– विजय कापडी
यंदाच्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आधी अध्यक्षीय निवडणुकीतले एक उमेदवार साहित्यिक श्री. ह. मो. मराठे यांच्या प्रचारपत्रकातल्या एका उल्लेखामुळे जातीय तेढ निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करून एका संस्थेने त्यांच्यावर फौजदारी खटला भरला होता. जामिनाची रक्कम भरून हमो पोलीस चौकीतून घरी आले होते. हमो अध्यक्ष म्हणून निवडून आले तर संमेलन उधळले जाईल अशीच हवा त्या काळात सर्वत्र पसरली होती; पण अध्यक्षीय निवडणुकीत हमो हरले आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले निवडून आल्यामुळे फार मोठ्या संकटातून वाचल्याप्रमाणे अनेक संबंधितांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यांच्या मते आता संमेलन सुविहित होण्यास कोणतीच आडकाठी येण्याची शक्यता नव्हती, पण कसचे काय न् कसचे काय?
संमेलनाच्या आधी एकच नव्हे तर तीनचार वाद एकदम उफाळून आले आणि अनेकांची हवा ‘टाइट’ झाली. निमंत्रण पत्रिकेत परशुरामाचे चित्र आणि त्याच्या परशूची केलेली लेखणी काहींना खुपली. प्रमुख व्यासपीठाला श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे दिलेले नाव काहींना अजिबात आवडले नाही आणि त्यांनी त्याबद्दलची स्पष्ट नाखुषी कळवली. संमेलनाचा खर्च आणि लेखक हमीद दलवाई यांच्या घराजवळून निघू पाहणार्या दिंडीला विरोध दर्शविला गेला. शिवाय ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी डॉ. कोत्तापल्ले यांना संमेलनाला जाऊच नका असा दिलेला सल्ला; आणि गेलात तर काय करणार आहोत त्यासंबंधीची दिलेली कल्पना, अन् हे सर्व कमी म्हणून की काय, श्री. भालचंद्र नेमाडे यांचे सांगणे की, ही संमेलनेच बंद करा… या सर्वांचा एक परिणाम असा झाला की, चिपळूणबाहेरून अनेकांना फोन येऊ लागले की, संमेलन होणार आहे की नाही? आम्ही येऊ का नको? …पण अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे संमेलनाचा दिवस उजाडण्याआधीच सगळ्या सगळ्या वादांचा धुरळा खाली बसला. स्वच्छ, सुंदर आणि गुलाबी थंडगार हवा सर्वत्र पसरली आणि साहित्यप्रेमी रसिकांनी संमेलनस्थळी धाव घेतली. संमेलनाच्या प्रवेशद्वाराशी भल्यामोठ्या आकाराचे निर्जीव हत्ती उभे करून जणू काही असाच संदेश दिला गेला की, हाथी चले अपनी चाल…
यंदा स्वागतसमितीसदस्यमूल्य जे प्रामुख्याने बाहेरगावाहून येणार्या रसिकांच्या व्यवस्थेसाठी असते, त्यात भरमसाठ वाढ केलेली असूनदेखील बाहेरगावच्या आणि चिपळूण व आसपासच्या सर्व रसिकांनी संमेलनस्थळी एकच गर्दी केली. संमेलनस्थळाला अगदी जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. संमेलन म्हणजे साहित्योत्सव असे म्हणे पहिल्यावहिल्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष न्या. महादेव गोविंद रानडे यांनी नमूद करून ठेवल्याने, सर्वांनाच पटले की साहित्यसंमेलन म्हणजे उत्सव; आणि एखादा उत्सव ज्या थाटामाटात साजरा केला जातो तोच उत्साह संमेलनाच्या तिन्ही दिवसांत पाहायला मिळाला. अहो, दहा हजारांची बसण्याची सोय केलेला भव्य मंडप अपुरा पडला आणि रसिकांनी मंडपामागच्या प्रेक्षकांसाठी बांधलेल्या चारपाच शिड्यांच्या दगडी चौथर्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेणे पसंत केले.
साहित्यविषयक कार्यक्रम आणि पुस्तकांचे प्रदर्शन-विक्री ही कोणत्याही साहित्यसंमेलनाची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. तशी ती प्रस्तुत संमेलनातही पाहायला मिळाली. याशिवाय आणखी एक दालन जे अतोनात गर्दी खेचत होते ते होते ‘खाऊगल्ली’ शीर्षकाचे. या तिन्ही ठिकाणी रसिकांची एवढी म्हणून गर्दी होती की मनात प्रश्न उभा राहत होता, सगळ्यात अधिक गर्दी खेचणारे दालन कोणते?
