सिद्धेश नाईक यांचे बंड शमवण्यात यश

0
5

>> गोवा प्रदेश भाजपच्या सचिवपदी नियुक्ती; वास्कोचीही जबाबदारी

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांना बंडखोरी करण्यापासून रोखण्यात अखेर भाजपला यश आले. त्यांची गोवा प्रदेश भाजप सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कुंभारजुवे मतदारसंघातून आपणाला भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी सिध्देश नाईक हे प्रयत्नरत होते; मात्र, पक्षाने जेनिता मडकईकर यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज झाले होते. तसेच त्यांनी कुंभारजुवेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर काल त्यांची गोवा प्रदेश भाजप सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल पणजीतील पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. प्रत्येक मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी, अनेक जण इच्छुक होते; मात्र सर्वांना उमेदवारी देणे पक्षाला शक्य नव्हते. भाजप हा देश प्रथम व पक्ष प्रथम या तत्त्वावर चालणारा पक्ष असून, भाजपचे नेते कधीच स्वहिताचा विचार करीत नाहीत, असे तानावडे म्हणाले.

सिध्देश नाईक यांनी पक्षासाठी तळागाळात काम केले आहे. विद्यार्थी परिषदेपासून ते युवा मोर्चाचे सरचिटणीस, पक्षाच्या कुंभारजुवा मंडळाचे अध्यक्ष, पक्षाचे राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारीची मागणी करणे हे स्वाभाविकच आहे, असेही ते म्हणाले.

पक्षाने घेतलेला निर्णय आपणाला मान्य आहे. पक्षाने आपणाकडे वास्को मतदारसंघाची जबाबदारी सोपवली असून, आपण ती पार पाडणार आहे. तसेच कुंभारजुवे येथील पक्षाच्या उमेदवारासाठीही काम करणार आहे.

  • सिद्धेश नाईक, जि. पं. सदस्य.

माजी मंत्री दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य सिध्देश नाईक, प्रदेश भाजप उपाध्यक्ष अनिल होबळे, जि. पं. सदस्य गिरीश उस्कैकर, नावेली येथील सत्यविजय नाईक आदी अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती; मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसली, तरीही ते पक्षासोबत राहिले आहेत, अशा शब्दांत तानावडे यांनी त्यांचे कौतुक केले.