सहकाऱ्याने धारदार शस्त्राने वार करत संपवले; मृताची दुचाकी घेत संशयित फरार
मोरजीतील उमाकांत खोत खून प्रकरण ताजे असतानाच मुड्डोवाडा-साळगाव येथे काल दुहेरी खुनाचे प्रकरण उजेडात आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिचर्ड डिमेलो (रा. गिरी) आणि अभिषेक गुप्ता (मूळ रा. इंदूर-मध्यप्रदेश) या दोघांचे मृतदेह एका घरातील भाड्याच्या खोलीत आढळून आले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे दिसून आले. या खून प्रकरणात एक संशयित गुंतल्याचा संशय आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मृत व्यक्तीची दुचाकी घेऊन पळाला आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
या खून प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकामाला सुरुवात केली. तसेच श्वानपथक, फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पुरावे गोळा करण्यात आले. मुड्डोवाडा साळगाव येथील घरातील भाड्याच्या खोलीत हा खूनाचा प्रकार उघडकीस आला. त्या खोलीत मृत दोघे आणि अन्य एक असे तिघेजण राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. प्राथमिक तपासात दोघांचा मृत्यू मध्यरात्रीपासून पहाटेच्या सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग, तसेच झटापट झाल्याचे दिसून आल्याने हा खून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील संशयित फरार झाल्याने रेल्वे स्थानक, बसस्थानकावरील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जात आहे.
पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि स्थानिकाकडून माहिती मिळविण्याचे काम हाती घेतले आहे. साळगाव परिसरात या खून प्रकरणामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी संयम बाळगावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये पाठविले आहेत. शवचिकित्सा अहवाल आल्यानंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
परप्रांतीय कामगारांची चौकशी सुरू
या परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांची चौकशी देखील सुरू आहे. या दुहेरी हत्येमागे व्यक्तिगत वैर, कामाच्या ठिकाणी झालेला वाद किंवा आर्थिक कारण असू शकते, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
>> रिचर्ड डिमेलो हा गिरी येथील रहिवासी असून मुड्डोवाडा साळगाव येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याच्यासोबत एक परप्रांतीय राहत होता. रिचर्ड हा संगीत व्यवसायात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

