सारे काही चित्रपटांसाठी

0
115

– मनस्विनी प्रभुणे

वारकरी जसे दरवर्षी विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरची वाट धरतात. डोक्यात फक्त एकच विचार असतो, विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा! असाच प्रत्यय गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आला. येथे येणारा प्रत्येकजण चित्रपटाच्या दुनियेत रमणारा, जगणारा, त्यावर लिहिणारा, तर कोणी अभ्यास करणारा आणि चांगला चित्रपट बघायला मिळेल या सच्चा भावनेने येणारा सामान्य प्रेक्षकवर्गही येथेच बघायला मिळतो. त्याला समांतर सिनेमा किंवा प्रायोगिक सिनेमा हे काही कळत नाही. मनोरंजन हा एकच उद्देश त्याच्यासमोर असतो. प्रत्येकाच्या तोंडी महोत्सवातील दहा दिवसांत फक्त चित्रपट, चित्रपट आणि चित्रपट एवढेच असते.

रजिस्ट्रेशनची लगबग, दाखविल्या जाणार्‍या चित्रपटांचे कॅटलॉग मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड, त्या कॅटलॉगचा होणारा पद्धतशीर अभ्यास आणि त्याची होणारी पारायणे, त्यामध्ये चित्रपटांना दिलेला सारांश वाचून कोणता चित्रपट बघायचा याबाबतचं करावं लागणारं नियोजन, दरवर्षी येथे आवर्जून दिसणारे चेहरे, चित्रपटांवर झडणार्‍या गप्पा हे सारे वातावरण पंढरीत जमणार्‍या विठू नामाच्या गजरात रंगून गेलेल्या, वारकर्‍यांच्या भक्तिभावात भिजलेल्या वातावरणाजवळ जाणारे आहे. दरवर्षी इफ्फीला न चुकता हजेरी लावणार्‍यांच्या हे सगळे अंगवळणी पडून जाते.

२००४ ला पहिल्यांदाच गोवा राज्य आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडले गेले. कान्सच्या धर्तीवर गोव्यातही चित्रपट महोत्सव साजरा केला जाऊ शकतो हे या महोत्सवाने दाखवून दिले. गोवा हे ठिकाण कसं चुकीचं आहे याबद्दल विरोधकांनी कितीही ढोल वाजविले तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. ‘पुढच्या वर्षी गोव्यातून इफ्फीचं ठिकाण हलवणार. गोव्याला इफ्फी होणार नाही’ असं इफ्फीमध्ये दरवर्षी ऐकायला मिळतं. खरं तर अशा प्रकारचा महोत्सव साजरा करण्यास गोव्यात पोषक वातावरण आहे. कलेची जननी समजल्या जाणार्‍या या राज्यात कलासक्त वातावरण आहे. चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी गोव्याला कायम पसंतीचा वरचा क्रमांक मिळाला.

कोणत्याही गोष्टीचं यशापयश हे त्याचा दर्जा, सातत्य आणि गुणवत्ता या गोष्टींवर अवलंबून असते. आणि हेच सूत्र इफ्फीबाबतही लागू पडते. या तीनही गोष्टींमध्ये इफ्फीची यशस्विता तोलत असताना इफ्फी आपली गुणवत्ता सिद्ध करण्याच्या दिशेने एक-एक पाऊल पुढे सरकताना दिसते. केंद्रीय पातळीवरून आणि चित्रपट क्षेत्रातील दक्षिण-उत्तरेतील विविध ‘लॉबी’मधून कायमच इथल्या पायाभूत सुविधा, इथल्या थिएटरांच्या संख्येचा प्रश्‍न ऐरणीवर आणला जातो; पण यावर्षी एकूण सात थिएटर्स उपलब्ध करून देण्यात आली होती. या सात थिएटरांमध्ये रोज सहा ते सात चित्रपट दाखविले जायचे. म्हणजे दिवसाला साधारणपणे ४५ ते ४९ चित्रपट दाखवले गेले. इफ्फीतील देशी-विदेशी चित्रपट, लघुपट यांच्या संख्येचा विचार केला तर एकूण ३९९ इतके चित्रपट इथे दाखवले गेले. थिएटरमधील स्क्रीनविषयी (पडद्याविषयी) येथे वापरण्यात आलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी कौतुकाने बोलले जात होते.

