साळगाव खूनप्रकरण, संशयित लवकरच ताब्यात ः मुख्यमंत्री

0
15

मुड्डोवाडा साळगांव येथील दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या मार्गावर पोलीस असून त्या आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल व्यक्त केला.

राज्यातील अलीकडच्या गुन्ह्यांत परप्रांतीयांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (रासुका) कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांनी आपल्या घरात भाडेकरू ठेवताना त्याची पोलीस यंत्रणेकडून पडताळणी करून घेण्याची गरज आहे. भाडेकरूंची पडताळणी केल्याशिवाय कुणालाही खोली भाडेपट्टीवर देऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

रिचर्ड डिमेलोची स्कूटर ताब्यात
साळगाव येथील दुहेरी खून प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून खून करण्यात आलेल्या रिचर्ड डिमेलो याची पळवून नेण्यात आलेली स्कूटर थिवी रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. रिचर्ड डिमेलो आणि साथीदाराचा खून केल्यानंतर संशयित आरोपीने मयत रिचर्ड याची स्कूटर घेऊन पलायन केले. संशयित आरोपी रेल्वेतून परराज्यात पळाल्याचा कयास व्यक्त केला जात आहे. साळगाव पोलिसांनी रिचर्ड डिमेलो व अन्य एक व्यक्तीच्या खून प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जॉर्ज नोरोन्हा यांनी तक्रार दाखल केली आहे. ही खुनाची घटना 5 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 6 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.30 यावेळेत घडली आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. रिचर्ड डिमेलो व साथीदाराचा धारदार शस्त्रांनी प्रहार करून खून करण्यात आला.