केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जर ठराविक एलपीजी सिलिंडर्संनंतर उर्वरित सिलिंडर्स लोकांना आठशे किंवा नऊशे रु. अशा भरमसाठ किंमतीत देण्याचा निर्णय घेतला तर गोव्याचे नागरी पुरवठा खाते लोकांना त्यातील काही सिलिंडर्स सवलतीच्या दरात देण्याबाबत निश्चितच विचार करील, असे नागरी पुरवठा खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
केंद्र जनतेला सहा सिलिंडर्स देणार आहे की नऊ हे निश्चित झाले नसल्याचे मांद्रेकर म्हणाले. गेल्या गुजरात निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कॉंग्रेसने लोकांना सवलतीच्या दरात नऊ सिलिंडर्स देण्याचे आश्वासन दिले होते, असे ते म्हणाले. केंद्र किती सिलिंडर्स सवलतीच्या दरात देईल त्यानुसार गोवा सरकार निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.

