सार्वजनिक उपस्थितीवर आजपासून निर्बंध

0
18

>> गर्दी करणार्‍यांवर कारवाई करणार

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती

राज्यातील कोरोना महामारीच्या वाढत्या फैलावामुळे राज्यात कोरोनाविषयक निर्बंधांची आजपासून कडक अंमलबजावणी करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आली आहे. खुल्या जागेतील सभांसाठी केवळ १०० जणांच्या उपस्थितीला मान्यता दिली जाणार आहे. तर, बंद सभागृहातील सभेसाठी सभागृहाच्या ५० टक्के उपस्थिती किंवा जास्तीत जास्त १०० जणांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यापेक्षा एकाच ठिकाणी गर्दी करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस, जिल्हा प्रशासनाला आवश्यक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. लोकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
कोरोना रूग्णांच्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या २७ डिसेंबर आणि २९ डिसेंबरला निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. केवळ जाहीर सभा, बंद सभागृहातील सभाच्या उपस्थितीबाबत आदेश जारी केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

स्पितळांत सुविधा उपलब्ध
राज्यातील कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सरकारी इस्पितळांमध्ये आवश्यक साधन सुविधा उपलब्ध आहेत. गरज भासल्यास खासगी इस्पितळांच्या खाटा आरक्षित केल्या जातील. राज्यात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असली तरी इस्पितलामध्ये दाखल होणार्‍या बाधितांचे प्रमाण कमी आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

तृतीय वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन
विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तृतीय वर्ष परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऑफलाईन परीक्षेबाबत संबंधितांशी चर्चा केली आहे. राज्यातील विद्यालयाचे वर्ग २६ जानेवारीपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन वर्गाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

शुक्रवारी राज्यात उच्चांकी १४३२ कोरोनाबाधित
राज्यात चोवीस तासांत नवीन १४३२ एवढ्या उच्चांकी संख्येने कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. चौदा बाधितांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णाची संख्या सहा हजारांवर जाऊन ठेपली असून सक्रिय रुग्णांची संख्या ५९३१ एवढी झाली आहे. कोरोना बळींची संख्या ३५३० एवढी झाली आहे. चोवीस तासांत ११२ बाधित बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९२ टक्के एवढे खाली आले आहे. इस्पितळामधून बरे झालेल्या ४ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. चोवीस तासात ६५९२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. स्वॅब पॉझिटिव्हिटी प्रमाण २१.७२ टक्के एवढे आहे. आरोग्य खात्याने राज्यातील विविध भागांतील सक्रिय रुग्णांच्या संख्येची माहिती दिलेली नाही.

देशपातळीवर गेल्या चोवीस तासांत
१ लाख १७ हजार कोरोनाबाधित

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे तब्बल १ लाख १७ हजार ९४ नवे रुग्ण आढळले आहेत तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात २४ तासांत ३६ हजार २६५ नवे रुग्ण आढळले तर पश्चिम बंगालमध्ये १५ हजार ४२१, दिल्लीत १५ हजार ९७, तामिळनाडूत ६ हजार ९८३ आणि केरळमध्ये ४ हजार ६४९ रुग्ण आढळले. तसेच ओमिक्रॉनचे देशात आता तीन हजारांवर रुग्ण आढळले असून ओमिक्रॉनचे देशात सध्या ३ हजार १० रुग्ण असून त्यात सर्वाधिक ८७६ रुग्ण महाराष्ट्रात तर त्यानंतर ४६५ रुग्ण दिल्लीत आहेत. एकूण रुग्णांपैकी १ हजार १९६ रुग्ण बरे झाले आहेत.