कोणत्याही साहित्यसंमेलनात दोन प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात ते हेच की, अध्यक्षाच्या निवडीसाठी निवडणुकीव्यतिरिक्त पर्याय नाही काय? आणि साहित्यसंमेलनात राजकारण्यांची लुडबुड का म्हणून सहन करायची? चिपळूणच्या संमेलनात राजकारण्यांचे दोन परिसंवाद घडवून या दुसर्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. त्यापैकी पहिला परिसंवाद होता राजकारण्यांसाठीचा आणि त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता- ‘आम्ही काय वाचतो, का वाचतो?’ माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने दुसरा एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता- ‘यशवंतराव चव्हाणांचे विचारविश्व आणि आजचा महाराष्ट्र.’ या परिसंवादात बहुतेक वक्तेमंडळीनी ‘आजचा महाराष्ट्र’ला स्पर्श केला नसला तरी यशवंतरावांच्या वाङ्मयप्रेमाबद्दल आणि मंत्री म्हणून झालेल्या त्यांच्या जडणघडणीवरच अधिक भर दिला. महाराष्ट्र सरकारच्या विधानसभा अधिवेशनाच्या एकेवेळी सकाळच्या दै. ‘मराठा’त आचार्य अत्रे यांनी यशवंतरावांवर जी टीकेची झोड उठवली होती ती वाचून सगळेच अस्वस्थ झाले होते. अधिवेशनात त्याबद्दल यशवंतरावांना विचारताच त्यांनी फारच मार्मिक उत्तर दिले होते, ते असे- ‘मी आचार्य अत्रे साहेबांच्या वाङ्मयाचा इतका म्हणून निस्सीम वाचक आहे की त्यांचा ‘मराठा’ वाचतच नाही!’
आणखी एक वेगळा परिसंवाद होता चित्रकारांचा. ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ या शीर्षकाच्या परिसंवादात एकूण सात नामांकित चित्रकार होते. गेली ८५ वर्षे आपली आठवण न काढणार्या महामंडळाने यंदाच्या वर्षी तरी का होईना पण आमचा परिसंवाद आयोजित केला, याबद्दल कृतज्ञता सर्वांनीच व्यक्त केली. एक प्रकारे पुढच्या संमेलनातही चित्रकारांचा आब राखा असेच त्यांनी सुचवले. या परिसंवादात सगळेच चित्रकार भरभरून बोलले, पण मंचावर ‘कॅनव्हास’ ठेवूनदेखील तो कोराच राहिला. अपवाद अच्युत पालवांनी ‘विठ्ठल’ हा त्यांचा आवडता शब्द काढून दाखवला. चित्रकार चंद्रकांत चन्ने यांनी मुले रावणाचे चित्र काढताना त्याची डोकी नेहमीप्रमाणे डाव्या-उजव्या बाजूला न दाखवता एकावर एक हंडी ठेवल्याप्रमाणे कशी काढून दाखवतात त्याचे गमतीदार प्रात्यक्षिक आणि लहान मुलांच्या चित्रांसंबंधीचा विचार उलगडून दाखवला. मुलांनी कसलेही चित्र कसेही काढले तरी त्यास नावे ठेवू नका, त्यांच्या दृष्टीने ती चित्रे बरोबरच असतात असेही ठासून सांगण्यास ते विसरले नाहीत. व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी शेवटी एका ब्रशचे चित्र काढून त्याला तरुणीचा चेहरा दिला की ती कशी राजकन्येसारखी दिसते याचे गमतीदार प्रात्यक्षिक घडवले. पण सगळ्यात आश्चर्याचा धक्का दिला तो मंगेश तेंडुलकरांनी. ‘हा परिसंवाद अडीच वाजल्यापासून चाललेला आहे… अडीच तास प्रेक्षक बसून आहेत. मी त्यांचा अधिक छळ करू इच्छित नाही,’ असे म्हणून अवघ्या अर्ध्या मिनिटात ते खुर्चीवर जाऊन बसले. गेल्या तीनचार संमेलनांत तेंडुलकरांनी अशाच प्रकारची वेगळी कारणे देऊन आपला सहभाग हा अवघ्या काही मिनिटांचाच ठेवलेला आहे, हे यावर्षी अधिकच प्रकर्षाने जाणवले. एकूणच या परिसंवादात चित्रकार बोलले, पण त्यांच्या रेषा काही बोलल्या नाहीत, असा एक सूर मंडपात श्रोतृवर्गाने लावला.