इफ्फीतील चित्रपटांचा आलेख

इफ्फीमध्ये प्रदर्शित झालेल्या जागतिक चित्रपटांमध्ये भरपूर वैविध्य होते. फ्रेंच, पोर्तुगाल, इस्त्रायल, जपान, श्रीलंका, अमेरिका, फिलिपिन्स, क्यूबा, जॉर्डन, रशिया, ग्रीस, कॅनडा, जर्मन, रुमानिया, पेरू, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, फिनलॅण्ड, इराण, ब्राझिल, थायलंड, न्यूझिलंड, सर्बिया, अर्जेंटिना-नेदरलँड, नेपाळ, कझाकिस्तान आणि अर्थातच भारत अशा एकूण ३१ देशांमधील चित्रपटांचा समावेश होता. दाखविण्यात आलेल्या ३९९ चित्रपटांपैकी सर्वाधिक म्हणजे १८० च्या आसपास विदेशी चित्रपटांची संख्या होती. सुझेन बेलर, कीम की डक, अशोक अमृतराज या नावाजलेल्या आणि चित्रपटांना एक वेगळा आयाम देणार्‍या दिग्दर्शकांचे चित्रपट बघण्याची संधी रसिक-अभ्यासकांना मिळाली. कुठेही भाषेचा अडसर न ठरणार्‍या, सांस्कृतिक मूल्ये आणि मिथके यांच्या साहाय्याने कथासूत्र पुढे नेणार्‍या, चित्रपट विशिष्ट एका भाषेच्या प्रदेशाच्या मर्यादेत न राहता तो ‘वैश्‍विक विचार’ मांडणारा ठरला. याप्रकारचे चित्रपट हे कायमच रसिकांच्या पसंतीस उतरले.

प्रयोगशील दिग्दर्शक कीम की डक

दक्षिण कोरियातील प्रसिद्ध दिग्दर्शक कीम की डक यांच्या सहा चित्रपटांचा इफ्फीमध्ये समावेश होता. निसर्ग, मानवी जीवन आणि मिथिक कथा या सूत्रात गुंफलेली कथा बौद्ध विचार-तत्त्वांना ‘स्प्रिंग, समर, फॉल, विंटर ऍण्ड स्प्रिंग’ या चित्रपटामधून बघायला मिळाला. निसर्ग आणि मानव यांची सांगड घालत असताना, यातील निसर्ग हादेखील एखाद्या व्यक्तिरेखेप्रमाणे जिवंत झालेला या चित्रपटात बघायला मिळाला. अत्यंत कमी संवाद पण कमालीची बोलकी दृश्ये यांमुळे चित्रपट मनाचा ठाव घेतो. एका बौद्ध मन्क (गुरू) आणि त्याच्या शिष्यावर बेतलेला हा चित्रपट दिग्दर्शकाच्या मनातील कल्पनेतून साकार झाला आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी स्वतः कीम की डक यांनी लिहिलेल्या आहेत. त्या बुद्धिझमचा सार सांगून जातात. आपल्या छोट्या शिष्यांकडून नकळतपणे घडलेल्या चुका आणि त्या चुकांची जाणीव त्या छोट्याशा शिष्याला करून देण्याचा प्रयत्न हाच चित्रपटातील उच्चता गाठणारा भाग. हा चित्रपट प्रेक्षकांना वेगळ्याच ट्रान्समध्ये घेऊन जातो. इफ्फीसारख्या जागतिक मंचावर येऊन कीम की डक हे स्वतःच्या मातृभाषेतच सर्वांशी संवाद साधत होते. त्यांना इंग्रजी येत नाही असं नाही, दुभाषी सहकार्‍याच्या मदतीने ते आपले विचार मांडत होते. या मंचावर आलेल्यांपैकी अनेकजण दुभाषीची सोय असूनही इंग्रजीमध्ये बोलण्याचा मोह आवरू शकले नाहीत. तिथे कीम की डक यांनी आपल्या भाषेचं स्वत्व जपलं. ‘ब्रीथ’, ‘दबो’, ‘टाइम’ आणि ‘पायटा’ याही चित्रपटांचा महोत्सवात समावेश होता. मानवी नातेसंबंध आणि भावनिक गुंतवणूक यांचे सुरेख चित्रण त्यांच्या चित्रपटांतून बघायला मिळाले.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले अन्य चित्रपट

