Home बातम्या सामूहिक बलात्कार प्रकरणी निवाडा उद्या

सामूहिक बलात्कार प्रकरणी निवाडा उद्या

0

अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांनी मंगळवारी मुकेश (२६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय ठाकूर (२८) या सर्वांवरील आरोप निश्‍चित केले होते. त्यावर बुधवारी निवाडा होणे अपेक्षित होते. मात्र न्यायालयाने उभय पक्षकारांचे तीन तास चालवलेले युक्तीवाद ऐकून घेतले व त्यावरील निवडा शुक्रवारपर्यंत राखून ठेवला. सामूहिक बलात्कार, खून, अनैसर्गिक संभोग, दरोडा व अन्य गुन्हे केल्याबाबत वरील चारहीजणांवर आरोप सिद्ध झाले असल्याने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.

सरकार पक्षाच्या वकिलांनी काल न्यायालयात युक्तीवाद करताना आरोपींना मृत्यूदंड ठोठावण्याची मागणी केली. त्या सर्वांची वृत्ती पशुसारखी असून त्यांच्यात सुधारणा होणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी केला.

मात्र आरोपींच्या वकिलांनी आरोपींसाठी दया याचना केली. ‘फक्त देवच जीवन देऊ शकतो आणि जीवन संपविण्याचा अधिकारही देवाचाच आहे’ या महात्मा गांधींच्या प्रसिद्ध उद्गारांचा दाखला आरोपींच्या वकिलांनी यावेळी दिला. विशेष सरकारी वकील दयन कृष्ण यांनी हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असे असल्याचे सांगून सर्व आरोपंीना मृत्यूदंड देण्यात यावा अशी मागणी केली. या आरोपींनी एका निष्पाप मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला. आपल्यावर दया करावी या विनवणीची त्यांनी पर्वा केली नाही. त्यामुळे कोणत्याही सहानुभूतीस ते पात्र नाहीत, असा कृष्णन यांनी युक्तीवाद केला. जनतेचे या प्रकरणावर लक्ष लागून आहे. त्यामुळे आरोपींना जर किरकोळ शिक्षा झाली तर जनतेचा न्याय व्यस्थेवरील विश्‍वास उडेल असेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील एका निवाड्यानुसार सामूहिक बलात्कारानंतर खून झाला तर त्यातील आरोपींना मृत्यूदंड व्हायला हवा.