काही परिसंवादांचे विषय हे मागच्या संमेलनांतून ‘पुढे चालू’ स्वरूपाचे होते. उदाहरणच द्यायचे तर ‘जागतिकीकरण आणि मराठी कादंबरी’ वा ‘विदेशातील मराठीचा गजर’, ‘मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी’ आणि ‘कार्यकर्त्यांच्या शोधात साहित्य संस्था’ यांचा उल्लेख करावा लागेल. विचार तोच, पण तो मांडणारी मंडळी वेगळी एवढेच काय ते वेगळेपण! पण खरी गंमत आणली ती सर्वश्री रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकरांच्या गप्पांच्या कार्यक्रमाने. या दोघांनी या कार्यक्रमाची आपल्या परीने जय्यत तयारी केली असावी. कारण संमेलनस्थळी सर्वत्र ते जोडीनेच वावरताना दिसत होते. मध्येच सुचलेला नवीन मुद्दा एकमेकांना ऐकवत असतील बहुधा! चित्रपटनिर्मितीच्या वेळी इतर मंडळी- जशी नट-नटी, संगीत दिग्दर्शक, छायाचित्रकार यांची सर्वांत आधी निवड करून त्यानंतर कथेसाठी शोध सुरू करतात तसे आपण न करता सर्वप्रथम कथा-पटकथा निश्चित करूनच पुढची जमवाजमव करत होतो, असे फुटाणे यांनी सांगितले. पण एवढी काळजी घेऊनही चित्रपटनिर्मितीच्या बाबतीत ते कर्जबाजारी कसे झाले त्याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. कारण तो मार्मिक प्रश्न त्यांना मुळी संयोजकांनी विचारलाच नाही. नायगावकरांनी आपली ‘शाकाहारी’ ही जुनीच कविता थोडी घासूनपुसून सादर केली आणि श्रोत्यांनीही ‘जुने ते सोने’ म्हणत त्या कवितेला डोक्यावर घेऊन हास्याने प्रचंड दाद दिली.
…पण सर्वांत अधिक दाद मिळाली ती कु. मनश्री सोमण या अंध तरुणीला. कथाकार श्री. सुमेध वडावाला-रिसबूड यांनी मनश्रीच्या आईला विविध प्रश्न विचारून मनश्रीच्या जडणघडणीचे दर्शन घडवले ते प्रत्येकाच्या हृदयाला निश्चितच स्पर्शून गेले असणार. लोकलगाडीतल्या एका प्रवासात स्टेशनवर उतरल्यावर मनश्री एका पुरुषाला लाथ घालते तेव्हा तिची आई आश्चर्याने ‘मनश्री, काय करते आहेस काकांना?’ असे विचारते. तेव्हा मनश्री उत्तरते, ‘मघापासून तीनदा तो मला हात लावतोय. दिसत नाही म्हणून मला कळत नाही काय?’ कु. मनश्री अंध असली तरी अभ्यासात तेज आहे आणि म्हणूनच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम एका भेटीत तिला म्हणाले होते, ‘तू भारताची हेलन केलर आहेस.’ तिने सादर केलेल्या दोन्ही गाण्यांनी श्रोत्यांना जिंकले होते.
संमेलनातल्या ‘कथाकथन’ कार्यक्रमाबद्दल आवर्जून लिहिण्यासारख्या गोष्टी दोन. पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची सुरुवातच मुळी कथाचौर्याने झाली. कथाकाराने सुप्रसिद्ध विनोदी लेखक कै. वसंत सबनीस यांची ‘खांद्याची गोष्ट’ ही कथा जणू काही आपल्याच लेखणीतून उतरल्याप्रमाणे झोकात सांगितली. संमेलनातल्या कथाकथनात दुसर्या लेखकाची गोष्ट नामोल्लेख न करता सांगणे जसे गैर तसे त्यांनी सबनिसांचे नाव कथालेखक म्हणून वा अखेरीस सांगितले असते तरी गैरच ठरले असते. कथाकथनात नेहमीच स्वरचित कथाच ऐकवणे योग्य असते. अर्थात ही बाब त्या लेखकाला ठाऊक नव्हती असे काही नव्हते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी छापून आलेली कथा कोण लक्षात ठेवतो? असाच काहीसा विचार त्या कथालेखकाने(?) केला असावा की काय कोण जाणे… कथाकथन कार्यक्रमाबद्दल सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे हा कार्यक्रमच मुळी अशा वेळी ठेवतात, ज्यानंतर संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम, म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी महनीय-अतिमहनीय मंडळींचा समावेश असणारा असतो. साहजिकच उशिरा सुरू झालेल्या या कथाकथनाच्या कार्यक्रमात समाप्तीची वेळ साधण्यासाठी आपल्या कथेची गाडी अशा काही वेगाने धाड्धाड् करीत सोडावी लागते की, त्यांची कथा ऐकायची का उडालेली तारांबळ पाहायची असाच प्रश्न उपस्थित रसिकांना पडत असतो.
