सावर्ड्यात कीर्तन संमेलनाचे उद्घाटन

0
56

कीर्तन हे सामाजिक सेवा व समाज प्रबोधनाचा गाभा आहे, असे गोवा कला अकादमीचे अध्यक्ष तथा सांत आंद्रेचे आमदार विष्णू सुर्या वाघ यांनी म्हटले.

ते काल सावर्डे येथील घैसास पौरोहित्य सभागृहात हरिभक्त परिषद गोमंतक व घैसास परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या गोमंतक कीर्तन संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाचे निमंत्रक आनंद रामचंद्र घैसास, उद्घाटक सदाशिव नागेश टेंगसे, संमेलनाध्यक्ष गजाननबुवा नाईक उपस्थित होते. कीर्तन हे आध्यात्मिक व सामाजिक विचार समाजात रुजविण्याचे प्रभावी साधन असल्याचे वाघ म्हणाले. आपल्या जडण-घडणीत कीर्तनकारांचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

सनबर्न आणि दिंडी

सनबर्न पार्टी संदर्भात बोलताना विष्णू वाघ म्हणाले की, सनबर्न पार्टीत सहभागी होणे हे श्रेष्ठ मानले जाते. परंतु तेथे काय होते ते सर्वांना माहीत आहे. सरकारने या सनबर्न पार्टीला मान्यता दिलेली असली तरी आपला वैयक्तिक त्याला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कांदोळीला सनबर्न झाली असली तरी आपण कळंगुट पर्यटकांसाठी एक दिवसीय दिंडी महोत्सव व भक्ती संगीत संमेलन आयोजित करणार असल्याची घोषणा केली. अध्यक्षस्थानावरून बोलताना गजानन बुवा नाईक म्हणाले की, देश अनेक समस्यांत गुरफटलेला आहे. शासन व प्रशासन हे पारदर्शी असायला हवे व मिळविलेले धन हे धर्माला मान्य आहे का हा विचार व्हावा. समाजाला लाचारीतून मुक्त करण्यासाठी समाजांत चांगले संस्कार पेरणे आवश्यक आहे व ते काम कीर्तन संमेलनातून होईल असा विश्‍वास संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केला. दि. २९ डिसेंबर व दि. ३० डिसेंबरपर्यंत संमेलनाचे उद्घाटन सदाशिव टेंगसे यांच्या हस्ते झाले. निमंत्रक आनंद घैसास यांनी स्वागत तर श्रीकांत माणिकराव घैसास यांनी आभार प्रदर्शन केले. त्यानंतर दिवसभर र्कीतनकारांची विविध विषयांवर कीर्तने झाली.