पोलंडच्या ‘ऑल मॅथ्युज विमेन’, मालगोझाटा सुस्झुमोवस्का यांचा ‘ऐलिस’, फ्राब्रिझिओ काढ्ढानी यांचा ‘मॅटनिर्टी ब्यूज’, इराणच्या राबमोद जावान यांचा ‘नो एन्ट्री ऑर मेन’, जान जाकब कोलस्की यांचा ‘टू कील अ बिव्हेइअर’, एन. ली यांचा ‘लाइफ ऑफ पाय’, श्रीलंकन सिनेमा ‘विथ यू, विदाउट यू’ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांचा आस्वाद या महोत्सवात घेता आला. मृत्यूनंतरही शहरातील सर्व महिलांच्या स्वप्नात येऊन प्रणयराधना करणारा मॅथ्यू आणि त्या अनुषंगाने घडणार्‍या गमती-जमती ‘ऑल मॅथ्यूज विमेन’ या चित्रपटातून बघायला मिळतात. बायकांमध्ये प्रसिद्ध असणार्‍या त्याच्या प्रतिमेचा तिरस्कार करणारी त्याची बायको आणि तिचं भावविश्‍व हा या चित्रपटाचा आणखी एक कोन.

एलिस

‘एलिस’ हा पत्रकार आणि तिचं स्वतःचं विश्‍व यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट वेश्या व्यवसायातील कटू वास्तवाला सामोरे नेतो. मध्यमवयीन पत्रकार महिला आपल्या ‘एलिस’ नावाच्या प्रसिद्ध मासिकासाठी वेश्या व्यवसायात उतरलेल्या विद्यार्थिनी मुलींवर कव्हट स्टोरी करण्याच्या निमित्ताने त्यांना भेटत असते. या मुलींशी बोलल्यानंतर ती तिच्या डोक्यात सतत चालू राहणार्‍या त्यांच्या कथा यातून चित्रपट पुढे सरकतो. पत्रकाराचे एखाद्या विषयात स्वतःला भावनिकतेच्या पातळीवर कमालीचे गुंतवून घेणे हा विषय अधिक जवळीक साधणारा होता.

मॅटर्निटी ब्यूज

आपल्या पोटच्या मुला-मुलीचा खून केलेल्या चार महिलांची कथा सांगणारा हा चित्रपट महिलांचे एक वेगळेच भावविश्‍व उलगडून दाखवतो. आपल्या मुलांची हत्या केलेल्या, मानसिकरीत्या कमकुवत असलेल्या महिलांचे सुधारगृह आणि त्या सुधारगृहातील महिला, कोणत्या परिस्थितीत कळत-नकळतपणे आपल्या अपत्याची हत्या करतात हे या चित्रपटाच्या माध्यमातून समोर उभे राहते. एका वेगळ्या वास्तवाला सामोरे नेणारा हा चित्रपट अस्वस्थ करून सोडतो. लग्नानंतर नवर्‍याच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांचं उद्ध्वस्त झालेलं भावविश्‍व आणि पोटच्या अपत्याची हत्या यांचा शिक्का बसलेल्या या महिलांचे चित्रण दिग्दर्शकाने चित्रीत केले आहे.

कमी संवाद पण बोलकी मांडणी यांमुळे हे सर्वच चित्रपट एक वेगळा अनुभव देतात.