संमेलनात अनेक कार्यक्रमांची रचनाच मुळी अशी असते की कुठला तरी कार्यक्रम हा चुकतोच! असाच एक चुकलेला कार्यक्रम म्हणजे अंतराळ संशोधक आरती पाटील यांचा- ‘भविष्यातील दिशा आणि अंतराळ संशोधन.’ अर्थात प्रामुख्याने विद्यार्थिवर्गाचीच उपस्थिती अपेक्षित असल्यामुळे तो चुकला म्हणून माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकाने का म्हणून हळहळावे, हेही तितकेच खरे. पण इतरांकडून एखादा कार्यक्रम उत्कृष्ट झाल्याचे कळल्यावर फारच चुटपुट वाटत राहते हेसुद्धा नैसर्गिकच नाही का?
याशिवाय नेहमीची कविसंमेलनेही संपन्न झाली. एकूण तीन कविसंमेलनांत आपल्या गोव्याचे कवीही होते. शंभू भाऊ बांदेकर यांनी मात्र ‘प्रत्येक कवीने एकच कविता ऐकवावी’ या सूचनेला धाब्यावर बसवून चक्क दोन कविता ऐकवल्या, हे विशेष. त्यांच्यातल्या कवी आणि राजकारणी या द्वंद्वात कधीकधी राजकारणी बाजी मारून जातो ती ही अशी! या निमंत्रित कविमंडळीव्यतिरिक्त इतर कवींसाठी नेहमीचा ‘कविकट्टा’ होताच. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत अखंड चालू ठेवण्याचे संपूर्ण श्रेय कवींचेच. एका कवयित्रीने आपली पारितोषिक विजेती कविता ऐकवली, पण ती फारसा परिणाम करू शकत नसल्याचे जाणताच ती आटोपून ‘आणखी एक ऐकवते’ असे म्हणून दुसरी ऐकवायला घेतली खरी, पण कविकट्टा सांभाळणार्या तिथल्या प्रमुखाने ‘आधी एकच कविता ऐकवणार्यांचे होऊ द्या, नंतर तुम्ही दुसरी म्हणायला या’ असे सांगून तिला निरोप दिला.
…आता राहिले ते उद्घाटनसोहळा आणि समारोप या संमेलनाच्या आदि-अंतासंबंधी. उद्घाटनसोहळा हा नेहमीच एकप्रकारे सत्कारसमारंभच असतो. अनेकांचा सत्कार पाहायला मिळतो. घाईघाईने सत्कारमूर्ती येतात, घाईघाईने त्यांचा सत्कार पार पाडला जातो हे नेहमीचे चित्र प्रस्तुत संमेलनातही पाहायला मिळाले. उद्घाटक, संमेलनपूर्वाध्यक्ष, नियोजित अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष यांची भाषणे ही जागेवर निमूटपणे बसून ऐकावीच लागतात. उद्घाटक श्री. शरदजी पवार यांनी कॉलेजातली प्रोफेसर मंडळी जसा पंचेचाळीस मिनिटांचा तास घेतात तसाच घेतला. संमेलनात वाद कशाला? ते टाळायलाच हवेत! हा त्यांच्या भाषणाचा गाभा होता. आम्हा राजकारण्यांना जर साहित्यिक (विधानसभेत) चालतात, तर तुम्हा साहित्यिकांना आमची उपस्थिती- तीसुद्धा मंचावरची- का चालू नये? असाही प्रश्न त्यांनी उत्तराची अपेक्षा न ठेवता विचारला. अनेक गोष्टींचा त्यांच्या भाषणात इतका म्हणून ऊहापोह ऐकायला मिळाला की दुसर्या दिवशी सकाळच्या गप्पांच्या कार्यक्रमात श्री. नायगावकरांनी पवारांच्या भाषणाचा उल्लेख करून ते गेले वर्षभर या भाषणाची तयारी करत होते की काय? असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा जो हास्यस्फोट झाला त्यापुढे खरा बॉम्बस्फोट म्हणजे