सार्ध पंचशताब्दी महोत्सव

0
35

श्रीगोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठपरंपरेचा

श्रीगोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठपरंपरेला 550 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने येत्या दि. 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळात पर्तगाळ (काणकोण) येथे वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या सार्ध शतमानोत्सव उत्सवाचे प्रयोजन आणि त्यानिमित्ताने साकारत असलेले विविध संकल्प ह्याविषयी पर्तगाळ पीठाधीश श्रीमद्‌‍ विद्याधीशतीर्थ यांनी दिलेली सविस्तर माहिती ः

र्तगाळ मठाच्या वास्तूस यंदा 369 वर्षे पूर्ण झाली. मात्र, सारस्वतांच्या ह्या मठपरंपरेस 550 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने ह्या वास्तूचा संपूर्ण पुनरुद्धार केला जात आहे. 550 वर्षे होत असल्याने सार्ध पंचशतमानोत्सव सोहळा पर्तगाळी मठात 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत साजरा करावा असा संकल्प आम्ही ह्या निमित्ताने केला आहे.

अडीच वर्षांपूर्वी आमच्या मनात असा विचार आला की ह्या मठाची वास्तू आता जुनी झाली असल्याने तिचे नूतनीकरण, सौंदर्यीकरण करावे व नवीन काही वास्तू उभारावी. तसा संकल्प आम्ही केला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पूर्वी येथे एवढ्या लोकांची आवक नसायची. पूर्वी दळणवळणाच्या सोयी नसल्याने पर्तगाळ मठात जास्त प्रमाणात लोक येत नसत. मात्र, दळणवळणाच्या सोयीसुविधा वाढल्यानंतर पर्तगाळ मठात अलीकडे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात.
पन्नास वर्षांपूर्वी 1980 ते 84 या काळात गुरूमहाराजांनी, म्हणजे पूर्वसुरी श्रीमद्विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांनी मठाची बाहेरची जी परिक्रमा आहे ती बांधून घेतली होती. त्यामुळे येथे काही आम्ही बदल केले नाहीत. मात्र, जुने टाइल्स काढून संगमरवर बसवला गेला आहे. वरचे छताचे काम केले आहे, छताचे जे लाकडी कोरीवकाम आहे तेही नवे नाही. येथे जे इंदिराकांत भवन होते, त्या इमारतीचेच लाकूड त्यासाठी वापरण्यात आले आहे. ही संपूर्ण परिक्रमा नव्याने लाकूड खरेदी करण्याऐवजी होते ते लाकूड वापरूनच आम्ही बनवून घेतली आहे.

श्रीरामनवमी ब्लॉक निवास व्यवस्था
नूतनीकरणाचा विचार मनात येण्याचे एक कारण म्हणजे रामनवमी उत्सवास मठात भरपूर लोक येतात. रात्री बारा एक वाजल्यानंतर रथ ओढला जातो. म्हणजे साडेतीन वाजेपर्यंत कार्यक्रम चालतो. त्यानंतर भाविकांनी काय करावे? शिवाय खूप लोकांस मठात राहून मठाचे उत्सव पाहावेत अशी इच्छा असे. पण मठात भाविकांच्या निवासाची सोय नव्हती. त्या विचाराने श्रीरामनवमी ब्लॉक आम्ही निर्माण केला आहे. रामनवनीच्या निमित्ताने लोक आले तर त्यांनी येथे वास्तव्य करावे. रथोत्सवात सहभाग घेऊन रात्री येथे विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी जाता यावे या दृष्टीने ही निवासव्यवस्था केली गेली आहे.