इंडियन पॅनोरमा- भारतीय चित्रपटांचा शंभर वर्षांचा मागोवा

भारतीय चित्रपटांचे यंदाचे वर्ष म्हणजे शताब्दी वर्ष. त्यामुळे शताब्दी वर्ष साजरे करण्याच्या उद्देशाने इफ्फीमध्ये एक भारतीय सिनेमांचं स्वतंत्र दालन करण्यात आलं होतं. हिंदी चित्रपटांच्या बरोबरीने प्रादेशिक चित्रपटांना यात स्थान मिळालं. मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत चित्रपट अशा प्रकारे भारतीय चित्रपटांची शंभर वर्षांतील प्रगती या चित्रपटांच्या माध्यमातून दाखविण्यात आली. राजा हरिश्‍चंद्र ते अगदी आताच्या ‘बर्फी’पर्यंतचे २७ चित्रपट दाखवण्यात आले. यांमध्ये इंडियन पॅनोरमातील या विभागात प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी, प्रसिद्ध दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली, दिग्दर्शक मूजफ्फर अली आणि ज्यांनी आपल्या दिग्दर्शनाची छाप सोडली अशा ज्येष्ठ दिग्दर्शकांना आणि त्यांच्या चित्रपटांना येथे गौरविण्यात आले. यामध्ये मृणाल सेन, अदूर गोपाल कृष्णन, श्याम बेनेगल, डी. रामानायडू, के. बालचंदर यांचा चित्रपटांचा समावेश होता. विशेष म्हणजे या विभागातील सर्व चित्रपट हाऊसफुल्ल होते. श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’, ‘भूमिका’, डी. रामनायडू यांचा ‘तोहफा’, के. बालचंदर यांच्या ‘नीर कुमीझी’ या चित्रपटांना रसिकांनी विशेष गर्दी केली.

गेल्या वर्षभरात भारतीय चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या दिग्गजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे निवडक चित्रपट दाखवण्यात आले. देव आनंद यांचा ‘गाईड’, यश चोप्रा यांचा ‘धूल का फूल’, राजेश खन्ना यांचा ‘आनंद’, नवोदय अप्पाचान यांचा ‘इन्ते मामात्तू कुट्टीयामा’, टी. दामोदरन यांचा ‘कालापानी’, अशोक मेहता यांचा ‘३६ चौरंगी लेन’, राजन कोठारी यांचा ‘दास कॅपिटल’, ए. के. हनगल यांची भूमिका असलेला ‘गुड्डी’, दारासिंग यांचा ‘सिकंदर-ए-आझम’, जॉय मुखर्जी यांचा ‘लव्ह इन टोकियो’, दिनेश ठाकूर यांचा ‘गृहप्रवेश’, रविशंकर शर्मा यांचा ‘चौहदवी का चॉंद’ इत्यादी चित्रपटांचा समावेश होता.

बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपटांचा अधिक प्रभाव

यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एक गोष्ट स्पष्टपणे जाणवत होती ती म्हणजे बंगाली आणि दक्षिणेकडील चित्रपटांना ज्या पद्धतीने या महोत्सवात स्थान देण्यात आले होते, त्या तुलनेत मराठी आणि कोंकणी चित्रपट फारच कमी होते. दाखविण्यात आलेल्या प्रादेशिक चित्रपटांमध्ये एकूण चित्रपट होते ४१. यांमध्ये-

भारतीय भाषांमधील एकूण चित्रपट- ४१

दाक्षिणात्य भाषांमधील चित्रपट २१

बंगाली चित्रपट १२

मराठी चित्रपट ३

कोंकणी चित्रपट १

अन्य भाषांतील चित्रपट ४

वरच्या आकड्यांवर नजर टाकली असता हे चित्र अधिक स्पष्ट होते. या शंभर वर्षांच्या इतिहासात अनेक दर्जेदार मराठी सिनेमांची निर्मिती झाली. अनेक मान्यवर कलाकारांनी आपले योगदान मराठी सिनेमाला दिले. किमान त्या चित्रपटांचा समावेश यामध्ये व्हायला हवा होता. दक्षिणेतील कलाकार- दिग्दर्शक कायम एकजुटीने दबावतंत्राचा उपयोग करून आपल्या चित्रपटांना पुढे आणण्यात यशस्वी होतात. यात मराठी दिग्दर्शक मागे पडतात असे वाटते. महोत्सवातील चित्रपटांच्या यादीत मराठी-कोंकणी चित्रपट अत्यल्प, अगदी नावापुरते असल्यामुळे खंत वाटत होती.

