व्यावसायिकाकडून १ लाखाची खंडणी मागितली
आपण मानव हक्क आयोगाचे सदस्य असल्याचे सांगून बनवेगिरी करून हणजूणमधील एका व्यावसायिकाकडून एक लाख १० हजार रुपयांची खंडणी घेतलेल्या चौघाजणांना काल कळंगुट पोलिसांनी अटक केली.
याबाबत वृत्त असे की सावंतवाडी येथील चौघेजण बुधवारी हणजूण येथील एक बार अँड रेस्टॉरंट मालक प्रसाद चिमुलकर यांच्याकडे आले व त्यांना आपण रत्नागिरी येथील मानव हक्क आयोगाचे सदस्य असल्याची बतावणी केली. चिमुलकर यांच्या आस्थापनामुळे ध्वनी प्रदुषण होत असून त्यातून सुटकेसाठी त्यांच्याकडून या टोळक्याने दहा हजार रुपये मागितले. चिमुलकर यानी घाबरून ती रक्कम दिली. त्यानंतर काल गुरुवारी पुन्हा ही चौकडी चिमुलकर यांच्याकडे गेली व एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र चिमुलकर यानी सावध होऊन पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर चिमुलकर यांनी त्या चौघांना कळंगुटला पैसे नेण्यासाठी बोलावले. परंतु त्यांन पैसे पर्वरी येथे घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे चिमुलकर पैसे घेऊन पर्वरीत ठरल्या ठिकाणी गेले. पोलिसानी पर्वरीत सापळा लावला. चिमुलकर यांनी त्यांना पैसे दिल्यानंतर त्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या म्होरक्याचे नाव विजय गांधी असे आहे.