वैदिक संकुल आणि निवासव्यवस्था
इमारत बांधणे हा आमचा मूळ उद्देश नाही. आमचे जे मूळ गुरू जगद्गुरू श्रीमध्वाचार्य यांचे जे द्वैत तत्त्वज्ञान आहे, त्याचा प्रचार प्रसार व्हावा ह्यासाठी मुले पाठशाळेत शिकावीत असा उद्देश आहे. मुले यायला हवी असतील तर त्यांना शिक्षक लागतील. शिक्षक यावेत तर त्यांना निवास लागेल. त्यांना निवास द्यायचा तर इमारत लागेल. मठाची नियमावली असल्याने मठातील आवारात राहण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे त्याचा विचार करून मठाबाहेर आम्ही एक नवीन वास्तू निर्माण केली आहे. तेथे बारा सदनिका आहेत, जेथे या पाठशाळेतील वैदिकांना व त्यांच्या कुटुंबीयांस राहता येईल. हे शिक्षक कुटुंबासहित येथे राहिले तर मुलांना चांगले वैदिक शिक्षण विनाखंड मिळेल हा विचार ठेवून ही सोय करण्यात आली आहे. अविवाहित शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी स्टुडिओ अपार्टमेंट बांधण्यात आली आहेत.
जून 2026 मध्ये पाठशाळेस आरंभ
मठाच्या आतील प्राकाराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. पाठशाळेचे नूतनीकरण करताना मुलांना आजच्या काळाशी सुसंगत ग्रंथालय, संगणक शिक्षण, संगीताचेही ज्ञान मिळावे, ऑनलाइन विचारविनियम करता यावा ह्यासाठी ग्रीन रूमही बनवला आहे. जून 2026 मध्ये पाठशाळेचा आरंभ होईल असा आमचा विचार आहे. येत्या दहा वर्षांत येथून विद्वान, पंडित घडावेत असा आमचा मानस आहे. आज सर्व लोक डॉक्टर इंजिनिअर होऊ पाहतात. मग देवकृत्यांसाठी भटजी कोण? धार्मिक कार्यास, लग्नमुंजीस कोण येतील? समाजात समतोल असायला हवा. सगळेच डॉक्टर, इंजिनिअर होऊन कसे चालेल?

रामायण ‘थीम पार्क’
श्रीरामप्रतिमेच्या निमित्ताने एक रामायण थीमपार्क आम्ही संकल्पिला आहे. त्यासाठी एक नावही ठरवण्यात आले आहे. आमच्या मनात आले की आम्ही एवढे सगळे नूतनीकरण करतो आहोत, एवढ्या वास्तू उभारत आहोत. परंतु देवासाठी काय केले? असे प्रश्नचिन्ह मनात निर्माण झाले. 550 वर्षे 24 स्वामींपर्यंत ही जी परंपरा घडून आली आहे, ती अखंड चालत आलेली आहे. अविच्छिन्नपणे ती चालत आली आहे. ती चालण्याचे मूळ कारण काय, तर श्रीरामदेवाची कृपा. त्याच्या आशीर्वादाने ही परंपरा अखंड चालत आली आहे.

आमच्यावर देवाने एवढे उपकार केले आहेत, तर त्याची परतफेड केली पाहिजे ह्या भावनेतून आम्ही आणि समाजबांधव मिळून त्या देवाचे स्मरण करावे आणि कृतज्ञता व्यक्त करावी या हा ‘थीमपार्क’ साकारत आहे. केवळ राममूर्ती पाहून भाविकांनी परत जाऊ नये. त्यामुळे राम हा विषय घेऊन आम्ही ‘थीम पार्क’ उभारत आहोत. मात्र, ते मनोरंजनाचे ठिकाण नव्हे. एक ज्ञानकेंद्र बनावे, रामाच्या जीवनाचे आदर्श त्यांनी जाताना घेऊन जावे ह्या उद्देशाने ते ‘थीम पार्क’ उभारले जात आहे. त्याच्यासाठी एक नावही आम्ही संकल्पिले आहे.

77 फुटी भव्य श्रीरामाची कांस्यप्रतिमा
पर्तगाळ मठाच्या प्रवेशद्वारापाशी भव्य श्रीराम प्रतिमा साकारत आहे. जेथे श्रीरामाची भव्य प्रतिमा उभी राहात आहे, तेथे विहंगावलोकन केले, तर त्या जागेचा आकार नैसर्गिकतः धनुष्याकृती आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की तिथे रामाची मूर्ती उभारावी. तज्ज्ञांशी विचारविनियम केल्यावर असे समजले की ती मूर्ती जर 77 फूट उंचीची केली, तर ती 30 अंश कोनातून अचूक दृष्टिपथात येईल. त्यामुळे 12 फुटांचा चौथरा आणि 65 फुटांची कांस्याची रामप्रतिमा तेथे साकारणार आहे. पद्मश्रीप्राप्त शिल्पकार श्री. राम सुतार यांचे पुत्र अनिल राम सुतार हे ही मूर्ती साकारत आहेत. येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी मूर्तीप्रतिष्ठापना होईल व त्या दिवशी संध्याकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिचे अनावरण होईल.

