सासर झालं माहेर

0
767

– संकेत शशिकांत फडके
‘‘माधुरी, ए माधुरी, अजून आवरलं नाही तुझं? अगं अजय व त्याच्या घरची मंडळी थोड्यावेळाने पोहचणार!’’ असं म्हणत माधुरीची आई आपल्या कामात गुंतली. आज माधुरीला पहायला येणार होते. अजय व माधुरी दोघंही एकाच ऑफीसमध्ये कामाला होते. सुरवातीला मैत्री जडली आणि हळूहळू प्रेमात रूपांतर कधी झाले कळलेच नाही. शेवटी घरच्याना सांगितल्यानंतर त्यांनीही होकार दिला. तिच्या घरी आज धावपळ सुरू होती. ती तर त्याच्या येण्याची वाट बघत बसली होती. पाच-दहा मिनिटांत अजय व त्याचे आईवडिल पोहोचले. घरच्यांनी स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पागोष्टी झाल्यानंतर अजयच्या आईने विचारले, ‘‘आम्ही जिला बघायला आलो आहोत ती कुठं आहे? बोलवा तिला.’’ आई माधुरीला घेऊन आली. ती येताच क्षणी अजयच्या आईवडिलांनी मुलगी पसंत असल्याचे लगेच सांगितले. सगळ्यांना आनंद झाला. देवाण-घेवाण विषयी चर्चा होऊन दोन महिन्यानंतरचा मुहूर्त ठरला. दोन महिन्यानंतर मुहूर्त असल्याने तयारीला तसा वेळही नव्हता. मग काय, सगळ्यांची धावपळ सुरू झाली. कोणी सभागृह बुक करतोय, कोणी जेवणाची व्यवस्था बघतोय, कोणी कपडे तर कोणी दागिने…!
आणि अखेर लग्नाचा दिवस उजाडला. त्यांच्या गावातील ग्रामदेवाच्या सान्निध्यात लग्नसोहळा पार पडला. आता दोघेही घरी आली. अजयच्या आईने सांगितले, ‘‘उखाणा घेतल्याशिवाय आत प्रवेश नाही.’’ इतक्यात ‘शंकराला बेल वाहते वाकून, अजयरावांचं नाव घेते तुमचा मान राखून’ असा खणखणीत उखाणा घेऊन त्या लक्ष्मीने अजयच्या घराचा उंबरठा ओलांडला. घरातील सर्व वडिलधार्‍या लोकांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी त्यांच्या संसाराला सुरूवात केली. दोघांचाही संसार सुखात चालला होता. माधुरी सर्वांची काळजी घेत होती. तेवढ्याच प्रेमाने सगळे तिच्याशी वागत. कधी भांडण नाही की रुसवे-फुगवे नाही. आनंदाने राहत होती.
असं म्हणतात स्त्री जन्माच खरं सार्थक ज्यावेळी ती आई होते तेव्हा होते. तिचा जन्म खर्‍या अर्थाने सफल होतो. त्याच गोष्टीचा आनंद म्हणजे माधुरीला मातृत्वाची चाहूल लागली होती. तिने ही गोष्ट अजयला सांगितल्याने त्याने लगेच घरच्या मंडळीला ही सुवार्ता दिल्याने सगळ्यांना अत्यानंद झाला. आता घरातील सर्व मंडळी तिची काळजी घेऊ लागले. तिला वेळेवर जेवण, नाश्ता, औषध मिळते की नाही हे प्रत्येकजण बघू लागले. तिचे डोहाळे भरले. तो समारंभ उत्साहात पार पडला.
घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. पण तिचे सुख नियतीला पहावले नाही. दुपारच्या प्रहरी अजयचा मित्र समीर धावत धावत घरी आला. त्याच्या चेहर्‍यावर रक्ताचे डाग दिसत होते. तो घाबराघुबरा झाला होता. अजयच्या आईने त्याला पाणी दिले. त्या धीर देत ती म्हणाली, ‘‘काय झालं रे?’’ तो म्हणाला, ‘‘मी आणि अजय आज कामासाठी बाहेर गेलो होतो. येताना…’’ एवढं बोलल्यावर त्याला हुंदका आला. घसा कोरडा पडला. पुन्हा पाणी पिऊन तो म्हणाला, ‘‘आम्ही परतताना आमच्या गाडीला अपघात झाला. अजयला बराच मार लागला आहे. त्याला दवाखान्यात दाखल करून तुम्हांला सांगायला पळतच आलो आहे.’’
त्याच्या तोंडून मुलगा गंभीर जखमी झाल्याचे कळताच आई खाली कोसळली. थोड्या वेळाने ती शुद्धीवर आली. घरचे सर्वजण दवाखान्यात गेले. डॉक्टरांशी बोलणी झाली. डॉक्टर म्हणाले, ‘‘फार गंभीर जखम झाली आहे. तो वाचणं कठीण आहे. आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. शेवटी देवाची कृपा!’’ डॉक्टरांचे असे बोलणे ऐकताच माधुरीच्या पायाखालची जमीनच सरकली. घरच्यांनी कसेबसे तिला सावरून घरी नेली.
दुसर्‍या दिवशी इस्पितळातून फोन आला. अजय गेल्याची दु:खद वार्ता ऐकून घरात एकच आक्रोश सुरू झाला. सुखी संसाराला कुणाची वाईट नचर लागली म्हणून सगळे धाय मोकलून रडू लागले. माधुरीला तर काहीच भान राहिले नव्हते. ती त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती. शेवटी सर्वांनी तिला परिस्थितीची जाणीव करून दिली. ती अबोल झाली होती. अजय जाऊन महिना सरला. माधुरीच्या पोटात कळा मारू लागल्या. तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिने एका सुंदर गोंडस मुलाला जन्म दिला. सगळ्यांना अत्यानंद झाला. बारसं झालं. मुलाचे नाव अजय ठेवण्यात आले.
माधुरी तरुण होती, अगदी २६-२७ वर्षांची. एवढ्या लहान वयात विधवा झाल्याचे दु:ख तिच्या सासूला सलत होते. माधुरीने पुन्हा लग्न करावे असा सल्ला तिने दिला. पण माधुरी मानायला तयार होईना. आई म्हणाली, ‘‘मला कळतं तुझं दु:खं; पण अशी घरात बसण्यापेक्षा लग्न करून सासरी जा. मला तू घरात नको आहे असं माझं मत नाही. पण, समाजातील वाईट पुरुषांकडून तुला त्रास होऊ नये म्हणून सांगते.’’
शेवटी कशीबशी तिची समजूत काढून अजयच्या मामाच्या ओळखीचा मुलगा पाहिला. त्याला सर्व घटना कथन केली. तो लग्नाला तयार झाला. माधुरी व तिच्या मुलाचा सांभाळ करण्याचे अभिवचन त्याने दिले. थोड्या दिवसांनी त्यांचे लग्न झाले. तिला पुन्हा एकदा नवीन संसार मिळाला. तिचे जुने सासर आता माहेरघर झाले!