माझे घर योजनेचे कौतुक केले. माझे घर योजना आणून सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोमंतकीयांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार असून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले.

‘आम्हाला गोमंतकीयांची घरे वाचवायची आहेत’

आम्हाला गोमंतकीयांचे घरे पाडायची नाहीत. जे लोक विरोध करतात त्यांनाच ही घरे मोडायची असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बंगल्यात राहणाऱ्यांना घरांचे महत्त्व कळणार नाही. सामान्यांनाच त्याचे महत्त्व कळते, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.