स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांना काल सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. राहुल गांधी यांनी यापुढे जर असे कोणतेही विधान केले, तर आपण स्वत:हून त्याची दखल घेऊ, असेही न्यायालयाने बजावले. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना इशारा दिला. वीर सावरकरांसारख्या व्यक्तींनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि तुम्ही त्यांना अशी वागणूक देता, अशा शब्दांत शुक्रवारी न्यायालयाने राहुल गांधींना सुनावले. तसेच भविष्यात कधीही अशी टिप्पणी करू नका; अन्यथा न्यायालय स्वतः त्याची दखल घेईल, असा इशाराही दिला. तसेच वीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी केलेले विधान हे बेजबाबदार पणाचे होते आणि त्यांनी असे बोलायला नको होते, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

