यंदाच्या पद्म किताबांमध्ये दोन गोमंतकीय मानकर्यांचा समावेश होणे हे निश्चितच गोव्याच्या जनतेसाठी अभिमानास्पद आहे. राष्ट्रीय कीर्तीचा फुटबॉलपटू ब्रह्मानंद शंखवाळकर आणि श्रीपद्मनाभ पीठाधीश श्री ब्रह्मेशानंदाचार्य या दोघांची पद्मश्रीसाठी निवड झाल्याने त्यांच्या चाहत्यांना निश्चितच आनंद झाला असेल. ब्रह्मानंद शंखवाळकर यांना यावर्षी पद्मश्रीने सन्मानित केले गेले असले तरी खरे तर त्याला कितीतरी उशीरच झालेला आहे. जेव्हा त्यांची कारकीर्द भराला होती आणि एकाहून एक राष्ट्रीय कीर्तीमान त्यांनी प्रस्थापित केले होते, तेव्हाच खरे तर त्यांची त्या सन्मानासाठी निवड झाली असती तर अधिक अर्थपूर्ण ठरली असती. परंतु काही गोष्टींसाठी योग यावा लागतो हेच खरे.
ब्रह्मेशानंदाचार्यांचे गुरू सद्गुरू श्री ब्रह्मानंद स्वामी यांचे कार्य तर अजोड आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींना व्यसनांपासून दूर करून आध्यात्मिक उन्नती करण्याचे ब्रह्मानंद स्वामींचे कार्य खरोखर थोर होते. त्यांच्याच पुण्याईच्या बळावर आज पद्मनाभ संप्रदाय चहुअंगांनी विस्तारत गेला आहे. आपल्या गुरूपीठाचे कार्य चहुअंगांनी विस्तारण्याच ब्रह्मेशानंदांनी गेली तीन दशके अतुलनीय योगदान दिले आहे हे नाकारता येणार नाही. जागतिक स्तरावर पद्मनाभ संप्रदायाचे कार्य त्यांच्याच सक्रियतेमुळे आज पोहोचलेले आहे. त्यामुळे त्यांच्या त्या कार्याची पोचपावती पद्मश्रीद्वारे दिली गेली असेल तर त्याचेही स्वागतच करायला हवे. अर्थात, येणार्या विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून राजकीय मतलबासाठी त्यांच्या नावाचा विचार झालेला नसेल अशी आशा आहे. पद्मनाभ संप्रदाय आणि तपोभूमी धर्मपीठाचे कार्य हे बिगरराजकीय स्वरूपाचे राहिले आहे आणि तसे ते जपण्याची जिकिरीची जबाबदारी ब्रह्मेशानंदाचार्यांवर आहे. धर्मपीठे ही केवळ एकांतकोषात जगण्यासाठी नसून समाजाला दिशादिग्दर्शक बनली पाहिजेत या प्रेरणेनेच ब्रह्मेशानंदांनी आपल्या कार्याला विस्तारत नेलेले आहे यात शंका नाही. त्यांच्या संप्रदायाच्या नावातच ‘पद्म’ आहे, त्यामुळे या सन्मानाने त्याची झळाळी अधिक उजळली आहे.
पूर्वी पद्म किताबांवर सत्ताधारी राजकीय पक्षाचाच वरचष्मा दिसत असे व बहुधा त्यानुसारच व्यक्तींची निवड होत असे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात पद्मकिताबांसाठी शिफारशी करण्याची संधी आम जनतेलाही देण्यात आलेली आहे. त्यामुळे गेली काही वर्षे चाकोरीबाहेरील नावेही पद्म किताबांच्या नामावलीत दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या पद्मकिताबांमध्ये तर निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणार्या कितीतरी व्यक्तींचा समावेश होता व यावर्षीही तो आहे.
पद्म किताबांचा सोपस्कार आपण दरवर्षी करीत असतो, परंतु वर्षातून एकदा काही व्यक्तींना सन्मानित करीत असताना बाकी जीवनामध्ये त्यांच्या कार्याची सरकारकडून बाकी किती दखल घेतली जाते हाही प्रश्न आहेच. समाजासाठी सदैव कार्यरत असलेल्या वा आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये अतुलनीय कामगिरी बजावणार्या अशा व्यक्तींपासून समाजाला सदोदित प्रेरणा मिळावी, दिशादिग्दर्शन व्हावे यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. फुटबॉलसारख्या खेळाची गोव्यातील लोकप्रियता वादातीत आहे. परंतु फुटबॉलसाठी आयुष्य वेचलेल्या आपल्या खेळाडूंची उपेक्षा करायची आणि रोनाल्डोचे पुतळे उभारायचे असले जे प्रकार चालतात ते थांबायला हवेत. हे केवळ पद्म किताबांबाबतच असे नव्हे, एकूणच गौरव आणि सन्मानांच्या बाबतीत ते केवळ उपचार ठरता कामा नयेत. गोव्याचा फुटबॉलमधील शेर कमी होत चालला आहे. एकेकाळी बंगालमधील बलाढ्य संघांविरुद्ध यश संपादन करीत आलेल्या गोव्याच्या फुटबॉल संघाची देशभरात कीर्ती होती. आज काय चित्र दिसते? त्यामुळे व्यक्तींना सन्मानित करतानाच त्यांच्या कार्याला पुढे नेण्याच्या दिशेनेही प्रयत्न झाले पाहिजेत.
यंदाच्या पद्मसन्मानांमध्ये किती तरी व्यक्ती अशा आहेत ज्या सेवाभावी वृत्तीने निरलस कार्य करीत राहिलेल्या आहेत. उदाहरण द्यायचे तर डॉ. विजयकुमार डोंगरे यांचे देता येईल. त्यांचे नाव आजवर कधी प्रकाशात नव्हते, परंतु त्यांनी जन्मभर कुष्ठरोग्यांसाठी प्रचंड कार्य केलेले आहे. अशा हिर्यामाणकांना शोधून प्रकाशात आणण्यासाठी व्यापक प्रयत्न व्हायला हवेत. नव्या पिढ्यांना त्यांच्यापासून प्रेरणा मिळू शकेल. शेवटी समाजातील ही प्रकाशाची बेटेच आपल्या भोवतीचा अंधार दूर सारत असतात!
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.