प्रादेशिक चित्रपटांना वेगळा मंच नाही

काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दर रविवारी दुपारी दर्जेदार प्रादेशिक चित्रपट बघायला मिळायचे. पुढे ते बंद केले. सध्या प्रादेशिक चित्रपट बघायला मिळतच नाहीत. अशा प्रकारच्या महोत्सवांमध्ये फक्त हे चित्रपट बघायला मिळतात. प्रादेशिक चित्रपट बघायला मिळावेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे. या प्रकारच्या महोत्सवात काही सर्व रसिक मंडळी सहभागी होतेच असे नाही. एक मोठा प्रेक्षकवर्ग या चित्रपटांना मुकतो. प्रसिद्ध अभिनेते ओमपुरी यांनीदेखील भारतीय पॅनोरमाचे उद्घाटन करताना हा प्रश्‍न उपस्थित केला आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी स्वतंत्र विशेष चॅनल असले पाहिजे असेही मत व्यक्त केले. भारतीय चित्रपट म्हणजे फक्त हिंदी चित्रपट असे नाही तर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होते. भारताच्या संस्कृतीचे, लोकांच्या राहणीमानाचे दर्शन या चित्रपटांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे प्रादेशिक चित्रपटांना एक स्वतंत्र मंच मिळाला पाहिजे.

दिवसाला फक्त तीनच चित्रपट

महोत्सवाच्या सुरुवातीस दिवसाला फक्त तीनच चित्रपट बघायला मिळतील अशी अट घालण्यात आली होती. पण इथे येणारा प्रत्येकजण दिवसाला पाच ते सहा चित्रपट बघण्याच्या अपेक्षेने येतो. या तीनच चित्रपटांच्या अटीमुळे सुरुवातीला अनेकांना चांगल्या चित्रपटांना मुकावे लागले. मुळात अशी अट ठेवायला नको. गोव्यात पहिल्यांदा झालेल्या इफ्फीमध्ये ज्याला जो चित्रपट बघायचाय त्याला तिथे प्रवेश मिळायचा. तसेच दरवर्षी असले पाहिजे. तिकीट काढण्याच्या पद्धतीमुळे एकतर वेळ जातो आणि दुसरे म्हणजे हाऊस फुल्ल म्हणून तिकीट खिडकीवर समजतं आणि प्रत्यक्षात अनेक रिकाम्या खुर्च्या बघायला मिळतात. त्यामुळे तिकीट पद्धत बंद करून प्रवेश सर्वांना खुले करावेत. यावर्षी याच मुद्यावर अनेकदा तिकीट खिडकीवर, थिएटरमध्ये सोडण्यात येणार्‍या रांगेत भले मोठे वाद- भांडणे झालेली दिसली. पुढच्या वर्षीच्या इफ्फीमध्ये या असल्या नियमांना वगळलं जावं.

गोव्यात होणार्‍या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची उत्तरोत्तर प्रगती होताना दिसते. स्थानिक कलाकारांना इथे वावही मिळतोय. इथे येणारा सिनेरसिक- अभ्यासक हा सोयीसुविधा बघून येत नाही तर त्याचे प्राधान्य चित्रपट बघायला मिळण्यावर असते. तो त्यातच समाधानी असतो. वेळप्रसंगी थिएटरमध्ये बसायला खुर्ची मिळाली नाही तर मधल्या ‘वॉकिंग प्लेस’मध्ये चक्क मांडी घालून तो चित्रपट बघायला बसतो. त्यामुळे इथल्या गोव्यातील सोयीसुविधांमधील त्रुटींबाबत एक विशिष्ट गट (ज्याला हा महोत्सव गोव्यात व्हावा असे वाटत नाही) कायमच ओरडत असतो. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्व दाखवल्या जाणार्‍या चित्रपटांच्या निवडीला दिले गेले पाहिजे.