चौथऱ्यावर रामजापकांची नावे
ज्यांनी रामनाम जपाचा संकल्प पूर्तीस नेला, त्या 120 केंद्रांची नावे श्रीरामप्रतिमेच्या चौथऱ्यावर अंकित केली जाणार आहेत. मठ व स्वामींच्या वतीने रामनामजपास सहकार्य दिलेल्यांची नावे रामाच्या चरणी शाश्वत राहावीत ह्या विचारातून हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मूळ आराखडाही बदलला आहे. पूर्वी तेथे एक कारंजे उभारावे अशी कल्पना होती. परंतु रामजापकांची नावे तेथे अक्षर राहावीत ह्यासाठी आम्ही मूळ आराखड्यातही बदल केला.

श्रीराम संग्रहालय
श्रीरामांच्या नावे एक भव्य संग्रहालय तेथे उभारले जाणार आहे. दहा हजार चौरस फुटांचे ते संग्रहालय असेल. चित्रकार सुहास बहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ते उभारले जात आहे. रामाचे प्रभाव कसकसे कालमानानुसार बदलत गेले, राम असलेली टपाल तिकिटे, लखोटे, विजयनगर साम्राज्यातील रामाची प्रतिमा असलेली नाणी, रामाची विविध शैलींतील चित्रे, भारतात व भारताबाहेर रामकथा कशी पोहोचली आहे त्याचे दर्शन, विविध राज्यांत कसे त्यांचे त्यांचे रामायण आहे, ते सर्व ह्या संग्रहालयात दाखवण्याची व्यवस्था केली गेली आहे.
सेव्हन डी थिएटर
आजच्या तंत्रज्ञानानुसार एक सेव्हन डी प्रेक्षागारही उभारले जात आहेत. मात्र ते मनोरंजनासाठी नाही. मुलांना आवडेल अशा पद्धतीने हे सेव्हन डी थिएटर संकल्पिले आहे. एक बहुद्देशीय सभागृह, ध्यानासाठी एक सभागृह, तसेच रामविषयक एक ऑडिटोरियमही आहे जेथे 140 लोक एकाच वेळी बसून रामाचे जीवनाचे आदर्शाची तीन चार मिनिटांची छोटी छोटी दृश्ये पाहू शकतील अशी कल्पना आहे.

आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श भ्राता, आदर्श राजा असे सर्वांगीण आदर्श म्हणजे मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम असे त्यांना संबोधितो. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित सर्व आदर्श त्या प्रेक्षागारात दाखवले जातील. शिवाय संध्याकाळी थ्रीडी प्रोजेक्शन मॅपिंग, लाईट अँड साऊंड शो असा संकल्प आहे. कोणी सकाळी आले तर ध्यान करावे अशी सोय आहे. इनडोअर आणि आऊटडोअर योगासन करण्याची येथे सोय असेल. रामाच्या पार्श्वभूमीवर रामप्रतिमेसमोर बसून येथे योगासने करता येतील. संपूर्ण पार्कचे लँडस्केपिंग रामायण ही संकल्पना धरूनच केले जाणार आहे. झाडांतूनही जटायू वगैरे प्रतिमा साकारल्या जातील.

