साळगाव अपघातात विद्यार्थी ठार : एक गंभीर

0
47

साळगांव-माडानी येथे आज दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान एका मोटारसायकल स्वाराने येथील रस्त्याच्या बाजूला असलेल्या माडावर मोटारसायकल ठोकल्याने उपेंद्र (साहिल) वासुदेव गवंडी हा १७ वर्षीय खोब्रावाडा कळंगुट येथे राहणारा व इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाला.

उपेंद्र, सुलेमान व रजन नार्वेकर तिघेजण एका मोटरसायकल वरून साळगांवहून पर्रा मार्गे म्हापसा येथे येत असताना अचानकपणे दुचाकी चालकाचा मोटारसायकल वरील ताबा सुटून साळगांव, माडनी येथील एका माडाला धडक दिली असता त्यातील उपेंद्र यांच्या चेहर्‍याला व डोक्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. सुलेमान हा गंभीर जखमी झाला असून त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल केले आहे. रजत हा किरकोळ जखमी झाला होता. त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले व नंतर त्याला घरी पाठविण्यात आले. या अपघाताचा पंचनामा कळंगुट पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक देवयानी अंबेकर करीत आहेत.