काहीच नव्हे! पूर्वाध्यक्ष श्री. वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या गतवर्षीच्या कामगिरीचा आढावा घेतला. पण श्रोते वाट पाहत होते ती अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या भाषणाची. सुरुवातीला अर्थातच स्वागताध्यक्ष श्री. सुनील तटकरे यांचे भाषण झालेच होते. त्यामुळे भाषणाच्या या गर्दीत नेहमीप्रमाणे श्रोतृवर्ग जेरीस येतायेता अध्यक्ष डॉ. कोत्तापले उभे राहिले. आपले भाषण तब्बल अठ्ठेचाळीस पानांचे असून ते सगळेच आपण वाचून दाखवणार नाही असे सांगून त्यांनी श्रोत्यांना दिलासा दिला. संमेलनात व्यर्थ वाद निर्माण करणार्यांचा समाचार आपण आजच्या दिवशी न घेता, शेवटच्या समारोपाच्या दिवशी घेणार आहोत असे सांगितल्यामुळे आजचा दिवस निभावला. पण शेवटचा तिसरा दिवस ‘वादुक’मंडळीना कठीण जाणार याबद्दल श्रोत्यांना खात्री वाटली. ‘मराठी शाळा येत्या वर्षात अधिक संख्येने उघडणार आहोत’ या शासनाच्या घोषणेचे स्वागत करत असतानाच त्यांनी ‘शाळा समृद्ध असतील याकडे अधिक लक्ष द्या’ असे सांगितले. अध्यक्षीय निवडीच्या सध्याच्या निवडणुकीबद्दल त्यांनी याआधीच्या एकूण एक अध्यक्षांप्रमाणेच नाराजी दर्शवली आणि अर्थातच पर्यायी व्यवस्था काय असावी हे सांगण्याचे टाळले. एक सांगायचे राहिलेच. प्रस्तुत संमेलनात उपस्थित झालेल्या तीन महत्त्वाच्या वादांपैकी दोन वादांवर पवारसाहेब विस्ताराने बोलले खरे, पण परशुरामाच्या चित्राबद्दलच्या वादावर भाष्य करणे मात्र त्यांनी चतुराईने टाळले. राज्यकर्त्यांना सगळ्याच बाबतीत फार सावध राहावे- बोलावे लागते याची एक चुणूकच पाहायला मिळाली. संमेलनात नित्याप्रमाणे एका स्मरणिकेचे उद्घाटन झाले. ‘रत्नप्रभा’ या स्मरणिकेबरोबर अध्यक्षीय भाषणही देण्यात आले, पण शंभर रुपये मोजल्यावरच. याआधीच्या काही संमेलनांत ते स्वागतसमितीसदस्याची पावती दाखवल्यावर फुकटात मिळत असे अशी एक रम्य आठवण अनेकांनी अनेकजणांसमोर सांगितली. पण अठ्ठेचाळीस पानांच्या अध्यक्षीय भाषणात अशा बर्याच जागा उरल्या आहेत, ज्या भरून काढून अध्यक्षीय भाषण नव्वद ते शंभर पानांचे करण्यात येईल असे जेव्हा अध्यक्षांनी सांगितले तेव्हा मात्र अनेकांनी तोंडचे पाणी पळाल्यासारखा चेहरा केला!
संमेलनाच्या इतर बाबी म्हणजे करमणुकीचे कार्यक्रम तुफान गर्दीत नेहमीप्रमाणे रंगले. कूपनवाल्या रसिकांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. इतका की त्यातले काही अवघ्या तीन दिवसांत किमान तीनचार किलो वजन वाढवूनच आपापल्या घरी परतले… तर एकूण असे झाले ८६ वे साहित्यसंमेलन… आता वाट पाहायची ती ८७ व्या संमेलनाची. अर्थात त्याला वेळ आहे, आणि मधल्या काळात छोटी-मोठी संमेलने आहेतच! त्या सगळ्याच विविध संमेलनाला हजेरी लावून तुम्ही-आम्ही आपापले जीवन समृद्ध करायला घेऊया. कसे?