550 कोटी रामनामजप अभियान
17 एप्रिल 2024 रोजी वडाळा मुंबई येथील राममंदिरातून श्रीरामनामजपास श्रीरामनाम त्रयोदशाक्षर श्रीरामतारकमंत्रजपाचा आम्ही उपदेश केला व ऑक्टोबर 2025 मध्ये 550 दिवसांत त्याची परिपूर्ती झाली. ह्या 550 दिवसांत 592 कोटी रामनाम जपपूर्ती झालेली आहे. म्हणजे आम्ही जे संकल्पिले होते त्यापेक्षा 43 कोटी अधिक रामनामजप झालेला आहे आणि आताही सोहळा संपेस्तोवर 120 केंद्रांमध्ये व 104 उपकेंद्रांत रामनामजप सुरू आहे. मठपरंपरेस 550 वर्षे पूर्ण होत असल्याने 550 कोटी रामनाम जप अभियान समाजाच्या मदतीने आम्ही चालवले. त्याचे हवन 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या काळात पर्तगाळ मठाच्या परिसरात चालेल. त्यानंतर संपूर्ण जी 550 वर्षपूर्तीची सांगता 7 डिसेंबरला होईल.

रामनामजपाचा फायदा काय?
काही लोकांनी विचारले की ह्या रामनामजपाचा फायदा काय? तर फायदा आम्ही सांगणार नाही. ज्यांनी जप केलेला आहे, तेच फायदा सांगतील. आपल्या जीवनात काय बदल झाला, आरोग्यात कशी सुधारणा झाली, विचार कसे बदलले हे तेच सांगतील. आम्ही त्यांना काही सांगितलेले नाही. वयोवृद्ध लोकांना वेळ कसा घालवावा कळत नसे. रामनामजपामुळे त्यांनाही एक नवे रामनामजप कुटुंब मिळाले आहे. एक सामाजिक कुटुंब त्यांना मिळाले आहे. समाजाची एकजूट ह्यानिमित्ताने घडून आली. हा संकल्प पुढेही सुरू ठेवला जाईल की नाही ह्याचे उत्तर आम्ही सात डिसेंबरच्या सांगता सोहळ्यात देऊ.

24 ते 31 डिसेंबर भजन सप्ताह
पर्तगाळ मठाच्या परंपरेत प्रथमच येत्या डिसेंबरमध्ये 24 ते 31 या काळात आम्ही अखंड भजन सप्ताह करणार आहोत. त्यासाठी भरपूर नावे आली आहेत. मठाच्या इतिहासात प्रथमच हे घडणार आहे. 31 डिसेंबर रोजी अयोध्या राममंदिर प्रतिष्ठापनेस दोन वर्षे होतात. त्या दिवशी पौष शुद्ध द्वादशीस येथे वर्धन्ती उत्सव कार्यक्रम होईल.

बद्रिनाथ ते पर्तगाळ श्रीरामरथयात्रा
श्रीरामरथयात्रेला 18 ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ह्या मठपरंपरेचा प्रारंभ बद्रिनाथ येथे झाला असल्याने, पहिल्या स्वामींस आश्रमदीक्षा बद्रिनारायणाच्या सान्निध्यात प्राप्त झाली होती, ह्या रथयात्रेचा प्रारंभही बद्रिनाथातूनच करण्यात आला आहे. ही पर्तगाळला येणार आहे. त्यासाठी तिला 38 ते 40 दिवस लागतील असे नियोजन आहे. ह्या रथयात्रेत मोठा सहभाग राहिला आहे. गोव्यात 20 नोव्हेंबरनंतर ती गोव्यात प्रवेश करील व चार पाच दिवस गोव्यातील सर्व 20 रामजपकेंद्रांतून फिरून अंतिमतः 26 नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठीच्या दिवशी पर्तगाळ मठात येऊन पोहोचेल.

27 नोव्हेंबरपासून हवन
दुसऱ्या दिवसापासून दि. 27 नोव्हेंबरपासून हवनास आरंभ होईल व 7 डिसेंबर रोजी सार्ध पंचशतमानोत्सव कार्यक्रमाची सांगता होईल. अशी कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली गेली आहे. श्रीरामदेव आणि वीरविठ्ठलाच्या आशीर्वादाने हा सर्व सोहळा यथासांग पार पडेल असा आम्हाला विश्वास आहे.
गेली 550 वर्षे ज्याचे आम्ही पूजन करीत आलो त्या रामाच्या चरणी हे सर्व समर्पण आहे. तुम्ही सर्वांनी ह्या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आमंत्रणही मी ह्यानिमित्ताने देतो.