सायनाचा सिंधूला धक्का

0
144

भारताची माजी क्रमांक एकची खेळाडू सायना नेहवालने वर्चस्व गाजवताना ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या व द्वितीय मानांकित पी.व्ही. सिंधू हिचा सरळ गेममध्ये २१-१३, २१-१९ असा पराभव केला. या विजयासह सायनाने ३५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. कोपराच्या दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेल्या सायनाने आपल्या वर्चस्वाच्या दिवसातील खेळाची काल झलक दाखवताना सिंधूला नामोहरम केले. अंतिम फेरीत स्थान मिळविण्यासाठी सायनाचा सामना चौथे मानांकन लाभलेल्या थायलंडच्या रत्चानोक इंतानोन हिच्यासी होणार आहे. इंतानोनविरुद्ध सायनाचा रेकॉर्ड ८-५ असा आहे.

पुरुष दुहेरीत नवोदित सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी सनसनाटी निकालाची नोंद करताना चौथ्या मानांकित मॅड्‌स कॉनरड पीटरसन व मॅड्‌स पिएलर कोल्डिंग या डेन्मार्कच्या जोडीला एक तास सहा मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत २३-२१, १५-२१, २१-१९ असे पराजित करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या मार्कुस फेर्नाल्डी गिडियोन व केविन संजया सुकामुलजो या प्रथम मानांकित जोडीशी होणार आहे.