सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाची फाईल बंद होणार

0
12

>> गुन्हा अन्वेषणकडून न्यायालयासमोर अहवाल सादर; निर्णयाची प्रतीक्षा

वर्षभरापूर्वी संपूर्ण राज्यभर गाजलेल्या सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने घेतला आहे. आम्ही या प्रकरणाची तपशीलवार चौकशी व तपास केला आहे. आम्ही या प्रकरणी प्रारंभी बर्‍याच जणांची चौकशी केली. त्यानंतरही आणखी काही जणांची चौकशी करून संशयितांची जबानीही घेतली; मात्र सिद्धी नाईकचा जो संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता, त्या प्रकरणी कोणतेही धागेदोरे हाती लागू शकले नाहीत. त्यामुळे आम्ही आता या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आणि फाईल बंद करण्यासाठीचा अहवाल न्यायालयासमोर ठेवला आहे. आता त्याबाबत न्यायालयच काय तो निर्णय घेईल, असे गुन्हा अन्वेषण विभागातील एक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने काल सांगितले.

सिद्धी नाईक या १९ वर्षीय युवतीचा कळंगुट किनार्‍यावर समुद्रातून वाहून आलेला अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह १२ ऑगस्ट २०२१ रोजी सापडला होता. सिद्धी हिच्या पालकांनी आपल्या मुलीचा समुद्रात बुडल्याने मृत्यू झालेला नसून, तिचा खून करण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण राज्यभर गाजले होते. शवचिकित्सा अहवालाविषयीही शंका व्यक्त करण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांनीही या प्रकरणी आवाज उठवला होता. तसेच सिद्धी नाईक हिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणी सविस्तर चौकशीची मागणी केली होती. विरोधी पक्षांबरोबरच काही बिगर सरकारी संघटनांनीही पोलिसांनी केलेल्या तपास कामाविषयी शंका व्यक्त केली होती. त्यानंतर पोलिसांनी या मृत्यू प्रकरणाचे तपासकाम गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपवले होते.